आसिम मुनिर यांच्या वक्तव्याला पुष्टी मिळेल असे भारतीय का वागत आहेत?

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील बैसरन पठारावर दहशतवाद्यांनी गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात मृत पावलेल्या २६ जणांमध्ये २ परदेशी आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. आठवडा उलटून गेला तरी भारतीयांच्या मनातील संताप व चीड अद्याप ओसरली नाही. कठोरातली कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर द्यावे अशी सर्व भारतीयांची अपेक्षा आहे. त्यात काहीही गैर नाही. या पाश्र्वभूमीवर दहशतवादी हल्ल्यापूर्वीच्या घडलेल्या घटना विचारात घ्याव्याशा वाटतात.

बुधवार, १७ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भारताच्या फाळणीबद्दलचा सिद्धांत मांडताना पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर म्हणाले, “आपल्या पूर्वजांना वाटायचे की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपले धर्म वेगळे आहेत, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. तिथे रचलेल्या द्विराष्ट्रीय सिद्धांताचा हा पाया होता. आपण दोन राष्ट्रे आहोत, आपण एक राष्ट्र नाही. पाकिस्तानची गोष्ट आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगायला तुम्ही अजिबात विसरू नका.”

यानंतर त्यांनी काश्मिरचा मुद्दा आणला. जीना नेहमी उल्लेख करत असलेला ,”काश्मिर ही पाकिस्तानसाठी ‘जग्युलर व्हेन’ आहे याचा उल्लेख मुनिर यांनी परत परत केला. जनरल आसिम मुनिर यांची ही १७ एप्रिल रोजी ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये केलेली वक्तव्ये अत्यंत भडकावू होती. परंतु या वक्तव्यांचे विश्लेषण व त्यातील धोका जोखून सावधनता बाळगत सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची कृती काश्मीर मध्ये झाली असती तर दहशतवादी हल्ल्याला आळा बसला असता असं म्हणायला वाव आहे.

पहलगाम मधील बैसरन हे सीमेपासून जवळपास २०० कि.मी दूर आहे हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे. जेव्हा इतक्या आत येऊन दहशतवादी हल्ला होतो ही निश्चितच सुरक्षाविषयक काळजी करण्याची गोष्ट आहे. पोलिस वा सैनिकी वेषातला एकही कर्मचारी तिथे तैनात नव्हता ही गोष्ट तिथे गेलेले पर्यटक सांगत होते. बैसरन पर्यटकांसाठी खुले केल्याची गोष्ट स्थानिक प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणांना माहीतच नव्हते. दहशतवाद्यांना बैसरन पठार हे हल्ला करण्यासाठी मोकळे रान दिल्यासारखे झाले.

मुनिर यांनी त्यांच्या त्या भाषणात द्विराष्ट्र सिद्धांताचा आणि काश्मीरच्या मुद्याचा म्हणजेच भारतविरोधाचा आधार घेतला होता. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील फरक परत परत सांगण्यात आला. पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी भारताला हिंदू भारत ठरवले जाते. या हिंदू भारताला धोकादायक ठरवून भारताविरुद्ध हजारो वर्ष लढण्याची भाषा केली जाते. कट्टर इस्लामी अस्मिता व भारतद्वेष जोपासण्यासाठी हे सारे केले जाते. जीना यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा रेटा लावत ब्रिटीशांकडून मुस्लिम राष्ट्र म्हणून स्वतंत्र पाकिस्तान पदरात पाडून घेतला . तोडा फोडा व राज्य करा अशी नीती ठेवणाऱ्या ब्रिटिशांना ती गोष्ट हवीच होती. पाकिस्तान राष्ट्र म्हणून मिळाले पण मुस्लिम बहूल काश्मीर त्यांना मिळाले नाही. जीना यांनी पठाणांची फौज काश्मीवर आक्रमण करण्यासाठी वेगाने धाडली. राजा हरिसिंग यांच्याकडे लष्करी बळ अपुरे होते. पाकिस्तानच्या आक्रमणास तोंड देईल एवढे लष्कर राजा हरिसिंगाने भारताकडें मागितले. पंतप्रधान पंडित नेहरुनी राजा हरिसिंगाला भारतात सामील होण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्याची सूचना केली. राजा हरिसिंगापुढे अन्य कोणताही पर्याय न राहिल्याने तत्कालीन गृहमंत्री व संस्थान मंत्रालय प्रमुख सरदार पटेल यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांच्या उपस्थितीत राजा हरिसिंगानी सामीलनाम्यावर २६ ऑक्टोबर १९४७ रोजी स्वाक्षरी केली. यामुळे कायदेशीररित्या काश्मीर संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरण झाले. याची सल पाकिस्तानला अद्यापही आहे.

