
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी अमेरिकेतील संग्रहालये, शिक्षण आणि संशोधन केंद्रांचा अभ्यास करणाऱ्या ‘स्मिथसोनियन’ या संस्थेने केलेलया संशोधनावरून एक अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालानुसार, गेल्या ४० ते ८० कोटी वर्षांत चंद्राची त्रिज्या सुमारे ४५ मीटरने कमी झाली असावी. इतकी कोट्यवधी वर्षे आणि चंद्राचे इतकेच कमी आकुंचन; असे आपल्याला वाटू शकते, पण या प्रक्रियेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर प्रचंड मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत असून चंद्रकंपने वाढू लागल्याचे निदर्शनास येत आहे.
हे सगळे आज सांगायचे कारण म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमा. आज आकाशात नेहेमीसारखाच पूर्ण चंद्र उगवेल आणि त्याच्या दुधाळ प्रकाशात अवघी सृष्टी न्हाऊन निघेल. कुणाच्या हातात मसाला दुधाने भरलेले ग्लास असतील, कुठे गप्पा रंगतील, तर कुणाच्या मनात चंद्रप्रकाशात भिजलेल्या आठवणींची गर्दी असेल.
यंदा या पूर्ण चंद्राकडे पाहताना मनात एक वेगळाच विचार येतोय. ज्या चंद्राला आपण शतकानुशतकं प्रेमानं न्याहाळलं, ज्याच्या प्रकाशात प्रेमकविता लिहिल्या, ज्याला आपल्या सुखदुःखांचा साक्षीदार मानलं, त्याच चंद्राच्या अंगावर आता विज्ञान आकुंचनाच्या खुणा शोधतंय. त्याच्या पृष्ठभागावर सुरकुत्या उमटत आहेत, त्याच्या अंतरंगात बदल घडत आहेत आणि त्याच वेळी माणसाची पावलं त्याच्यापर्यंत वारंवार पोहोचत आहेत.
कोजागिरीच्या रात्री आपण चंद्राकडे पाहून समृद्धीची, सुखाची आणि आनंदाची कामना करतो. पण या पौर्णिमेला चंद्राकडे आणखी एक मागणं मागावंसं वाटत की माणसाला बुद्धी मिळाली, विज्ञान मिळालं, अंतराळात झेप घेण्याचं सामर्थ्य मिळालं; आता त्याला आपल्या सामर्थ्याच्या मर्यादाही समजू देत. आपल्या अमिट महत्त्वाकांक्षेच्या जोरावर तो जरूर चंद्रावर पोहोचला… पण आता त्याच्यावर वस्ती शोधून मालकी हक्क गाजवण्याचा हव्यास नको. त्याच्या भूमीचा शोध घेऊया, पण पृथ्वीवर केलेल्या चुका पुन्हा तिथं नेऊ नयेत, एवढं भान तरी राहू दे.
आज पूर्ण चंद्र आहे. त्याच्या प्रकाशात सहजपणे जाणवतील अशा काही उणिवा जाणवत नाहीत. पण विज्ञान सांगतं, त्याचा आकार हळूहळू कमी होतोय आणि माणसाच्या मनात एक प्रश्न उभा राहतो, ज्या चंद्राकडे पाहून आपण समृद्धीची स्वप्नं पाहतो, त्याच चंद्राचं भविष्य आपल्या महत्त्वाकांक्षेच्या सावलीत हरवणार तर नाही ना?
या कोजागिरीला चंद्राचं सौंदर्य डोळ्यांत साठवताना त्याचं अस्तित्व जपण्याची जाणीवही मनात साठवूया. कारण चंद्रप्रकाशाचा खरा आनंद त्याच्यावर पाऊल ठेवण्यात नाही, तर त्याच्याकडे पाहताना मनातली माणुसकी उजळून निघण्यात आहे…
आज रात्री जेव्हा आपण आकाशात चंद्राकडे पाहू तेव्हा, तो विरहातल्या प्रेयसीचा सखा वाटेल, कोणाला आईच्या अंगाईगीतामधला लाडका मामा, तर कोणाला काळोखातली रुपेरी चंद्रकोर दिसेल. चंद्राचं असणं आपल्या जगण्यात इतकं सहज मिसळलं आहे की त्याच्या अस्तित्वाकडे आपण कधी गांभीर्यानं पाहिलंच नाही. तो उगवतो, आपल्याला दिसतो, आपल्या भावविश्वात उतरतो आणि पुन्हा मावळतो. शतकानुशतकं हे असंच सुरू आहे.
