
विशेष प्रतिनिधी :
बदलापूर गाव परिसरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती बांधकामे आणि त्यानुसार सुधारणा न झालेली सिव्हर व नाले व्यवस्था यामुळे पावसाळ्यात अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. राहतोली, ठाकूरवाडी, भोपी आळी, रोहिदास वाडा, गावदेवी परिसर तसेच मंजिरी हाइट्स आणि आसपासच्या भागांमध्ये डोंगरातून येणारे पावसाचे पाणी, अंडरपासमधून वाहणारे पाणी आणि गावातील नाले एकत्र येत असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, दिल्ली–मुंबई जेएनपीटी मार्ग परिसरात सुमारे ११ ते १२ मीटर उंचीचा रस्ता बांधण्यात आल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडतो. परिणामी डोंगरातून येणारे पाणी आणि गावातील नाल्यांचे पाणी अंडरपासच्या मार्गाने किंवा इतर ठिकाणी साचते. विशेषतः पावसाळ्यात या भागात पाण्याचा निचरा होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
गावातील विविध भागांतील नाले मंजिरी हाइट्स परिसरातील एका ठिकाणी एकत्र येतात. ठाकूरवाडी, गणेश सिम्फनी, लेक व्ह्यू, पांढरा पूल, मजरी हाइट्स परिसरातील नाले तसेच भोपी आळी, चुबळे ठाकरे घर, पराजपे स्कूल, पिसेकर घर परिसरातील पाणी याच भागात जमा होते. त्याचप्रमाणे रोहिदास वाडा, मच्छी मार्केट, झुंजारराव आग्रे परिसर, विष्णू वाटिका तसेच गावदेवी, बौद्ध वाडा आणि डीपी रोड परिसरातील नाल्यांचे पाणी देखील या मुख्य नाल्यात मिसळते.
मात्र या ठिकाणी असलेला नाला आकाराने लहान असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात येणारे पाणी पुढे वाहून नेण्यात अडथळे निर्माण होतात. काही भागात पीसीसी बांधकाम किंवा सुरक्षात्मक भिंत नसल्याने पाणी आजूबाजूच्या भागात पसरते. परिणामी घरांच्या आसपास, शेतजमिनीत आणि रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार घडतात. काही ठिकाणी पाणी दीर्घकाळ साचून राहिल्याने स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असल्याचे नागरिक सांगतात.
बदलापूर गावात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली असून लोकसंख्या सुमारे पाच पट वाढल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे. मात्र त्यानुसार नाले, गटार आणि सिव्हर व्यवस्था यामध्ये पुरेशा प्रमाणात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे गावातील सर्व नाले, डोंगरातून येणारे पाणी आणि पावसाचे पाणी एकत्र आल्यावर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होतात.
आमदार रस्ता, पवार–चुबळे परिसर, बाजारपेठ, गावदेवी मोहल्ला, वाडोधरा अंडरपास परिसर तसेच डीपी रोड आणि मॅपल सिटी परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण वाढते. या भागातील नाले अरुंद असल्याने सर्व पाणी एकाच वेळी पुढे वाहून नेणे शक्य होत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
याच पार्श्वभूमीवर काही स्थानिकांनी मंजिरी हाइट्स परिसरातील मुख्य नाल्याचे रुंदीकरण करणे, दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षणभिंत उभारणे तसेच गावदेवी परिसरापर्यंत खोल नाला तयार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच ज्या ठिकाणी एसटीपीचा पंपिंग स्टेशन आहे त्या भागाशी सुसंगत अशी सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याची व्यवस्था विकसित करण्याची गरज असल्याचेही सांगितले जाते.
दरम्यान, बदलापूर शहरात सुरू असलेल्या विकासकामांसोबतच स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्रकल्पाची सुरुवात बदलापूर गाव परिसरातून करण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना गावातील जुन्या नाल्यांचा इतिहास, पाण्याचे नैसर्गिक मार्ग आणि नागरिकांकडून मिळणारी स्थानिक माहिती यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल.
एकूणच, बदलापूर गावातील वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारा शहरी विकास यामुळे पाणी निचरा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. आगामी काळात पावसाळ्यातील समस्या टाळण्यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक नियोजन करून नाले, गटार आणि स्ट्रॉम वॉटर व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त केले जात आहे.