काश्मीर मधील मुसलमानांना फितूर करण्यासाठी पाकिस्तान हिंदू मुस्लिम द्वेष करत असतो. आजतागायत भारताविरुद्ध चार युद्धे/आक्रमणे करून सुद्धा पाकिस्तानला त्यात यश मिळालेले नाही. पाकिस्तानच्या सिंध ,खैबर व बलुचिस्तान या प्रांतात पंजाबी वर्चस्वा विरूद्ध आवाज उठवला जात आहे. प्रांतिक अस्मिता टोकदार होऊ नयेत म्हणून सुरूवातीपासून इस्लामी अस्मिता येन केन प्रकारे टोकदार करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असतो. जनरल मुनिर यांची वरील वक्तव्ये त्याचाच परिपाक आहेत.

काश्मीरची सुंदरता हा भारताच्या डोक्यावर असलेला ताज आहे. स्वतंत्र भारताची निर्मिती धार्मिक वा सांस्कृतिक आधारे न होता निधर्मी घटनात्मक राष्ट्र म्हणून झाली आहे. संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. पहलगाम च्या दुर्घटनेनंतर भारत देशात जो मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे तो मुनिर यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताला खतपाणी घालणारा आहे. पाकिस्तानचे ते षडयंत्र आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. भारत देशभर विखूरलेल्या मुस्लिमांना उध्वस्त करून आपण काय मिळवणार आहोत? आज आपल्या शेजारील नेपाळ व बांगला देश ही राष्ट्रे चीन धार्जिनी बनली आहेत.पाकिस्तान देखील चीन धार्जिणा होत आहे. अमेरिकेने छेडलेल्या व्यापार युद्धाविरूद्ध रशिया व चीन कमालीचे एकत्र येत आहे. मध्य आशिया मुस्लीम बहूल आहे. आज जातीपातीत फूट पडत चालली आहे. त्यात संविधान मानणारा एक गट व न मानणारा गट याची भर पडली आहे. मुस्लिम समाजाला हिंदू लक्ष्य करत गेले तर त्यांच्या समर्थनार्थ बांगला देश, चीन , पाकिस्तान व रशिया हे देश एकवटून एकत्रित पाठिंबा देऊ शकतात. जितके आपण हिंदू – मुस्लिम द्वेष अधिक करू तितके ते पाकिस्तानला सत्तेची पोळी भाजण्यासाठी हवे आहे. म्हणून म्हणावेसे वाटते की आपले मुस्लिम द्वेष पसरवण्याचे वर्तन जनरल मुनिर यांच्या वक्तव्याला पुष्टी देणारे आहे की काय? आपल्या डोक्यावरील सुंदरतेचा ताज आणखी सुंदर करण्यासाठी देशातील मुस्लिम बांधवांना हाताशी धरावे लागेल,वाट चुकलेल्यांना सन्मार्गावर आणावे लागेल, पाकिस्तानचे डावपेच हाणून पाडावे लागतील..

: मोरेश्वर बागडे

Leave a Comment

× How can I help you?