पण आता विज्ञान एक वेगळीच बातमी देतंय. ‘होय, चंद्र आकुंचित होतोय!’ चंद्राच्या अंतरंगात आजही बदल घडत आहेत. सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेला चंद्र हळूहळू आपली अंतर्गत उष्णता गमावत आहे. त्याचं अंतरंग थंड होत चाललं आहे. तापमान कमी होत असताना त्याच्या आतील भागाचं आकारमान घटतंय आणि त्याचा परिणाम बाह्य कवचावर जाणवू लागलाय. पृथ्वीवरील द्राक्ष वाळून मनुका झाल्यावर त्याच्या सालीवर जशा सुरकुत्या पडतात, तसंच काहीसं चंद्राच्या पृष्ठभागावर घडतंय. त्याच्या पृष्ठभागावर भेगा पडतायत. काही ठिकाणी जमिनीचे भाग एकमेकांवर घासून लहान-मोठे कडे तयार होतायत. या हालचालींमधून चंद्रावर भूकंपही होऊ शकतात. वैज्ञानिक भाषेत त्यांना ‘मूनक्वेक्स’ म्हणतात.
एकेकाळी चंद्र आपल्यासाठी दूरवरचा स्वप्नाळू प्रदेश होता. तिथं जाण्याची कल्पना म्हणजे परीकथेतल्या राजकुमारानं चंद्र मागण्यासारखीच होती. चंद्राला हात लावता येईल, तिथल्या मातीत पाऊल उमटवता येईल, अशी स्वप्नं पाहणंही माणसाच्या कल्पनाशक्तीचा सर्वोच्च आविष्कार होता. मग विज्ञानानं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या.
१९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि माणसाच्या इतिहासात एक नवं पान लिहिलं गेलं. चंद्रावर उमटलेलं ते पाऊल केवळ एका अंतराळवीराचं नव्हतं; ते मानवी बुद्धिमत्तेचं, जिज्ञासेचं आणि अथक प्रयत्नांचं प्रतीक होतं. त्यानंतर चंद्रावर मोहिमा गेल्या. त्याच्या पृष्ठभागाचे नकाशे तयार झाले. त्याच्या मातीचा अभ्यास झाला. त्याच्या अंतरंगातील हालचालींचे पुरावे मिळाले. आता तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशांमध्ये भविष्यातील मानवी मोहिमांसाठी योग्य जागा शोधल्या जात आहेत. चंद्रावर दीर्घकाळ राहण्याची, संशोधन केंद्रं उभारण्याची आणि पुढच्या अंतराळ मोहिमांसाठी त्याचा तळ म्हणून वापर करण्याची स्वप्नं पाहिली जात आहेत.
माणसाची झेप कौतुकास्पद आहे, यात शंका नाही. पण यामुळे आपण चंद्राकडे संशोधनासाठी चाललो आहोत, की पृथ्वीवर केलेल्या अतिक्रमणाचा विस्तार करण्यासाठी? हा प्रश्न उभा राहतो. हा प्रश्न विज्ञानाला विरोध करण्यासाठी नाही. चंद्रावर जाणं चुकीचं आहे, असंही नाही. उलट, चंद्राचा अभ्यास मानवजातीला विश्वाची उत्पत्ती, ग्रहांची निर्मिती आणि पृथ्वीच्या भविष्याबद्दल महत्त्वाचं ज्ञान देऊ शकतो. पण ज्ञान मिळवण्याची इच्छा आणि एखाद्या प्रदेशावर मालकी गाजवण्याची महत्त्वाकांक्षा यांत फरक असतो.
आपण पृथ्वीचं काय केलं? नद्यांना आपण आपल्या सोयीचे प्रवाह दिले. डोंगरांना सुरुंग लावून एक्सप्रेस वे बनवले. विकासाच्या नावाखाली जंगलाच्या कत्तली केल्या. सेकण्ड होम्स, रीसॉर्टच्या नावाखाली समुद्राच्या किनाऱ्यांवर काँक्रीटची जंगलं उभी केली. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची किंमत ठरवली. आकाशातही धुराचे पडदे उभे केले.
निसर्गानं दिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण ‘साधन’ म्हणून पाहिलं. तिच्या उपयोगाचा हिशेब मांडला. तिच्यावर आपला हक्क असल्यासारखं वागलो आणि जेव्हा निसर्गानं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, तेव्हा त्याला ‘संकट’, ‘आपत्ती’ म्हणत त्यावर उपाय शोधू लागलो. आता पृथ्वीवरची जागा अपुरी पडू लागल्यावर आपली नजर चंद्राकडे वळली आहे.
