चार दिवसांपूर्वी टाऊन साइडला म्हणजे मुंबई गिरगाव मध्ये एका मीटिंग साठी गेलो होतो.. मीटिंग रात्री साडेनऊला संपली.. गिरगाव वरून टॅक्सी किंवा बसने सीएसटी. मग लोकल ट्रेनने ठाणे असा प्रवास करणार होतो. गिरगाव गायवाडीतून बाहेर पडलो, चालायला लागलो तर मेट्रोच्या कामाच्या खुणा दिसत होत्या. जाडजूड पत्र्याच्या रस्त्यावरून माणस ,बस, टॅक्सी व अन्य वाहने यांची यातायात सुरू होती. अजून रस्त्याची कामे बाकी होती. चालताना जरा भीतीच वाटत होती. खाली किती खोल असेल ,पत्रा निसटून खाली पडलो तर काय? पण सगळं काही निर्धोक चालू होते त्यामुळे भीड चेपली गेली. चालता चालता लक्षात आले की दोन-तीन दिवसांपूर्वीच प्रभादेवी ते कफ परेड या अकरा कि.मी भूमिगत मेट्रोचे उद्घाटन होऊन मेट्रो तीन लाईन सुरू झाली आहे.. म्हटलं हीच संधी आहे भूयारी मेट्रोचा अनुभव अनुभव घेण्याची.
ठाण्यात राहायला गेल्यापासून टाऊन कडे (साऊथ मुंबई) जाणे वर्षोनुवर्षे होत नाही.. विचार चालू असता समोरच मेट्रोचे झावबावाडी स्टेशन दिसले. कफ परेड ते सिप्झ हा जवळपास साडे तेहतीस कि.मी चा भूयारी/भूमीगत मार्ग आहे. जमिनीखाली २६ स्टेशन्स आहेत तर फक्त एक स्टेशन वर आहे. सदतीस हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प. यामध्ये जपान इंटरनॅशनल कार्पेरशन कंपनीचे ५७ टक्के कर्ज नाममात्र व्याजाने या प्रकल्पासाठी उपल्ब्ध झालेले आहे. उर्वरित रक्कमेत भारत सरकार व राज्यसरकार यांचा स्टेक आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 ला Aqua Line मेट्रो असेही नाव आहे . ही ट्रेन आतून बाहेरून निळ्या रंगाची आहे.. म्हणून ॲक्वा लाईन…सरासरी १५-२५ मीटर खोल जमिनीतून ही ट्रेन धावते. इतकी माहिती वाचनात होती. म्हणून प्रवासाचा अनुभव घेण्याचा अट्टहास.
ठाकूरद्वार नाका ओलांडून थोडं पुढे आलो तर रस्त्याच्या बाजूलाच झावबावाडी स्टेशन होते. जमिनीखाली तीन मजले खाली भूयारी मार्ग होता. लिफ्ट ,सरकते जिने, चकचकीत टाईल्स व स्वच्छता सगळीकडे दिसून आली. लिफ्टने तीन मजले खाली गेलो. झावबावाडी ते सीएसटी दहा रुपये देऊन स्मार्ट तिकीट घेतले .तिकिटावर छोटा स्कॅनर होता.. रेल्वे प्लॅटफाॅर्म वर जाताना व बाहेर पडताना तो स्कॅन केल्यानंतर दरवाजे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी उघडले गेले..
प्लॅटफॉर्मवर पोचलो तर समोर पूर्ण प्लॅटफॉर्मच्या शेवटपर्यंत रेल्वेत शिरण्यासाठी काचेचे उघडणारे दरवाजे. इतक्यात हलकासा आवाज करत ट्रेन आली सुद्धा… पूर्ण थांबताच आपोआप प्लॅटफाॅर्मवरचा काचेचा दरवाजा उघडला नंतर ट्रेनचा दरवाजा उघडला. नंतर आपोआप दोन्ही दरवाजे बंद झाले व ट्रेन सुरू झाली..हे यांत्रिकपण अभिनव वाटले. खास गोष्ट म्हणजे ही ॲक्वा लाईन विना वाहनचालक आहे..आपली एस.टी. विना वाहक असते तर ही आख्खी ट्रेन विना ड्रायव्हर… अशी ही फुल्ली ॲटोमेटेड ट्रेन…या ट्रेनने झावबावाडी , काळबादेवी व सिएसटी (व्हिटी) असा प्रवास केला..
