
भाईंच्या ठाण्यात आता नेमके कोणाचे राज्य आहे, हा प्रश्न ठाणेकरांनी विचारायचा तरी कोणाला? एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे सैनिक आदराने किंवा लाडाने ‘भाई’ असे संबोधतात. इथे भाई म्हणजे मोठा भाऊ असा सर्वमान्य अर्थ. पण याच ‘भाई’ शब्दाचा दुसरा अर्थही आहे. तो म्हणजे गुन्हेगारी जगतातील दादा, टोळीचा प्रमुख, दहशत निर्माण करणारा गुंड!
आज ठाण्याची परिस्थिती पाहिली तर या दोन्ही अर्थांमधला विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे. एकीकडे ठाण्याच्या सैनिकांचा ‘भाई’ राज्याच्या सत्तेच्या केंद्रात आहे आणि दुसरीकडे ठाण्याच्या रस्त्यांवर छोटे-मोठे ‘भाई’ मोकाट सुटल्याचे चित्र दिसत आहे.
वागळे इस्टेटमध्ये भररस्त्यात कोयत्याने हल्ला करून हत्या झाली. चितळसर परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू झाला. आणि मानपाड्यात उद्धवसेनेच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना तर ठाण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
खारटन रोडपासून गावदेवी मैदानापर्यंत, तलावपाळीपासून वागळे पासपोर्ट ऑफिस रोडपर्यंत, चितळसर-मानपाड्यापासून रामनगर, वागळे डेपो, वर्तकनगर आणि पुन्हा मानपाड्यापर्यंत; मारामाऱ्या, हल्ले, दहशत आणि रक्तपाताच्या घटना वारंवार चर्चेत येत असतील, तर हा केवळ गुन्हेगारीचा प्रश्न न राहता शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनतो. आणि या ‘भाई’ना इतके निर्भय होण्याची हिंमत कुठून मिळते? हाही एक प्रश्न आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अधिकृत आकडेवारीत २०२५ मध्ये ठाणे झोनमध्ये २,४१३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. वागळे झोनमध्येही १,६५९ प्रकरणांची नोंद आहे. आकडेवारीचा अर्थ प्रत्येक घटना ‘गुंडगिरी’ अशी लावता येणार नाही; परंतु शहरात कायदा-सुव्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या सार्वजनिक चिंतेकडे दुर्लक्षही करता येणार नाही आणि इथेच ठाण्याच्या ‘भाई’कडे प्रश्न जातो.
एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत. ठाणे ही त्यांची राजकीय कर्मभूमी आहे, बालेकिल्ला आहे. ठाण्याने त्यांना मोठे केले आणि ठाण्यावर त्यांचा प्रभाव आजही निर्विवाद आहे. मग ठाण्यात सामान्य माणूस सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्न त्यांच्या प्राधान्यक्रमात नेमका कुठे आहे?
राज्याच्या सत्तेची जबाबदारी मोठी आहे. दिल्लीच्या राजकारणापासून राज्याच्या सत्ताकारणापर्यंत अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. पण सत्ता कितीही मोठी झाली तरी आपल्या शहराकडे पाठ फिरवण्याची मुभा लोकप्रतिनिधींना लोकशाही देत नाही. आपली सत्ता, खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्या कितीही मारा, पण ठाण्याच्या गल्ल्यांमध्ये भीती निर्माण झाली तर त्या भीतीचा आवाज जरा ऐकत जा, असे ठाणेकर आता बोलू लागले आहेत.
ठाणेकरांना विकास हवा आहे, मोठमोठे प्रकल्प हवेत, रस्ते हवेत, मेट्रो हवी, वाहतूक सुधारणा हव्यात. पण या सगळ्यापेक्षा आधी हवे आहे ते सुरक्षित शहर! रात्री घरी परतणाऱ्या तरुणाला रस्त्यावर कोणाचा धाक असणार नाही, दुकान बंद करून जाणाऱ्या व्यापाऱ्याला कोणाची भीती वाटणार नाही, सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकाला अचानक हल्ल्याची चिंता असणार नाही आणि पोलिसालाही गुन्हेगाराचा पाठलाग करताना स्वतःच्या जीवाची किंमत मोजावी लागणार नाही. हे राज्यव्यवस्थेचे किमान कर्तव्य आहे.
मग प्रश्न पडतो की ठाण्यात पोलिसांचा धाक आहे की गुन्हेगारांचा? कायद्याचे राज्य आहे की ‘भाईगिरी’चे? सामान्य नागरिक सुरक्षित आहे की दहशतीखाली ?आणि सर्वांत महत्त्वाचे, ठाण्याचा लाडका ‘भाई’ ठाण्याकडे पाहणार तरी कधी?
ठाण्यात एखादी घटना घडली की दोन दिवस राजकीय प्रतिक्रिया उमटतात. निषेध होतो. पोलिसांना कारवाईचे आदेश दिले जातात. आरोपी पकडले जातात. पत्रकार परिषद होते. मग काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना. ही साखळी तोडायची असेल तर केवळ आरोपी पकडून चालणार नाही. गुन्हेगारी टोळ्यांची मुळे, त्यांना मिळणारा राजकीय किंवा सामाजिक आश्रय, स्थानिक पातळीवरील दबाव आणि पोलिसांवरील कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप, या सगळ्यांवर कठोरपणे हात घालावा लागेल.
हे ठाणे आनंद दिघे यांचे आहे. हे लाखो ठाणेकरांचे शहर आहे. हे ठाणे कोणत्याही ‘भाई’चे खासगी साम्राज्य नाही. ‘भाई’ हा शब्द प्रेमाने, आदराने घेतला जात असेल तर त्या प्रेमाची पहिली जबाबदारी ठाणेकरांच्या सुरक्षिततेची असली पाहिजे. आणि जर ‘भाई’ या शब्दाचा अर्थ गुन्हेगारी दहशत निर्माण करणारा दादा असा होत असेल, तर अशा प्रत्येक ‘भाई’ला कायद्याने त्याची जागा दाखवलीच पाहिजे. सत्तेच्या खुर्चीला धोका निर्माण होऊ नये म्हणून दिल्लीच्या वाऱ्या करताना ठाण्याच्या रस्त्यांवरचा धाक कोणाचा वाढतोय, हेही पाहावे लागेल. कारण सत्ता टिकवण्यापेक्षा शहराचा विश्वास टिकवणे मोठे असते.
आज ठाणेकरांचा प्रश्न साधा आहे, ‘भाई, तुमचे ठाणे नेमके कोण चालवत आहे?’ या प्रश्नाचे उत्तर जर सत्तेने दिले नाही, तर रस्त्यावरचे ‘भाई’ स्वतःच त्या प्रश्नाचे उत्तर देऊ लागतील. पण तेव्हा उशीर झालेला असेल.
: मनीष चंद्रशेखर वाघ