मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जन्मलेल्या शिवसेनेने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे ब्रीद बरीच वर्षे जपले. परंतु संघटनेचा पक्ष झाला आणि जसजसे पक्षाचे वय वाढू लागले तसतसे ‘अस्मिता’ आणि ‘समाजकारण’ हे शब्दच शिवसेनेच्या रोजनिशीतून नाहिसे झाले. याची प्रचिती गेल्या काही वर्षांतील शिवसेनेची झालेली अधोगती पाहता नक्कीच येईल.
ज्या आक्रस्ताळपणे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे अपहरण केले आणि भाजपच्या मदतीने तो पक्ष आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह आपल्या नावे केले, तो या अधोगतीचा परिपाक म्हणावा लागेल. पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या ‘शिवसेना’ पक्षातील ‘यादवी’ची पहिली चुणूक पाहायला मिळाली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चांगली कामगिरी केली. परंतु आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होत आहेत. यात देशपातळीचा विचार न होता, स्थानिक समस्यांवर त्या लढवल्या जातात. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतील ‘यादवी’ पुन्हा एकदा पाहायला मिळणार असून या यादवीत कोणाची शिवसेना संपुष्टात येते, हेच बघणे आता बाकी आहे.
शिवसेनेतून नेते बाहेर पडणे हे नवीन नाही. यापूर्वीही अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले. अगदी राज ठाकरेंपासून गणेश नाईक, छगन भुजबळांपर्यंत अनेक जण बाहेर पडले. राज ठाकरे यांनी तर स्वतचा ‘मराठी बाण्या’चा आव आणत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला. पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कधीच संपली नाही. परंतु त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आणि भाजपला शह देण्याच्या नादात परंपरागत विरोधी पक्ष काँग्रेसशी त्यांनी हातमिळवणी केली आणि तिथेच शिवसेनेची दोन शकले झाली. शिंदेसेना आणि उद्धव सेना या दोघांमध्ये आता यादवी युद्ध या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पेटले आहे.
महाआघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात मौल्यवान असे नगर विकासखाते होते, पण त्यांना स्वातंत्र्य नव्हते. नगरविकास ‘खात्या’त आणि महापालिकांच्या ‘कारभारा’त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि परिवाराचा हस्तक्षेप वाढू लागला. इथेच एकनाथ शिंदे बिथरले. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मदतीने बाळासाहेबांच्या शिवसेनेची मोडतोड केली. पक्षाचे चाळीस आणि समर्थक दहा असे पन्नास आमदार, डझनभर खासदार घेऊन गुवाहटी गाठली आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आपला दावा ठोकला. निवडणूक आयोगानेही आमदार-खासदारांच्या संख्येच्या आधारावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ‘खरी’ ठरवली. पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह आयोगाने शिंदे यांना बहाल केले. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या व चालवायला अनुमती दिली व निवडणूक चिन्ह मशाल देण्यात आले.
येत्या विधानसभेत शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असे शिवसेनेतील यादवी युद्ध बघायला मिळणार आहे. विधानसभा निवडणूक म्हणजे ठाकरे व शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे. शिवसैनिक आणि मतदार कोणाच्या पाठीशी आहे याचा कौल या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यापासून ‘शिवसेना’ या बॅनरखाली दरवर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. इकडे ठाकरे तर तिकडे शिंदे. इकडे मशाल, तर तिकडे धनुष्यबाण दिसतो. दोन्हीकडे भगवे झेंडे फडकतअसतात. शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून वाढलेले नेते दोन्ही मेळाव्यांतून मंचावर दिसतात. मराठी मतदार मात्र हतबल होऊन या दोघांकडेही ‘मुख्यमंत्री’ म्हणून पाहात असतो आणि कोणता ‘भगवा’ घेऊ हाती याचा विचार करत उद्विग्न मनाने घरी परततो…
: मनीष चंद्रशेखर वाघ