रात्रीची वेळ असल्याने ट्रेनला गर्दी नव्हती. युरोपियन मेट्रो ट्रेनचा फील येत होता. पण, युरोपात प्रवास करताना लंडन,फ्रान्स , म्युनिक ( जर्मनी) येथील मेट्रो स्टेशनवर मला प्लॅटफाॅर्मवर काचेचे दरवाजे मात्र आढळले नाहीत..तिथे अशा आवरणातून ट्रेन स्टेशन वर येत नाही. ट्रेन आली की डायरेक्ट दरवाजे आपोआप उघडतात व बंद होतात. आपल्या मेट्रोचे ते काचेच्या दरवाज्याचे वेगळे वैशिष्ट्य आवडले. मुंबईला यांत्रिकदृष्ट्या नटवले व सजवले जात आहे .
मी १९७८ साली मुंबईत आलो तेव्हापासून मुंबई पाहात आहे. तेव्हा फ्लायओव्हर ब्रिज पण नव्हते. गर्दिचा, वाहनांचा व दळणवळणाचा ताण दिवसेंदिवस मुंबईवर खूप येत आहे. तो ताण कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देत मुंबई उभी व जमिनीखाली विस्तारत आहे. किती वेळा तिला उभी आडवी खोदली असेल, अनेक वेळा तिचे विच्छेदन झाले आहे , त्याला सीमाच नाही. प्रत्येक विच्छेदनानंतर मुंबईचे रूप खुलत गेले आहे. एखादी ललना बाहेर पडताना मेक ओव्हर करते तसं मुंबईचे मेक ओव्हर सतत चालू आहे..मग समुद्र किनारे असतील, पादचारी मार्ग असतील, स्काय वॉक असतील, रात्रीची आकर्षक रोषणाई असेल; दिवसेंदिवस तिच्या देखणेपणात भर पडत आहे, एखाद्या माॅडर्न मुली सारखी ती स्मार्ट बनत आहे. तिचं अप्रुप रोज वाढतंय. जो येथे येतो तो मग देशी असो वा विदेशी असो, तिच्या बहुविविधता व सुंदरतेच्या मोहात पडतोच पडतो..
ही मेट्रो ट्रेन सुरू होऊन फक्त एक आठवडाच झाला आहे. अद्याप स्वच्छता, सुरक्षा व उद्वाहने,सरकते जिने हे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि फेरीवाले देखील मोकळ्या जागेत आलेले नाहीत. युरोपीय देशांत कितीतरी दशके ही सेवा सुरू आहे. आपल्याकडे आत्ता आत्ता ही सेवा सुरू होत आहे..देर आये मगर दुरुस्त आये..हे ‘दुरूस्त आयेपण’ टिकवण्याचे काम मुंबई मेट्रो रेल कार्पेरशनचे आहे तसेच प्रवास करणाऱ्या लोकांचे देखील आहे.
मंत्रालयासमोरील नरिमन पॉइंट येथील मुख्यालयात (संचालनालय) जिथून पन्नास वर्षं राज्यातील कोषागारांचा गाडा हाकला गेला होता.त्या वास्तुत मी जवळजवळ एक तप काम केले होते. ती वास्तू मेट्रोच्या कामासाठी होण्यापूर्वी अधिकारी व कर्मचारी यांनी त्या वास्तुला निरोप देण्याचा कार्यक्रम सर्व निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून केला होता. त्या सोहळ्याला मी देखील गेलो होतो. मला आठवते त्यावर मी एक लेख लिहिला होता. त्यात मी असे लिहिले होते की,”युध्दाला आणि विकासाला उद्ध्वस्तपणाचा शाप असतो.” इमारती,घरे व रस्ते उद्ध्वस्त होताना मुंबईच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगत रहिवाश्यांनी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी अनेक त्रास निमुटपणे सहन केले. ही मुंबई सगळं सोसते, सगळ्यांना पोसते आणि सगळ्यांना सहज स्वीकारतेदेखील. म्हणून मुंबईचे स्मार्टपण आपण सर्वांनी जपू या…
: मोरेश्वर बागडे