विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

हिजाब ते सिनेट… नबीला सय्यदचा आत्मविश्वास


डोक्यावर हिजाब, मनात लोकशाहीची मूल्ये आणि डोळ्यांसमोर सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे स्वप्न! अमेरिकेच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नबीला सय्यदचा प्रवास केवळ एका तरुणीच्या राजकीय यशाची कहाणी नाही. ज्या समाजात धार्मिक ओळखीवरून तिला अपमानास्पद अनुभवांना सामोरे जावे लागले, त्याच समाजाच्या लोकशाही व्यवस्थेत तिने मतदारांचा विश्वास संपादन केला. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी इलिनॉय राज्याच्या सिनेटवर निवडून आलेली ही भारतीय वंशाची तरुणी आज नव्या पिढीच्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनली आहे. हैदराबादमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आई-वडिलांच्या मुलीने गाठलेले हे यश विशेष लक्षवेधी आहे.

नबीला सय्यदची कहाणी केवळ एका हिजाबधारी मुस्लिम तरुणीने निवडणूक जिंकण्यापुरती मर्यादित नाही. अमेरिकेतील स्थलांतरित कुटुंबांची पुढची पिढी राजकीय आणि सामाजिक नेतृत्वात कशी पुढे येत आहे, याचेही ती उदाहरण आहे. तिच्या विजयाकडे धार्मिक ओळखीच्या चौकटीतून पाहण्यापेक्षा शिक्षण, राजकीय जाणीव, संघटनकौशल्य आणि लोकशाहीतील सहभाग या व्यापक संदर्भात पाहायला हवे.

नबीला अमेरिकेत जन्मली आणि इलिनॉयमधील पॅलटाइन परिसरात वाढली. तिचे आई-वडील १९८० च्या दशकात हैदराबादमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या बर्कले शाखेतून तिने राज्यशास्त्र आणि व्यवसाय प्रशासन या दोन विषयांत पदव्या मिळवल्या. विशेष म्हणजे, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ती एका स्वयंसेवी संस्थेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल रणनीतीवर काम करत होती. शालेय विद्यार्थ्यांना वादविवादाचे प्रशिक्षण देण्याचे कामही तिने केले. म्हणजेच निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यापूर्वीच लोकशाही प्रक्रिया, सार्वजनिक प्रश्न आणि तरुणांचा सहभाग यांच्याशी तिचा संबंध निर्माण झाला होता.

मात्र तिचा हा प्रवास सरळ नव्हता. अमेरिकेत जन्मून आणि वाढूनही धार्मिक वेशभूषेमुळे तिला भेदभावाचा सामना करावा लागला. शाळेत असताना तिला ‘दहशतवादी’ म्हणून हिणवण्यात आले. वॉशिंग्टनमध्ये इंटर्नशिप करत असताना हिजाबमुळे एका व्यक्तीने तिच्यावर थुंकल्याचा अनुभवही तिने सांगितला आहे. नववीत असताना हिजाब घालण्याचा निर्णय तिने स्वतः घेतला होता. वडिलांना सुरुवातीला तिच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. पण नबीला यांच्यासाठी हिजाब हा केवळ धार्मिक पोशाख नव्हता; स्वतःची ओळख स्वतः ठरवण्याच्या अधिकाराचा तो भाग होता.

२०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतील वंशद्वेष आणि धार्मिक ध्रुवीकरणाबद्दलची चर्चा तीव्र झाली. या वातावरणात नबीलाच्या मनातही राजकीय सहभागाची गरज अधिक ठळक झाली. केवळ अन्यायाची तक्रार करून परिस्थिती बदलणार नाही, तर निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हायला हवे, ही जाणीव तिच्या राजकीय प्रवासाला दिशा देणारी ठरली.

२०२२ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी तिने इलिनॉयच्या प्रतिनिधीगृहाची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर २०२४ मध्येही मतदारांनी तिला पुन्हा संधी दिली. आमदार म्हणून काम करताना तिने केवळ राजकीय प्रतिनिधित्वावर समाधान मानले नाही. आरोग्यसेवा, औषधांच्या किमती, ग्राहकांचे अधिकार आणि सार्वजनिक शिक्षण अशा विषयांवर तिने विधिमंडळात सक्रिय भूमिका घेतली.

