
कार्यालयात कर्मचारी वेळेवर येतो, नेमून दिलेले काम करतो, वरिष्ठांनी सांगितलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतो आणि वेळ संपली की घरी निघून जातो. वरकरणी यात गैर काहीच नाही. उलट, कामाच्या वेळेत काम आणि वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक वेळ, हेच तर अपेक्षित असायला हवे. मात्र, याच वर्तनाला आज कॉर्पोरेट जगतात ‘क्वाएट क्विटिंग’ असे म्हणतात.
‘क्वाएट क्विटिंग’चा मराठीत थोडक्यात अर्थ म्हणजे ‘पाट्या टाकणे.’ जेवढा पगार, तेवढेच काम. कर्मचारी नोकरी सोडत नाही, पण नोकरीसाठी स्वतःला झोकून देण्याची इच्छाही गमावून बसतो. तो कार्यालयात हजर असतो; मात्र मनाने तिथे नसतो. ही केवळ कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेतील बदलाची बाब नाही, तर आधुनिक रोजगार व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर उमटलेले गंभीर प्रश्नचिन्ह आहे.
गॅलपच्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस २०२६’ च्या अहवालानुसार, भारतातील तब्बल ५९ टक्के कर्मचारी ‘क्वाएट क्विटिंग’च्या अवस्थेत आहेत. म्हणजेच ते केवळ कामापुरते काम करतात. त्यांचा कंपनीशी किंवा कामाशी भावनिक संबंध उरलेला नाही. याहून धक्कादायक बाब म्हणजे आणखी १८ टक्के कर्मचारी सक्रियपणे कामापासून अलिप्त झाले आहेत. ही आकडेवारी, देशातील जवळपास प्रत्येक पाचपैकी चार कर्मचाऱ्यांमध्ये कामाविषयी अपेक्षित उत्साह, बांधिलकी किंवा भावनिक गुंतवणूक दिसत नसल्याचे दर्शवते. महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारताच्या कार्यसंस्कृतीसाठी ही धोक्याची घंटा आहे.
मुळात कर्मचारी कामापासून का दुरावतो, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक वेळी त्यासाठी कर्मचाऱ्यालाच दोषी ठरवणे हा व्यवस्थापनाचा सोपा पळवाटीचा मार्ग असतो. पण आस्थापनेतील वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, वर्षानुवर्षे रखडणाऱ्या बढत्या, कामाच्या तुलनेत अपुरे वेतन, अन्यायकारक कामगिरी मूल्यमापन, करिअरमधील मर्यादित संधी आणि वरिष्ठांच्या निर्णयांबद्दल निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींकडे कोण पाहणार? कर्मचाऱ्याने कंपनीसाठी अतिरिक्त वेळ द्यावा, सुट्ट्यांचा त्याग करावा, वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवावे, अशी अपेक्षा करणाऱ्या व्यवस्थापनाने त्याच्या योगदानाची दखल घेण्याची जबाबदारीही स्वीकारायला हवी.
आज अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या माणसापेक्षा कामाच्या आकड्यांना अधिक महत्त्व दिले जाते. लक्ष्यपूर्ती झाली की व्यवस्थापन खूश; ती झाली नाही की कर्मचाऱ्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह. कर्मचाऱ्यांच्या कल्पना, भावना, अडचणी आणि महत्त्वाकांक्षा यांना मात्र फारसे स्थान नसते. वरिष्ठांना प्रश्न विचारणारा कर्मचारी बंडखोर ठरतो आणि अन्याय सहन करणारा कर्मचारी आदर्श ठरतो. अशा वातावरणात कामाविषयी निष्ठा निर्माण होणार तरी कशी?
यात आणखी एक विसंगती आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांकडून मालकासारखी बांधिलकी अपेक्षित करतात; पण त्यांना वागणूक मात्र सहज बदलता येणाऱ्या यंत्रातील एका सुट्या भागासारखी देतात. कंपनी अडचणीत आली की कर्मचारी कपात करण्यास क्षणाचाही विलंब केला जात नाही. मग कर्मचाऱ्याने कंपनीला आपले कुटुंब मानावे, अशी अपेक्षा कोणत्या नैतिक अधिकाराने केली जाते? निष्ठा ही एकतर्फी असू शकत नाही. ती परस्पर विश्वासातून निर्माण होते.
अर्थात, प्रत्येक कर्मचाऱ्याने कामाच्या पलीकडे जाऊन स्वतःला सिद्ध करावेच, असेही नाही. स्वतःचे आरोग्य, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्य जपणे हा त्याचा अधिकार आहे. कामाच्या वेळेनंतर कार्यालयीन फोन उचलणे किंवा सतत अतिरिक्त काम करणे म्हणजेच कार्यनिष्ठा, हा गैरसमजही मोडून काढायला हवा. मात्र, कामाशी असलेली मूलभूत आस्था, सर्जनशीलता आणि जबाबदारीची भावना हरवणे ही चिंतेची बाब आहे.
कर्मचाऱ्यांना कामाचा कंटाळा आला आहे की त्यांना कामाच्या ठिकाणी माणूस म्हणून मिळणारी वागणूक निराशाजनक वाटू लागली आहे? हा खरा प्रश्न आहे. पगार देऊन कर्मचारी विकत घेता येतो; पण त्याची निष्ठा, सर्जनशीलता आणि विश्वास विकत घेता येत नाही. त्यासाठी सन्मान द्यावा लागतो, न्याय द्यावा लागतो आणि नेतृत्वावर विश्वास निर्माण करावा लागतो.
आज भारतीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे तक्ते तपासण्यापेक्षा त्यांच्या मनातील अनुपस्थिती तपासण्याची वेळ आली आहे. कारण कर्मचारी नोकरी सोडतो तेव्हा एका जागेची पोकळी निर्माण होते; पण तो मनाने नोकरी सोडतो तेव्हा संपूर्ण संस्थेची कार्यक्षमता पोखरली जाते.
कर्मचारी कार्यालयात येतोय, कामही करतोय; पण त्याच्या मनातून ‘कंपनी’ कधीच निघून गेली असेल, तर दोष कर्मचाऱ्याच्या शांततेत शोधायचा की व्यवस्थापनाच्या बहिरेपणात? हा प्रश्न आता कॉर्पोरेट जगताने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
: मनीष चंद्रशेखर वाघ