पृथ्वीवरच्या जमिनीच्या वाटण्या पुरेशा नाहीत म्हणून आता चंद्रावरच्या जमिनीची स्वप्नं रंगवायची का? पृथ्वीवरच्या साधनसंपत्तीवरून संघर्ष करणारा माणूस चंद्रावर पोहोचल्यावर अधिक समंजस होईल, याची खात्री काय? चंद्रावर पाणी असेल, खनिजं असतील, संशोधनासाठी उपयुक्त साधनं असतील, तर त्यांचा शोध घेणं स्वाभाविक आहे. पण शोध घेणं आणि ताबा मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज चंद्रावरच्या मोहिमा वैज्ञानिक सहकार्याची नवी दारं उघडत आहेत; उद्या तिथल्या साधनसंपत्तीवरून स्पर्धा उभी राहिली, तर?
पृथ्वीवरच्या सीमारेषा आकाशातून दिसत नाहीत, असं अंतराळवीर सांगतात. वरून पाहिल्यावर देशांच्या सीमा नाहीत, धर्मांच्या भिंती नाहीत, भाषांचे तट नाहीत. दिसते ती एक निळी पृथ्वी. तिच्याभोवती पसरलेला अथांग काळोख आणि त्या काळोखात चमकणारा चंद्र. पण पृथ्वीवर परतल्यावर आपण पुन्हा त्याच सीमा आखतो. पुन्हा भिंती बांधतो. पुन्हा मालकी सांगतो. मग चंद्रावर गेल्यावर आपण बदलणार आहोत, की पृथ्वीवरच्या आपल्या सवयीच सोबत घेऊन जाणार आहोत?
कधी कधी वाटतं, चंद्राच्या पृष्ठभागावर उमटलेल्या त्या मानवी पावलांकडे चंद्रानेही पाहिलं असेल. कोट्यवधी वर्षं शांतपणे फिरणाऱ्या या उपग्रहाला पहिल्यांदा कदाचित माणसाच्या आगमनाचं आश्चर्य वाटलं असेल. पृथ्वीवरून त्याच्याकडे पाहणाऱ्या एका जीवाला अखेर त्याच्यापर्यंत पोहोचता आलं, याचं कौतुकही वाटलं असेल. पण त्यानंतर? पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोहिमा, वाढत जाणारी यंत्रं, पृष्ठभागावर उमटणाऱ्या नव्या खुणा आणि त्याच्या अंतरंगात डोकावण्याची मानवी जिज्ञासा!
चंद्राला बोलता आलं असतं, तर कदाचित त्यानं विचारलं असतं, “माणसा, माझ्यापर्यंत पोहोचण्याची तुझी जिद्द मला मान्य आहे. पण तू इथं आलास, ते मला समजून घेण्यासाठी की मलाही तुझ्या मालकीच्या यादीत नोंदवण्यासाठी?” हा प्रश्न काल्पनिक आहे. चंद्राला भावना नाहीत, हे आपल्याला माहीत आहे. पण माणसाच्या महत्त्वाकांक्षेला प्रश्न विचारण्यासाठी कधी कधी निसर्गाला मानवी आवाज द्यावा लागतो आणि म्हणूनच चंद्राच्या आकुंचनाची बातमी एका वेगळ्या अर्थानं अस्वस्थ करतं.
चंद्राच्या अंतरंगातील उष्णता कमी होतेय, म्हणून त्याचा आकार हळूहळू घटतोय. त्याच्या पृष्ठभागावर भेगा पडताहेत. त्याच्या अंगावर सुरकुत्या उमटताहेत. हा निसर्गाचा अब्जावधी वर्षांपासून सुरू असलेला प्रवास आहे. त्यात माणसाचा दोष नसेलही; पण माणसाच्या मनातली महत्त्वाकांक्षा मात्र किती वेगानं वाढतेय! त्याला जे दिसतं, ते मिळवायचं आहे. जे दूर आहे, ते जवळ आणायचं आहे. जे अज्ञात आहे, ते जाणून घ्यायचं आहे. आणि जे मिळवलं आहे, त्यावर आपला हक्क प्रस्थापित करायचा आहे.