तिच्या कामातील काही उदाहरणे विशेष उल्लेखनीय आहेत. जेनेरिक औषधांच्या किमतीत अवाजवी वाढ रोखण्यासाठी तिने पुढाकार घेतला. स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी विमा संरक्षणाचा विस्तार करणाऱ्या कायद्याची ती प्रमुख प्रायोजक होती. अवयवदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सवेतन रजा मिळावी, यासाठीही तिने काम केले. मानसिक आरोग्यसेवेतील मनुष्यबळ वाढवण्यासाठी आणि आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू राहिले. विधानसभेच्या आरोग्यसेवा उपलब्धता समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही तिने सांभाळली. या कामातून तिच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सामान्य नागरिकांचे प्रश्न असल्याचे दिसते.

नबीला सय्यदच्या राजकीय प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तरुण मतदार आणि विविध समुदायांशी संवाद साधण्याची तिची पद्धत. निवडणूक म्हणजे केवळ भाषणे, सभा आणि जाहिराती नव्हेत. मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे महत्त्वाचे असते. डिजिटल माध्यमांमधील तिचा पूर्वानुभव आणि नागरी सहभागासाठी केलेले काम या प्रक्रियेत उपयुक्त ठरले असावे.

३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या इलिनॉय सिनेटच्या २६ व्या मतदारसंघातील निवडणुकीत तिने विद्यमान रिपब्लिकन सिनेटर डार्बी हिल्स यांचा पराभव केला. उपलब्ध निवडणूक आकडेवारीनुसार तिला ५७ टक्के, तर प्रतिस्पर्ध्याला ४३ टक्के मते मिळाली. हा निकाल तिच्या राजकीय कामाला मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याचे निदर्शक आहे. जानेवारी २०२७ पासून तिचा सिनेटमधील कार्यकाळ सुरू होणार आहे.

या विजयाचे महत्त्व तिच्या धार्मिक ओळखीपुरते मर्यादित नाही. अमेरिकन राजकारणात भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सहभाग वाढत असताना नबीला एका नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. स्वतःची ओळख न लपवता, हिजाब काढून टाकण्याची गरज न भासू देता आणि आपल्या विचारांशी तडजोड न करता तिने राजकीय स्थान निर्माण केले. एखाद्या लोकप्रतिनिधीचे मूल्यमापन त्याच्या वेशभूषेवर नव्हे, तर त्याच्या कामावर व्हायला हवे, हा संदेश तिच्या प्रवासातून मिळतो.

तिच्या आई-वडिलांनी हैदराबादमधून अमेरिकेत स्थलांतर करताना मुलीच्या भविष्यासाठी पाहिलेली स्वप्ने आणि त्या स्वप्नांना नबीलाने दिलेले कर्तृत्वाचे पंख यांचा हा प्रवास आहे. स्थलांतरित कुटुंबातील मुलांना संधी मिळाली, तर ते केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाहीत, तर समाजाच्या निर्णयप्रक्रियेतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, हे तिने दाखवून दिले आहे.

नबीला सय्यदचा विजय केवळ एका भारतीय वंशाच्या मुस्लिम तरुणीने अमेरिकेच्या राजकारणात मिळवलेले यश म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. त्याचा व्यापक अर्थ लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांमध्ये दडलेला आहे. लोकशाहीत कोण सत्तेच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊ शकते, याची मर्यादा धर्म, वंश, भाषा किंवा सांस्कृतिक ओळख ठरवू शकत नाही. स्थलांतरित कुटुंबातील मुलगी, डोक्यावर हिजाब असलेली मुस्लिम तरुणी आणि तुलनेने कमी वयाची राजकीय कार्यकर्तीही मतदारांचा विश्वास संपादन करून लोकप्रतिनिधी होऊ शकते, हे तिच्या निवडणुकीने अधोरेखित केले आहे.

अर्थात, एका निवडणुकीचा निकाल संपूर्ण समाजातील भेदभाव संपल्याचा पुरावा ठरत नाही; पण प्रतिनिधित्वाच्या नव्या शक्यता नक्कीच उघडतो. लोकशाहीचे खरे सामर्थ्य केवळ बहुमताच्या आकड्यात नसते, तर अल्पसंख्याकांसह प्रत्येक घटकाला आपला आवाज मांडण्याची आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळण्यात असते. अमेरिकेच्या राजकारणातील नबीलाचा प्रवेश या संधीचे महत्त्व अधोरेखित करतो. लोकशाही तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा नागरिकांना आपली ओळख लपवून नव्हे, तर ती जपत समान हक्कांसह सार्वजनिक जीवनात सहभागी होता येते. नबीला सय्यदचा प्रवास याच लोकशाही मूल्यांचा विचार करायला भाग पाडतो.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment