महिलांवरील वाढत्या अत्याचारविरोधात शरद पवार गटाची ठाण्यात जोरदार निदर्शने

ठाणे : डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजार्‍यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली. तर उरण येथे एका यशश्री शिंदे या तरूणीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे – पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड, ठाणे शहराध्यक्षा सुजाताताई घाग, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

या प्रसंगी ॠता आव्हाड म्हणाल्या की, अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असे जाणवले की पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या तपासाकडे पाहता त्यांची किव येते. निवडणुका आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशश्रीचा मारेकरी मोकळा आहे. त्यालाही जेरबंद करावे आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तर सुजाता घाग यांनी, या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी. जेणेकरून दुसर्‍या कुणाची असे गुन्हे करण्याची हिमंत होणार नाही असे सांगितले.

Leave a Comment

× How can I help you?