झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या ऐतिहासिक वाटचालीवर हा चित्रपट आधारित असून, ११ एप्रिल २०२५ रोजी म्हणजेच महात्मा फुले जयंतीला तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या संघर्षमय लढ्याची प्रेरणादायी कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या भूमिकेत दिसणार असून, पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘फुले’ हा केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेणारा चित्रपट नसून, तो सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणारा एक महत्त्वाचा सिनेमा ठरणार आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी जगभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.