
खेळाच्या मैदानावर खेळाडूंच्या घामाच्या प्रत्येक थेंबावर, भावनांच्या प्रत्येक चढउतारावर जगाचे लक्ष असते, हे मान्यच. पण सामना संपल्यानंतरही तोच खेळाडू कॅमेऱ्यांच्या जाळ्यात अडकून राहावा, त्याच्या पराभवाच्या क्षणांचे, संतापाचे, निराशेचे प्रदर्शन ‘कंटेंट’ म्हणून व्हायरल व्हावे, ही आजच्या क्रीडासंस्कृतीची चिंताजनक बाजू आहे. आंतरराष्ट्रीय टेनीसपटू कोको गॉफ एका सामनात पराभूत होऊन कोर्टाबाहेर येऊन तिची रॅकेट तोडते. हा राग किंवा प्रतिक्रिया अगदीच खाजगी होती. पण एका प्रेक्षकाने या प्रसंगाचे चित्रण करून ते व्हायरल केले. यामुळे अनेक दिग्गज खेळाडू दुखावले. इगा स्वियातेक, नोव्हाक जोकोविच, जेसिका पेगुला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रतिक्रिया म्हणजे केवळ वैयक्तिक नाराजी नसून प्रेक्षकांच्या मानसिकतेला विचारलेला जाब आहे.
आजचा क्रीडा-जगतातला मोठा विरोधाभास असा की खेळाडूंच्या “खासगी आयुष्या”ला प्रेक्षक अधिकाधिक जवळून पाहू इच्छितात, पण त्याच खेळाडूंच्या मानसिक आरोग्याबाबत समाज उदासीन राहतो. सामना हरल्यानंतर रॅकेट फोडणे, डोळ्यात पाणी येणे, कुणाशीही न बोलता शांतपणे बाहेर पडणे, हे सारे क्षण मानवी आहेत. पण ते क्षण ‘व्हायरल’ होतात तेव्हा त्यात माणुसकी हरवते आणि उरतो तो केवळ तमाशा.
इगा स्वियातेकचे “आम्ही प्राणीसंग्रहालयातले प्राणी नाही” हे विधान अतिशयोक्ती वाटू शकते, पण त्यामागील वेदना खरी आहे. खेळाडूंच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जाते, मोबाइलवर झूम करून पाहिले जाते, त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावाचा अर्थ लावला जातो. हा प्रकार कौतुकाचा नसून अतिक्रमणाचा आहे. चाहत्यांना खेळाडूंना जवळून पाहायचे असते, हे स्वाभाविक आहे; पण ते पाहणे आणि डोकावणे यामधील सीमारेषा केव्हाच पुसट झाली आहे.
स्पर्धा आयोजक ‘वॉर्म-अप’ आणि ‘कूल-डाउन’सारख्या विभागांत चित्रिकरणाला परवानगी देताना “खासगीपणाची काळजी घेतली जाते” असे सांगतात. पण प्रत्यक्षात खेळाडूंना तक्रार करण्याची गरजच वाटू नये, अशी व्यवस्था असायला हवी. पराभूत खेळाडूंचे किमान क्षण तरी जपले गेले पाहिजेत, हा आग्रह अतार्किक नाही, तर अत्यावश्यक आहे.
फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनसारख्या स्पर्धांमध्ये कॅमेऱ्यांवर आणि प्रवेशावर मर्यादा आहेत. म्हणूनच तिथे ही समस्या तुलनेने कमी जाणवते. याचा अर्थ असा की उपाय शक्य आहेत; इच्छाशक्तीची गरज आहे. क्रीडा संस्था, प्रसारमाध्यमे आणि चाहते या तिघांनीही आपली भूमिका नव्याने तपासण्याची वेळ आली आहे.
खेळाडू हे यंत्र नाहीत, ब्रँड नाहीत, सतत ‘कंटेंट’ देणारे चेहरे नाहीत. ती देखील माणसे आहेत; पराभवाने खचणारी, विजयाने फुलणारी. कोर्टावर त्यांनी जेवढे दिले, त्यानंतर किमान थोडे तरी मौन, थोडी तरी गोपनीयता त्यांना मिळायला हवी. मैदानाबाहेरही ते माणूसच आहेत, ही जाणीव रुजवणे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ


