आजच्या वेगवान जगात माणसाकडे अनेक गोष्टींसाठी वेळ आहे; मात्र स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि एखादे पुस्तक शांतपणे वाचण्यासाठी वेळ नाही. हातातला भ्रमणध्वनी तासन्तास सोडवत नाही, समाजमाध्यमांवरील निरर्थक संदेश आणि दृश्यफिती पाहण्यात वेळ कसा निघून जातो, हेही कळत नाही. माहितीचा प्रचंड स्फोट झाला असला, तरी ज्ञानाची भूक वाढली आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण माहिती मिळवणे आणि ज्ञान संपादन करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. माहिती काही क्षणांत मिळू शकते; पण ज्ञानासाठी वाचन, चिंतन, मनन आणि आत्मपरीक्षणाची तयारी असावी लागते.
काही दिवसांपूर्वी एका शहरातील तरुणांनी सुरू केलेला ‘पढें, गुनें, मनन करें’ हा वाचन उपक्रम लक्ष वेधून घेणारा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या या तरुणांनी वाचनाला केवळ वैयक्तिक आवड न ठेवता सामूहिक बांधिलकीचे स्वरूप दिले आहे. प्रत्येक सदस्याने आठवड्याला आपण कोणते पुस्तक वाचत आहोत, किती पाने वाचली आणि त्या पुस्तकाची निवड का केली, याचा लेखाजोखा समूहासमोर मांडायचा. पुस्तकातील गुणदोष, त्यातील विचार आणि स्वतःला जाणवलेले मुद्दे यांवर चर्चा करायची. एखाद्या आठवड्यात वाचन झाले नाही, तर शिक्षा म्हणून समूहातील अन्य सदस्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके भेट द्यायची! शिक्षेच्या या कल्पनेतही वाचनसंस्कृती वाढवण्याची सुंदर भावना दडलेली आहे. तीन महिन्यांत एक हजार पाने वाचण्याचे उद्दिष्ट म्हणजे दररोज अवघी अकरा-बारा पाने. व्यस्त दिनक्रमातही एवढा वेळ काढणे अशक्य नाही. गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि वाचनाविषयीच्या आस्थेची.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुस्तकांच्या विषयाला कोणतीही मर्यादा नाही. साहित्य, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजकारण, राजकारण, धर्म, अध्यात्म, तंत्रज्ञान अशा कोणत्याही विषयावरील उत्तम पुस्तकाचे स्वागत आहे. व्यावसायिक, पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एका व्यासपीठावर एकत्र येतात. त्यांच्या कामाचे स्वरूप वेगळे, जीवनातील संघर्ष वेगळे, प्रश्न वेगळे; पण पुस्तक वाचण्याची समान आवड त्यांना एकत्र बांधते. ही केवळ वाचनाची चळवळ नाही, तर परस्परांचे विचार समजून घेण्याची आणि स्वतःच्या विचारांची चिकित्सा करण्याची संधी आहे.
वाचन माणसाला नेमके काय देते? पुस्तक वाचून माणूस केवळ माहितीने समृद्ध होत नाही, तर त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीतही बदल घडतो. एखाद्या प्रसंगाकडे पाहण्याची त्याची दृष्टी व्यापक होते. स्वतःच्या मतांपलीकडेही काही वेगळे विचार असू शकतात, याची जाणीव होते. सहमतीइतकेच असहमतीचेही महत्त्व त्याला उमगते. आपल्या विचारांशी विसंगत असलेले मत वाचण्याची, समजून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची क्षमता वाचनातूनच विकसित होते. त्यामुळे वाचन माणसाला केवळ शहाणे करत नाही, तर अधिक सहिष्णू आणि संवेदनशीलही बनवते.
आज समाजात मतभेदांचे रूपांतर अनेकदा वैयक्तिक संघर्षात होते. राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी एकमेकांना नाकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा वातावरणात वाचनाचे महत्त्व अधिकच वाढते. पुस्तक आपल्याला दुसऱ्याच्या भूमिकेतून जगाकडे पाहायला शिकवते. एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी आपण सहमत नसलो, तरी त्या विचारांमागची पार्श्वभूमी समजून घेण्याची समज देते. म्हणूनच वाचन ही लोकशाहीच्या सुदृढतेसाठीही आवश्यक गोष्ट आहे. प्रश्न विचारणारा, तर्कशुद्ध विचार करणारा आणि पुराव्यांच्या आधारे मत बनवणारा नागरिक घडवण्यात पुस्तकांचा मोठा वाटा असतो.
आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पुस्तकांचे भवितव्य काय, अशी चर्चा सुरू आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पुस्तकनिर्मितीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते, तर दुसऱ्या बाजूला मानवी लेखकाच्या सर्जनशीलतेचे महत्त्वही नव्याने अधोरेखित होत आहे. माहितीचे संकलन, भाषांतर, लेखनाचा आराखडा आणि संदर्भांची जुळवाजुळव यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी पडू शकते. मात्र मानवी अनुभवांची खोली, जगण्यातील वेदना, नात्यांमधील गुंतागुंत, सामाजिक वास्तवाचे भान आणि संवेदनांचे सूक्ष्म पदर यांची निर्मिती ही केवळ माहितीच्या आधारे होत नाही. लेखकाने आयुष्यभर अनुभवलेल्या घटना, त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्याच्या मनात साठलेले भावविश्व यांतून खऱ्या अर्थाने साहित्य जन्माला येते. शब्दांची रचना करता येते; पण त्या शब्दांमागची जगण्याची धग निर्माण करणे वेगळी गोष्ट आहे.
म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तकांचे महत्त्व संपेल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. उलट, या तंत्रज्ञानामुळे पुस्तकांच्या निर्मितीचे नवे मार्ग खुले होत असताना वाचकांनी अधिक सजग होण्याची गरज आहे. कोणते लिखाण विश्वासार्ह आहे, कोणत्या मजकुरामागे संशोधन आहे आणि कोणत्या लेखनात केवळ शब्दांची सजावट आहे, हे ओळखण्याची क्षमता वाचनातूनच विकसित होईल. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी विवेकाचा वापर माणसालाच करावा लागणार आहे.
याच संदर्भात तरुण पिढीविषयी एक सकारात्मक चित्रही समोर येत आहे. समाजमाध्यमांवरील लहान दृश्यफितींच्या आकर्षणात अडकलेली तरुणाई आता पुस्तकांकडेही वळताना दिसते. दक्षिण कोरियातील तरुण वाचकांच्या संख्येत झालेली वाढ हे त्याचे एक उदाहरण मानता येईल. नव्या पिढीला वाचनाची गोडी नाही, असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. मात्र त्यांच्यापर्यंत पुस्तकांची ओळख करून देणारे उपक्रम, वाचनमंडळे आणि सामूहिक चर्चा निर्माण करण्याची गरज आहे. वाचनाची सक्ती करून वाचक निर्माण होत नाहीत; वाचनाचा आनंद अनुभवण्याची संधी दिली, तर त्यातून नवे वाचक घडू शकतात.
पुस्तकांचे महत्त्व केवळ ज्ञानार्जनापुरते मर्यादित नाही. वाचनाचा मानसिक आरोग्याशीही जवळचा संबंध आहे. ब्राझीलमधील तुरुंगांमध्ये कैद्यांसाठी राबवला जाणारा वाचनाचा उपक्रम याचे वेगळे उदाहरण आहे. एखादे पुस्तक वाचून त्यावर समीक्षा लिहिणाऱ्या कैद्याच्या शिक्षेत काही दिवसांची कपात केली जाते. या उपक्रमाचा उद्देश केवळ शिक्षा कमी करणे नसून कैद्यांमध्ये आत्मपरीक्षण, विचारशीलता आणि समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याची प्रेरणा निर्माण करणे हाही आहे. तुरुंगाच्या चार भिंतींत बंदिस्त असलेल्या माणसाला पुस्तकातून बाहेरच्या जगाची ओळख होते. स्वतःच्या चुका, समाजातील वास्तव आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळू शकतो. पुस्तक माणसाच्या हातात दिले, तर त्याच्या विचारांना नवी दिशा मिळू शकते, याचा हा महत्त्वाचा दाखला आहे.
