
भारतीय राजकारण म्हणजे पक्षांचा अखंड मेळा. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, नोंदणी केलेले हजारो नवोदित पक्ष; मतपेटीच्या अवकाशात सतत नवे तारे उगवत – मावळत असतात. मतांची जोड – तोड, गटांचे वाद, फुटी आणि त्यातून नव्या पक्षांची उभारणी. राजकारणाच्या या गोंधळात राजकीय स्थैर्य ही कल्पनाच आपल्याकडे दुर्मीळच.
पण या पार्श्वभूमीवर देशाच्या इशान्य टोकातून आश्चर्यचकित करणारा प्रयत्न पुढे येतो आहे. मेघालयचे कोन्राड संगमा आणि त्रिपुराचे प्रद्योत बर्मन हे दोन शक्तिशाली नेते. आपापल्या पक्षांच्या भिंती पाडून एकत्रित ‘वन नॉर्थ इस्ट’ नावाचं व्यासपीठ तयार करण्याच्या ध्यासात ते सध्या आहेत. ही तात्पुरती आघाडी असली, तरी उद्देश मोठा आहे. इशान्येतील जनतेच्या आवाजांची एकजूट, संघर्षांची संगत आणि विकासासाठी सामूहिक अजेंडा.
भाजपच्या प्रभावाखाली गेल्या दशकात इशान्येतील राजकारणाला एक विचित्र वळण मिळाले. पायाभूत सुविधांची उभारणी, प्रादेशिक पक्षांचे क्रमाक्रमाने भाजपशेजारी सरकणे, काँग्रेसचे क्षीण होणे; या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपचा तयार झालेला एकछत्री प्रभाव. या एकछत्री प्रभावालाच आता नव्या आघाडीचे आव्हान मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
अर्थात, हे सोपं नाही. स्थानिक जमातींची अस्मिता, प्रादेशिक पक्षांची दशकांपासूनची स्पर्धा, एकमेकांवरची अविश्वासाची सावली ही सगळी गुंतागुंत सुटणं म्हणजे मोठा ऐतिहासिक प्रयोगच. तरीही या प्रदेशातल्या तुकड्या तुकड्यात पसरलेल्या राजकीय पक्षांना एकत्र करून एकच राजकीय मंच तयार करण्याचा हा पहिला ठोस प्रयत्न आहे.
संगमा-बर्मन यांचं स्वप्न प्रत्यक्षात आलं तर भारतीय राजकारणात एका नव्या प्रादेशिक ध्रुवाची निर्मिती होण्याची बीजे रोवली जातील. आणि हा प्रवास यशस्वी झाला नाही, तरी तो इशान्येच्या बदलत्या राजकारणाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदला जाणार हे निश्चित.
: मनीष चंद्रशेखर वाघ


