ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन श्रीमंत होण्याची अनेकांची इच्छा असते. सामान्यांची ही इच्छा लक्षात घेऊन काही आंतरराष्ट्रीय टोळीनं फसवणूक करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. बनावट ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूकदारांना ओढून त्यांच्या खात्यावरील रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली जात असे. त्यांना कोणताही परतावा न देता मोठी फसवणूक केली जात असे. या प्रकरणाच्या अनेक तक्रारींची नोंद पोलिसांकडं करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांचा तपास सुरु होता. ठाणे पोलिसांनी यामध्ये आफताब इर्शाद ढेबर (वय 22), मनीषकुमार देशमुख ( वय 27) आणि हाफिज अहमद उर्फ भाईजान (वय 48) यांना अटक केलीय. यापैकी हाफिज हा दिल्लीतील रहिवाशी आहेत. हे तिघेही बनावट सीमाकार्ड प्रोव्हायडर असून नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या नावाने खोटे सिमकार्ड तयार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
या तिघांनी हे सिमकार्ड देशातील हरियाणा , राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा , गुजरात , केरळ, या राज्यात सिम कार्डची विक्री करत नागरिकांना फसवले आहे. त्याचबरोर 3 हजार सिमकार्डची दुबई, कंबोडिया, चीन या देशांमध्ये विक्री केल्याचंही तपासानंतर समोर आलं आहे.