या सगळ्यात ज्ञानाची ओढ आहे, पण सत्तेची ओढही आहे. शोधाची जिज्ञासा आहे, पण विस्ताराची महत्त्वाकांक्षाही आहे. कदाचित म्हणूनच चंद्राच्या आकुंचनाची बातमी ऐकताना, वाचताना त्याच्या आकारापेक्षा माणसाच्या मनाचा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो.
चंद्र लहान होतोय, पण माणसाच्या इच्छा लहान होत नाहीत. चंद्राच्या पृष्ठभागावर भेगा पडताहेत, पण माणसाच्या मनातील हव्यासाला मात्र कुठलीच सीमा दिसत नाही. तरीही, रात्री जेव्हा चंद्र आकाशात उगवतो, तेव्हा तो आपल्याला आजही तितकाच सुंदर वाटतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या डागांना आपण अजूनही सौंदर्याची उपमा देतो. त्याच्या प्रकाशात प्रेमकविता लिहितो. त्याच्याकडे पाहून आपल्या माणसांची आठवण काढतो.
आपण त्याच्यावर पोहोचलो आहोत; पण त्याच्याकडे पाहताना आपल्या मनात जी हळवी भावना जागी होते, तिच्यापर्यंत आपण अजूनही पोहोचू शकलो आहोत का? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. कारण अंतराळ जिंकणं आणि स्वतःच्या हव्यासावर विजय मिळवणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीसाठी आपल्याला रॉकेट्स, संगणक, यंत्रं आणि वैज्ञानिक बुद्धिमत्ता लागते. दुसऱ्या गोष्टीसाठी लागते संवेदनशीलता, विवेक आणि आपल्या मर्यादांची जाणीव.
चंद्रावर जाण्यापूर्वी माणसानं स्वतःच्या मनात डोकावून पाहायला हवं, असं म्हणणं कदाचित आदर्शवादी वाटेल. पण पृथ्वीला आपण ज्या वळणावर आणून ठेवलं आहे, तिथं हा आदर्शवादही आता आवश्यक वाटतो.
चंद्र आकुंचित होतोय, ही वैज्ञानिक वस्तुस्थिती आहे. त्यामागे त्याच्या अंतरंगातील उष्णता कमी होण्याचं कारण आहे. पण त्या बातमीच्या निमित्तानं आपल्याला स्वतःच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेचाही विचार करता येतो. चंद्राला आपल्याकडे ओढून घेण्याची गरज नाही. त्याच्या जवळ जाऊन त्याला समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या भूमीवर पाऊल ठेवण्याचा आनंद जरूर साजरा करावा; पण त्या पावलामागे मालकीची भाषा उभी राहणार नाही, याची काळजीही घ्यावी.
अवकाश कितीही मोठं असलं, तरी मानवी हव्यासाला मर्यादा घातल्या नाहीत, तर एक दिवस तिथंही संघर्षाच्या सीमा आखल्या जातील. आज चंद्र आकुंचित होतोय. उद्या त्याच्या पृष्ठभागावर आणखी मानवी पावलं उमटतील. नवी यंत्रं उतरतील. नवी स्वप्नं आकार घेतील. कदाचित एक दिवस तिथं मानवी वसाहतीही उभ्या राहतील. त्या दिवशी चंद्राकडे पाहताना आपण केवळ आपल्या विज्ञानाचा विजय पाहणार आहोत, की आपल्या विवेकाचीही परीक्षा घेणार आहोत?
चंद्राचं आकुंचन थांबवणं आपल्या हातात नाही. पण आपल्या महत्त्वाकांक्षेला विवेकाची दिशा देणं नक्कीच आपल्या हातात आहे. म्हणून आज चंद्राकडे पाहताना मनात एकच विचार येतो की, चंद्राचा आकार कमी होतोय, ही निसर्गाची प्रक्रिया आहे; पण माणसाच्या हव्यासाचा आकार वाढत राहणं, ही मात्र त्यानं स्वतःला विचारायची गोष्ट आहे.
चंद्र आकाशात आहे, तिथंच राहू दे. आपण त्याच्यापर्यंत जरूर पोहोचूया; पण त्याला जिंकण्यापेक्षा त्याच्याकडून शिकण्याची तयारी ठेवूया. चंद्रावर पाऊल उमटवणं हा विज्ञानाचा विजय असेल; पण त्या चंद्राला केवळ आपल्या स्वार्थासाठी वापरायचं नाही, हा निर्णय मात्र माणुसकीचा विजय ठरेल.
: मनीष चंद्रशेखर वाघ