
लोकशाहीत मतदान हा जबाबदारीचा संस्कार असतो. मतदानाचा अधिकार बजावताना मतदाराने जागरूकता, सजगता आणि नियमांचे भान राखणे अपेक्षित असते. विशेषतः शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदारांकडून तर या अपेक्षा अधिक असतात. कारण या मतदारसंघांचे वैशिष्ट्यच मुळी सुशिक्षित मतदार हे आहे. मात्र, महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीत बाद ठरलेल्या मतांची आकडेवारी पाहता शिक्षण आणि मतदानविषयक सजगता यांचा परस्परसंबंध पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली आहे. पदवीची प्रमाणपत्रे असली म्हणजे लोकशाही प्रक्रियेचे आकलनही असेलच, असे नाही, हे या निकालाने अधोरेखित केले आहे.
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सर्वसाधारण निवडणुकांपेक्षा वेगळी असते. येथे मतदाराला मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवावा लागतो. आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर अंकांमध्ये ‘१’ लिहिणे आणि त्यानंतर अन्य उमेदवारांसाठी पुढील पसंतीक्रम नोंदविणे, ही या मतदानाची पद्धत आहे. ही प्रक्रिया काही फारशी क्लिष्ट नाही. निवडणूक आयोगाकडून त्याबाबत सूचना दिल्या जातात. उमेदवारांचे प्रतिनिधीही मतदारांपर्यंत मतदानाची पद्धत पोहोचवतात. तरीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मते बाद होणे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
नुकत्याच झालेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १५ हजार ३२ मते अवैध ठरल्याची बातमी समोर आली आहे. शिक्षक मतदारसंघातही कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती दिसून आली. कोणी मतपत्रिका कोरी ठेवली, कोणी पसंतीक्रमाऐवजी ‘राईट’ची खूण केली, तर कोणी अंकाभोवती गोल काढला. काहींनी उमेदवाराचा मतपत्रिकेवरील क्रमांक हाच पसंतीक्रम समजून लिहिला. या चुका केवळ तांत्रिक वाटत असल्या, तरी त्यामागे मतदान पद्धतीविषयीचे अपुरे आकलन स्पष्टपणे दिसते.
शिक्षक म्हणजे समाजाला ज्ञान देणारा घटक आणि पदवीधर म्हणजे शिक्षणाची उच्च पातळी गाठलेला नागरिक. अशा मतदारांकडून मतदानाच्या मूलभूत सूचना पाळल्या जात नसतील, तर शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबरच नागरिकत्वाच्या जाणिवांचाही विचार करावा लागेल. औपचारिक शिक्षण आणि व्यावहारिक शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पदवी मिळविणे आणि लोकशाही प्रक्रियेची समज विकसित होणे यांत अंतर असू शकते, हे या घटनेतून दिसते.
बाद ठरलेले प्रत्येक मत म्हणजे लोकशाही प्रक्रियेतून निष्प्रभ ठरलेला एक आवाज आहे. कदाचित त्या मतामागे एखाद्या उमेदवाराला निवडून देण्याची प्रामाणिक इच्छा होती; पण पद्धतीच्या अज्ञानामुळे ती व्यक्तच होऊ शकली नाही. त्यामुळे या आकडेवारीकडे केवळ निवडणुकीतील तांत्रिक चूक म्हणून पाहता कामा नये. ती आपल्या लोकशाही साक्षरतेपुढील प्रश्नचिन्ह आहे. पदवीचा अभिमान बाळगण्यापेक्षा मतदानाचे भान जपणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण सुशिक्षित असणे ही वैयक्तिक पात्रता असू शकते; पण सजग मतदार असणे ही लोकशाहीप्रतीची सामाजिक बांधिलकी आहे. ती जपली गेली, तरच शिक्षणाचे खरे सार्थक होईल.
: मनीष चंद्रशेखर वाघ