देश पोखरणारे ‘भक्त’

देशातील सध्याच्या परिस्थितीचा थेट फायदा पाकिस्तानला, त्याच्या संरक्षणाखाली वाढणाऱ्या दहशतवाद्यांना आणि भारतीय जनता पक्षाला होत आहे. आपल्या कृती पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना खूश करत आहेत हे लक्षात न घेता, स्वयंघोषित ‘देशभक्त’ भाजप समर्थक जगभरात भारताची प्रतिष्ठा खराब करत आहेत. खरे सांगायचे तर, पक्ष नेतृत्वाने एकेकाळी ‘स्प्लिंटर ग्रुप’ म्हणून संबोधलेले हे लोक स्वत:चा देश पोखरत आहेत.

देशाची सर्वात मोठी ताकद म्हणजे नागरी एकता, ती नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप हायकमांडने त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना हे समजावून सांगितले पाहिजे की पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांशी लढण्याची गरज आहे, देशात राहणाऱया मुस्लिमांशी नाही. त्यांच्या कृतींमुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारत एक विभाजित समाज म्हणून सादर होत आहे.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या प्रसिद्ध बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी 27 जणांची हत्या केली. एक-दोन वगळता, ते सर्व पर्यटक होते. या घटनेमुळे देशभरात आधीच प्रचलित असलेली मुस्लिमविरोधी मानसिकता आणखी तीव्र झाली आहे. पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, अशी अतिशयोक्ती केली जात आहे. जरी याची अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, भाजप-आरएसएस समर्थक आणि आयटी सेलने ते उचलले आहे आणि ते खरे असल्याचे सिद्ध करत आहेत. घटनेच्या काही क्षणातच, छत्तीसगड भाजपने एआय-जनरेटेड एक प्रतिमा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली, ज्यामध्ये एक नवविवाहित महिला तिच्या पतीच्या मृतदेहासोबत शोकाकुल दिसत आहे. त्यावर दिलेला नारा आहे- ‘धर्म विचारला गेला, जात नाही’. हे छायाचित्र प्रसिद्ध करण्याचा उद्देश स्पष्टपणे घटनेचा फायदा घेणे आणि ध्रुवीकरणाची प्रक्रिया वेगवान करणे हा होता.

या घटनेनंतर सोशल मीडियावर हिंदू आणि मुस्लिमांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. धर्माबद्दल विचारणे आणि नंतर गोळीबार करणे याबद्दल इतका प्रचार झाला की, मार्गदर्शक, घोडेस्वार इत्यादींनी स्वतचा जीव धोक्यात घालून मोठ्या संख्येने पर्यटकांचे प्राण वाचवले हे पाहून काही लोक अजिबात प्रभावित झाले नाहीत. तिथून परतलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ अनेक ठिकाणांहून येत आहेत ज्यात ते म्हणत आहेत की स्थानिक काश्मिरींनी त्यांचे प्राण वाचवलेच नाहीत तर त्यांना त्यांच्या घरात आश्रयही दिला. त्यांच्याकडून जेवण, राहण्याची व्यवस्था इत्यादींसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते; त्यांना बसस्थानकांवर आणि विमानतळांवर मोफत सोडण्यात आले. छत्तीसगडमधील चिरमिरी येथील 11 लोकांना वाचवणाऱया नजाकत अलीची कहाणी प्रसिद्ध होत आहे. यामध्ये भाजपशी संबंधित लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. दहशतवाद्यांकडून रायफल हिसकावण्याचा प्रयत्न करताना सय्यद आदिल हुसेन नावाचा घोडेवाला मारला गेला.

या सर्व गोष्टी मुस्लिमांचा द्वेष करणाऱया जमातीवर अजिबात परिणाम करत नाहीत. जो कोणी सांप्रदायिक सलोख्याबद्दल बोलत आहे तो टीकेचा विषय बनत आहे. अशा लोकांना देशद्रोही, पाकिस्तान समर्थक, हिंदूविरोधी आणि इतर अनेक म्हटले जात आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे असे नाही. देशात घडणाऱया प्रत्येक घटनेत समान वैचारिक विभागणी आणि तीव्र मतभेद दिसून येतात. फरक एवढाच आहे की यावेळी ते अधिक तीव्र आहे, काहीसे 2019 मध्ये पुलवामा घटनेसारखे. पहलगाम घटनेवर सरकारला प्रश्न विचारणायांना पुन्हा त्याच प्रकारे लक्ष्य केले जात आहे जसे तिहेरी तलाक, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे, राम मंदिर निर्णय, वक्फ कायद्यात सुधारणा इत्यादी वेळी दिसून आले होते. जरी जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या मुद्यावर सरकारच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये संघर्ष असतो, परंतु ज्या मुद्यांवर सांप्रदायिक आहेत, विशेषत जिथे हिंदू आणि मुस्लिम असे दोन पक्ष आहेत, तिथे हा संघर्ष मोठा आकार घेतो.

जर हे युद्ध फक्त सोशल मीडियावर चालू राहिले असते तर ठीक झाले असते. पण ते रस्त्यावर आले आहे. आग्रा येथे गोरक्षक गटाने गुलफाम नावाच्या व्यक्तीची हत्या केली आणि त्याच्या साथीदार सैफवर गोळीबार केला. जमावाच्या नेत्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ते ‘26 च्या बदल्यात 2600 मारतील’.

जयपूरमध्ये आमदार बालमुपुंद आचार्य यांच्या नेतृत्वाखाली जामा मशिदीत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. अंबालामध्ये मुस्लिमांची दुकाने फोडण्यात आली, त्यांच्या गाड्या उलटण्यात आल्या आणि कामगारांना मारहाण करण्यात आली. गुरुद्वारात आश्रय दिलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांनाही येथे मारण्यात आले. हाथरसमध्ये मंदिर बांधणाऱया कामगारांना त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले आणि जोधपूरच्या झलोरी गेट चौकात पोलिसांच्या उपस्थितीत मुस्लिमांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. गाझियाबादमधील एका गावात एका मुस्लिम फेरीवाल्याला हाकलून लावण्यात आले आणि डेहराडूनमध्ये हिंदू रक्षा दलाने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये म्हटले आहे की शहरात कोणताही काश्मिरी मुस्लिम दिसू नये. पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टरने ‘तुम्ही माझ्या धर्माच्या लोकांना मारता’ असे म्हणत एका मुस्लिम महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे म्हणतात, ‘ज्या व्यक्तीकडून तुम्ही वस्तू खरेदी करता त्याचा धर्म आधी शोधा.’

पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना देशात जातीय संघर्ष हवा आहे. तसेच घडतही आहे; आणि हे भाजपचे लोक देशातील मुस्लिमांच्या किंमतीवर करत आहेत, जे स्वत:ला ‘देशभक्त’ म्हणवतात. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार निवडणुकीत किमान त्याचा राजकीय फायदा घेता यावा म्हणून भाजपला हे वातावरण कायम ठेवायचे असेल अशी चर्चा आहे.

– मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?