*भारतीय निवडणूक निकाल आणि*
*महिलांचे प्रतिनिधी*
2024चे निवडणुकीच्या निकालांची ,अपेक्षित बरसात आपल्यावर झाली. पण एकूण या सगळ्या निवडणुकीच्या निकालांमध्ये एक जाणवतं की या सर्व ठिकाणी, महिलांची टक्केवारी अतिशय कमी आहे.ती आकडेवारी आणि या राज्यात असं झालं, त्या राज्यात असं झालं, असं लिहून ,कारणे, आरोप प्रत्यारोप करुन विश्लेषण अस मला अजिबात करायचं नाही .
*पन्नास टक्के*
एकूणच समाजात,जैविक दृष्टीने 50 टक्के स्त्री आणि 50 टक्के पुरुष असे प्रमाण आपण गृहीत धरतो .मग एकूण निवडून आलेल्या माणसांमध्ये पन्नास टक्के स्त्रिया का असू नये?
मुद्दा
स्त्रियांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर, निवडणूक लढलेल्या व्यक्ती तर आज पर्यंत, कधी सातत्याने बघण्यात आल्या नाहीत.तुरळक आहेत. ज्या देशाला कै इंदिराजी गांधींसारख्या ,महिला पंतप्रधानांचा वारसा आहे त्या देशात भरपूर मोठ्या संख्येने महिलांनी पुढे येऊन, राजकारणातील आपली भागीदारी वाढवायला हवी.पण तसे झाले नाही .
प्रश्न
महिलांचे प्रश्न खूप आहेत.सार्वजनिक ठिकाणी सुविधा सोयी नसतात.टॉयलेटला जाण्याची सोय नसते .’राईट टू पी’ लघवीला जाण्यासाठी आवश्यक असलेला आडोसा अथवा खाजगी पणा, हा स्त्रीचा हक्क असतो.स्त्रिया काय पुरुषांचा देखील तो हक्कच असतो .पण या मूलभूत हक्कासाठी महिलांना लढावं लागतं.
*प्रवास*
प्रवासात ,लोकल गाडीमध्ये,आगगाड्यांत अगदी कमी प्रमाणात राखीव जागा महिलांसाठी असतात. उभ्याने प्रवास करणे हे महिलांना अधिक त्रासदायक असतं. बसमध्ये काही सीट्स राखीव असतात हे चांगलंच आहे ,पण एकूण नोकरी करणारे आणि प्रवास करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने हे प्रमाण खूप कमी आहे .
*महागाई*
महागाईचा घाव ,स्वयंपाक घरातील व्यवस्थापन बघणाऱ्या महिलांवर अधिक पडतो. हा खरे तर महिलांचा मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळी महिला लाटणे मोर्चा काढून, आपला महागाईला निषेध व्यक्त करायच्या. डायन महंगाई म्हणून मोर्चे काढायच्या .आता महागाईला गृहीत धरलं जातं. महागाई वाढली की महिलांचं घराचं बजेट कोसळून जातं महागाई आटोक्यात ही राहिलीच पाहिजे.
*प्रदूषण*
प्रदूषणामुळे महिलांवर जास्त परिणाम होतो. कारण त्या स्वयंपाक खोलीतील धूर, धूळ अथवा किचन मधील गॅसेस,बंद हवा ,यांच्यामुळे होणार्या ईनडोअर प्रदूषणाला तोंड देत असतात .प्रदूषणाचा मुद्दा घेवून कोणीही निवडणुकीत लढत नाही,उपाय करत नाही .
*झाडे लावा झाडे जगवा.*
खूप गरम होत असताना, किचनमध्ये एसी लावून किंवा पंखा लावून स्वयंपाक करणे शक्य नसतं .त्यामुळे भरपूर झाडे लावून ,पर्यावरणाचा संवर्धन करणे हा महिलांच्या हितासाठी चा मुद्दा आहे. खूप प्रमाणात झाडे लावायला कोणी उत्सुक नसतच. झाडे लावली तरी,हवा अशी आहे कि हल्लीच्या दिवसात झाड जगत नाहीत. झाड लावणं जगवणं हा खरंतर पूर्ण मानव जातीच्या हितासाठीच आवश्यक असलेला मुद्दा आहे.
*पाणीटंचाई*
घरगुती वापरासाठी पाणी भरणे,ही जबाबदारी बहुतांश ठिकाणी पारंपरिक रित्या महिलांची मानली जाते .पाणी भरण्यासाठी बहुतांश ठिकाणी स्त्रियांनाच कष्ट करावे लागतात .त्यामुळे पाणीटंचाईवर तोडगा काढला पाहिजे.
*बस स्टॉप*
विविध कारणाने नोकरी निमित्ताने गावोगावी जाणाऱ्या महिलांसाठी बस स्टॉप वर स्वच्छतेची सुद्धा अपेक्षा करावी ,अशी परिस्थिती नसते .शौचालय देखील नसतात.
*सुरक्षा*
महिलांची सुरक्षा या मुद्द्यावर तर खूप जोर देणे आवश्यक आहे .
*वसतीगृह*
शिक्षण नोकरी परीक्षा देणं या अन्य कारणाने अनेकदा महिलांना काही काळासाठी घरापासून दूर वस्तीगृहात राहावं लागतं महिलांसाठी सुरक्षित वसतिगृहांची संख्या वाढायला हवी.
माझं मत माझा मुद्दा तरी मी मांडते आहे.
निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींमध्ये महिलांचं प्रमाण अतिशय कमी आहे .पुढच्या निवडणुकीच्या वेळी ते वाढेल आणि महिलांना अधिक सोयी सुविधा देण्यात येतील अशी अपेक्षा करू या. लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, त्यामुळे महिला लोकप्रतिनिधी वाढल्या पाहिजेत.आज महिलांचे प्रश्न निर्भीड पणे ,मांडणे अतिशय आवश्यक आहे.
**
*लेखिका-शुभांगी पासेबंद.*