
भारतीय बॅडमिंटनसाठी २०२५ हे वर्ष फारसं उजळून निघालं नव्हतं. मोठ्या अपेक्षांच्या छायेत यशाची काही क्षणभंगुर झलक दिसली. पण सातत्याचा अभाव ठळकपणे जाणवत राहिला. अव्वल खेळाडूंच्या कामगिरीतील चढ-उतार, नवोदित खेळाडूंच्या फॉर्मबद्दलचे प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या मर्यादित यशामुळे भारतीय बॅडमिंटन एका प्रकारच्या खडतर संक्रमणातून जात असल्याचं चित्र स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लक्ष्य सेननं मिळवलेलं जेतेपद म्हणजे भारतीय बॅडमिंटनला मिळालेली एक नवसंजीवनी ठरली.
ही स्पर्धा बीडब्ल्यूएफ सुपर ५०० स्तरावरची असली तरी ‘केकवॉक’ नव्हती. लक्ष्यला येथे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आघाड्यांवर परीक्षांना सामोरं जावं लागलं. उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चाऊ टिएन चेनविरुद्ध त्याने खेळलेलं दमदार पुनरागमन हे त्याच्या जिद्दीचं प्रतीक होतं. ही त्याची गेल्या डिसेंबरनंतरची पहिलीच ट्रॉफी आणि कॅनडा ओपन २०२३ नंतर भारताबाहेर मिळालेलं पहिलं जेतेपद ही केवळ सांख्यिकी नोंद नाही, तर एका खेळाडूच्या पुनरुत्थानाचा दाखला आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जवळ येऊनही निसटल्याची जखम लक्ष्यसाठी खोल होती. त्यात दुखापतींची मालिका आणि वर्षभरातील ११ वेळा पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याची कडू वेळ ही सगळी पराभवाची नव्हे, तर तडजोड न करण्याची संघर्षगाथा होती. २०२५ च्या अखेरीस त्याच्या हातात चमकलेली ही ट्रॉफी पुढच्या वाटचालीसाठी आत्मविश्वासाचं इंजेक्शन आहे.
पण प्रश्न मोठा असा आहे, ही ठिणगी २०२६ मध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी प्रज्वलित होणारी मशाल ठरेल का? सध्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीशिवाय कोणताही भारतीय खेळाडू टॉप १० मध्ये नाही. पी.व्ही. सिंधूचं टूरवरील मागील दोन वर्षांतील एकच जेतेपद, एकेकाळी सहाव्या क्रमांकावर असलेला एच.एस. प्रणॉय आता ३५व्या स्थानी घसरलेला आणि नव्या खेळाडूंची कमतरता ही सगळी चिंतेची कारणं आहेत.
तरीही आशेची दोन किरणं स्पष्ट दिसतात. २० वर्षीय आयुष शेट्टीचं यूएस ओपनमधील जेतेपद आणि १६ वर्षीय तन्वी शर्माचं जागतिक ज्युनियरमधील रौप्यपदक. पण सायना – सिंधू यांनी उभारलेला वारसा पेलण्याइतकं दमदार युग अद्याप तयार झालेलं नाही, हेही मान्य करावंच लागेल.
याच जाणिवेतून बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने गुवाहाटीत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र उभारलं आहे. पुढच्या पिढीचे खेळाडू तयार करण्याचा हा महत्त्वाचा पाया आहे. त्यासोबतच भारत आता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करून स्वतःला जागतिक बॅडमिंटन नकाशावर अधिक ठळकपणे उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. २०२५ ची जागतिक ज्युनियर स्पर्धा गुवाहाटीत, तर २०२६ ची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे ही निश्चितच भारतासाठी प्रतिष्ठेची पावलं आहेत.
जर पुढील दोन वर्षांत भारत एक मजबूत, सातत्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा पदक विजेत्यांचा गट घडवू शकला, तर भारतीय बॅडमिंटनचा पुढचा सुवर्णकाळ दूर नाही. लक्ष्य सेनच्या विजयानं दाखवून दिलंय की पुनरुत्थान शक्य आहे, फक्त धैर्य, जिद्द आणि योग्य दिशा हव्यात.
: मनीष चंद्रशेखर वाघ


