एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी खोपट डेपोवर ज्येष्ठ नागरिकांचे पहाटेपासून हेलपाटे

ठाणे प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कडून एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ठाण्यातील खोपट डेपो येथे सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पहाटे चार वाजल्यापासून नागरिक डेपोबाहेर रांगा लावत असूनही अनेकांना टोकन न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

एसटीकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ६५ वर्षांवरील सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक, १८ वर्षांवरील महिला, तसेच विद्यार्थी, दिव्यांग आणि इतर लाभार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी संबंधित लाभार्थ्याला आधारकार्डसह स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. दररोज सकाळी ९.३० वाजता केवळ १२० टोकनचे वाटप केले जाते.

मात्र टोकन मिळविण्यासाठी दररोज सुमारे २०० ते २५० नागरिक पहाटेपासूनच रांगेत उभे असतात. परिणामी अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना तासन्तास प्रतीक्षा करूनही टोकन मिळत नाही. काहींना सलग दोन-तीन दिवस फेऱ्या माराव्या लागत आहेत. दिवसभर चौकशीसाठीही नागरिकांची गर्दी होत असल्याने डेपो परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होते.

पहाटेच्या सुमारास डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सवलतीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, पूर्वीच्या काही गैरप्रकारांमुळे प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेत खबरदारी वाढविली असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राच्या वतीने खोपट डेपो येथे अतिरिक्त खिडक्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी इंटरनेट सुविधा, संगणक, प्रशिक्षित कर्मचारी, पुरेसा विद्युत पुरवठा व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने अतिरिक्त खिडक्या सुरू करून नियोजनबद्ध पद्धतीने नोंदणी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Recent Posts