
आपल्या देशात गाडीपेक्षा नंबर जास्त चमकला पाहिजे, अशी एक विचित्र परंपरा निर्माण झाली आहे. काहींना वाटतं की १, ७, ९ असे अंक त्यांच्या गाडीवर चमकले की रस्त्यावरची वाहतूक देखील त्यांना सॅल्युट करेल! आणि हा विश्वास इतका पक्का झाला आहे की लोक आता या अंकांसाठी कोट्यवधींची बोली लावायला तयार आहेत. म्हणजे गाडी साधी असो किंवा सेकंड हँड, नंबर मात्र ‘मिलियन-डॉलर’ हवा!
वाहतूक विभागालाही हे सगळं पाहून आनंद होत असेल. “बघा, आमच्या लहानशा नंबर प्लेटने लोकांची बुद्धी किती मोठी बनवली आहे!” पूर्वी ओळखी वापरून नंबर मिळत असे. पण आता नंबर मिळवण्यासाठी बोली लावावी लागते. आणि बोली लावताना लोकांना वाटत असावं की ते गाडीचा नंबर नव्हे, तर जणू ताजमहाल खरेदी करायला आलेत.
हरियाणातील हिसारमध्ये तर पराकाष्ठाच झाली. HR88B8888 या नंबरसाठी ५० हजारापासून सुरू झालेली बोली थेट १.१७ कोटी रुपयांवर पोहोचली. नंबरच्या चार आठांचा एवढा प्रभाव असेल, तर मग आठवड्यातल्या आठव्या दिवशी सुट्टी लागू, अशी मागणीही एखाद्या दिवशी होईल! धक्का बसण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्याने ही बोली लावली, तो अजूनही विचार करतोय की नंबर घ्यायचा की नाही. म्हणजे १.१७ कोटींपर्यंत जाताना काही विचार नाही, पण आता अचानक बुद्धीचा प्रकाश पडला!
नंबर न घेतल्यास त्याचं फक्त ₹४,५०० चे नुकसान होईल, ही हमी रक्कम. म्हणजे १ कोटींचे ‘नाटक’ करून शेवटी ४,५०० देऊन घरी जायचं. वाहतूक विभाग मात्र पुन्हा त्याच नंबरसाठी बोली प्रक्रिया सुरू करणार. म्हणजे विभागाचं काम पुनःपुन्हा चालू आणि लोकांचं नाटक पुन्हा पुन्हा!
म्हणून उपाय एकच, या नंबर प्लेटच्या ‘महाभारताला’ विराम देण्यासाठी सरकारने एका नंबरची कमाल किंमत ठरवली पाहिजे. आणि त्यातही एक नियम भारी नंबरची किंमत गाडीच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नको. म्हणजे जर गाडी १० लाखांची असेल, तर नंबर १२ लाखांचा नसावा! सध्या मात्र काही लोक नंबरसाठी पालक विकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकूणच, नंबर प्लेट हा वाहनाचा भाग की मान-सन्मानाचा शिरपेच? ही गफलत आता थांबायलाच हवी. नाहीतर उद्या एखादा 0001 नंबरसाठी आयुष्यभराचा पगार बोलीत घालेल आणि परत घरी जाऊन म्हणेल, “गाडी नाही, पण नंबर माझ्याकडे आहे!”
: मनीष चंद्रशेखर वाघ


