‘मी पुन्हा येईन’ अशी गर्जना करीत देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर आले. त्यावेळच्या एकसंध शिवसेनेशी युती करत अडीच वर्षांचे मुख्यमंत्री झाले. परंतु अडीच वर्षे होऊनही मित्रपक्ष शिवसेनेला ठेंगा दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद काही सोडले नाही. त्यामुळे चवताळलेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडीशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवले आणि पुढे शिवसेने फुटीचे नाट्य घडले. शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांना आता मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले. परंतु देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्या सीएम पदाच्या स्वप्नात अडथळा ठरत होते. अखेर शिंदेही हट्टाला पेटले आणि मुख्यमंत्री पद नाही मिळाले, तर मी बाहेर पडतो असा निरोप भाजप हायकमांडला पोहोचवला. अखेर देवेंद्रजींना त्यांची ‘मी पुन्हा येईन’ ही गर्जना गिळावी लागली आणि शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागले. दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे ‘खरे’ अध्यक्ष ठरले.
याकाळात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱयाच उलथापालथ्या, माकडउड्या झाल्या आणि केवळ उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी देवेंद्रजींनी केलेल्या नाट्याचा बट्ट्याबोळ झाला. आता परिस्थिती त्यांच्याच नव्हे तर दिल्लीश्वरांच्याही हाताबाहेर गेली आहे. आता आपण पुन्हा येऊ पण मुख्यमंत्री होऊ का नाही याची शाश्वती नसल्याने देवेंद्रजी यांनी ‘मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही’ असे प्रसारमाध्यमांना सांगितले. परंतु महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न जसा महायुतीसमोर आहे तसाच तो महाविकास आघाडीसमोरही आहे.
निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला चालतील असा घोषा चालविणाऱया भाजपने आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा पुकारा करत मतदानाला 10-11 दिवस शिल्लक असतानाच भाजपचे सर्वात मोठे नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र निवडणुकीचे संपूर्ण समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेला एक सूक्ष्म संदेश देण्याचा प्रयत्न भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वासह कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या कमकुवत नेतृत्वामुळे ज्यांना महायुतीला मत द्यायचे नाही, त्यांनी फडणवीसांना मतदान करावे, असा संदेश शहा यांनी फडणवीसांना दिला. गेल्या आठवड्यात सांगलीतील सभेत त्यांनी दावा केला की, जनतेला ‘महायुती आणि फडणवीसांचे पुनरागमन’ पाहायचे आहे.
2019 मध्ये फडणवीसांच्या माध्यमातून शिवसेनेत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीही तुटली. फडणवीस यांनीच शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली आणि भाजप सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे सांगितले. तथापि, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा दाखला देत आणि सरकार “स्थिर” ठेवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील होण्यास “तयार” होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या असताना फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र अमित शहा यांनी फडणवीस यांची ऑफर धुडकावून लावली.
भाजपने निवडणुकीपूर्वी शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते. अशा स्थितीत मतदानापूर्वी भूमिका बदलल्यास निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. शिंदे यांनी मुख्यमंत्री होणार या अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती. पण भाजप आता खेळत आहे. अशा परिस्थितीत निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरच सर्व निर्णय घेतले जातील. मात्र, भाजपकडून शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सर्व उमेदवार पाठवले जात असतानाही या दोघांनाही भाजपची रणनीती कळली नाही. मात्र फडणवीस यांचे नाव पुढे आल्यानंतर भाजपची रणनीती आणि इरादेही स्पष्ट झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणूक आयोगावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण महाराष्ट्र आणि झारखंडचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. निवडणूक आयोगाने 26 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत बोलले असून ही अंतिम तारीख दिली आहे. याचा अर्थ 23 नोव्हेंबरला सर्व राजकीय पक्षांकडे हेराफेरीसाठी फक्त तीनच दिवस असतील. याचा फायदा भाजपला होईल, कारण मुंबईपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्याच्याकडे अनेक संसाधने उपलब्ध आहेत जी त्याच्यासाठी अनेक परिस्थिती निर्माण करू शकतात किंवा निर्माण करू शकतात.
: मनीष चंद्रशेखर वाघ