
भारताच्या राजकीय स्मरणशक्तीचे ‘रीसेट बटण’ रोज सकाळी दाबले जाते आणि सगळ्या जुन्या घोषणा, वचने, वादे, टीका आणि तावातावाने केलेली भाषणे एका क्षणात पुसली जातात, अगदी स्मार्टफोनप्रमाणे!
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी २०१३ मधील नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आणि पुन्हा एकदा विस्मरणात गेलेल्या प्रश्नांचं दार उघडलं. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याबद्दल चिंता व्यक्त करत होते. त्यावेळी केवळ नरेंद्र मोदीच नव्हे तर भाजपच्या इतर नेत्यांनीही असे म्हटले होते की रुपया घसरणे म्हणजे देशाच्या प्रतिष्ठेची होणारी घसरण. आज डॉलर ९० रुपयांवर उभा आहे. आणि तेव्हा आरोप करणारे, प्रश्न विचारणारे सत्तेत आहेत.
तेव्हा पेट्रोल ६० रूपयाच्या वर गेले आणि इकडे देशात रामदेव बाबा, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन सारख्या सेलिब्रिटींना गरीबाच्या संसाराची काळजी वाटू लागली होती. आज तेच पेट्रोल १००च्या वर पोहोचले, पण कोणत्याही सेलिब्रेटीला आता गरिबांची चिंता वाटत नाही आणि गरिंबांची तर अजिबात तक्रार नाही.
परदेशातील काळ्या पैशाचा स्वप्नप्रकल्प तर पंतप्रधानांनी केव्हाच ‘अनइन्स्टॉल’ करून टाकला.आता कळतंय की परदेशी खात्यांत काळा पैसा नव्हे, तर चुकीच्या कल्पना जास्त होत्या.
बाजारातील रोख रक्कम कमी करण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली होती. पण आज बाजारात त्यावेळेपेक्षा दुप्पट रोख उपलब्ध आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची ही स्थिती आहे. वाढती व्यापार तूट. २०२४ चा सप्टेंबर: २४.६५ अब्ज डॉलर्स. २०२५ चा सप्टेंबर: ३२.१५ अब्ज डॉलर्स. आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये तब्बल ४१.६८ अब्ज डॉलर्स! या दराने ५०० अब्ज डॉलर्सची वार्षिक तूट. आणि चीनसोबतची तूट तर आधीच १०० अब्ज ओलांडलेली…
मग प्रश्न पाडतो, जेव्हा देश अधिकाधिक आयातीवर अवलंबून, रुपये कमकुवत, पेट्रोल महाग, तूट विक्रमी… तेव्हा स्वावलंबी भारताच्या गोष्टी कोणत्या आधारावर पुढे जात आहेत?
याचे उत्तर समाजाच्या सामूहिक स्मरणशक्तीत दडलेले आहे. दररोज नवा मुद्दा, दररोज नवा तमाशा, दररोज नवा शत्रू, दररोज नवे आश्वासन.
यात लोक इतके गुंतून राहतात की कालचे वचन आज लक्षात राहत नाही.
जेव्हा धर्माचा ध्वज उंच फडकत असतो, तेव्हा रुपयाचे घसरते मूल्य, पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि वाढत्या व्यापार तुटीबद्दल बोलणे हे धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी मानले जाऊ शकते.
शेवटी प्रश्न एकच, आपण देश विसरण्याची सवय लावून घेतोय का? की विसरायला भाग पाडलं जातंय ? कारण लोक विसरले की वचन देणाऱ्याचं काहीच बिघडत नाही, पण देशाचं मात्र बिघडतं.
: मनीष चंद्रशेखर वाघ