मात्र वाचनाचा खरा अर्थ पुस्तकाची पाने उलटणे एवढाच नाही. अनेकदा आपण एखादे पुस्तक वाचतो, त्यातील काही वाक्ये लक्षात ठेवतो; पण त्यातून नेमके काय शिकायला मिळाले, याचा विचार करत नाही. वाचलेले विचार आपल्या जगण्याशी जोडून पाहणे, त्यांची चिकित्सा करणे आणि त्यातून स्वतःचे मत तयार करणे ही वाचनाची पुढची पायरी आहे. वाचलेले विसरून जाण्यापेक्षा त्यावर मनन करणे अधिक महत्त्वाचे आहे. कबीरांनीही वाचनापेक्षा अनुभवातून आणि अंतर्मुख चिंतनातून मिळणाऱ्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अक्षरांचे ओझे वाहण्यापेक्षा त्यांचा अर्थ जगण्यात उतरवणे अधिक आवश्यक आहे.
आज प्रत्येक शहरात वाचनालये आहेत, पुस्तकांची दुकाने आहेत, ग्रंथप्रदर्शने भरतात; पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा आहे तो वाचकांचा सातत्यपूर्ण सहभाग. घराघरांत पुस्तकांसाठी जागा असण्यापेक्षा मनामनांत पुस्तकांसाठी ओढ निर्माण होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना केवळ गुण मिळवण्यासाठी पुस्तके वाचायला सांगण्याऐवजी स्वतः वाचण्याची सवय लावली पाहिजे. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचे जग विद्यार्थ्यांसमोर खुले केले पाहिजे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही आपल्या भूमिकांना वैचारिक आधार देण्यासाठी वाचनाची कास धरली पाहिजे.
समाज बदलण्यासाठी केवळ घोषणा, आंदोलने आणि भाषणे पुरेशी नसतात. समाजाला विचार देणारी माणसे घडवावी लागतात. आणि विचार करणारी माणसे घडवण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे. रोजच्या धावपळीतून दिवसातील किमान वीस मिनिटे पुस्तकांसाठी राखून ठेवली, तरी वर्षभरात आपल्या विचारविश्वात मोठा बदल घडू शकतो. प्रश्न एवढाच आहे की, आपण वेळ नाही असे म्हणत राहणार की वेळ निर्माण करणार?
कारण पुस्तक वाचणारा माणूस केवळ स्वतःचे आयुष्य समृद्ध करत नाही, तर आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि पुढच्या पिढीलाही विचारांची शिदोरी देत असतो. मोबाईलची स्मरणशक्ती वाढत असताना माणसाची विचारशक्ती कमी होऊ नये, याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. माहितीच्या महासागरात पोहताना ज्ञानाचा किनारा हरवू नये, यासाठी पुस्तकांची सोबत आवश्यक आहे. वाचन ही सवय नाही, ती स्वतःला घडवण्याची अखंड प्रक्रिया आहे. त्यामुळे पुस्तक हातात घेणे जितके महत्त्वाचे, तितकेच त्यातील विचार मनात रुजवणेही महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचूया, त्यावर विचार करूया आणि वाचलेले जगण्यात उतरवूया. कारण वाचन थांबले की विचारांची वाढ खुंटते आणि विचारांची वाढ खुंटली की समाजाची प्रगतीही थांबते.
: मनीष चंद्रशेखर वाघ
