विडियो न्यूज

वेब स्टोरी

वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

सोशल मीडियावरचे श्रीमंतीचे प्रदर्शन ठरू शकते धोकादायक!

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आनंदाचे क्षण, कौटुंबिक समारंभ, पर्यटन, सण-उत्सव, वाढदिवस किंवा एखादे यश मिळाले की त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र, सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सुरक्षितता यामध्ये योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीचा गैरफायदा घेत घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी निश्चितच सावध करणारी आहे.
आज अनेकजण आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन सोशल मीडियावर करतात. महागडे दागिने, रोकड, आलिशान घर, नवीन वाहन, परदेशातील प्रवास, घरातील मौल्यवान वस्तू, मोठ्या समारंभातील खर्च यांचे फोटो आणि व्हिडिओ सर्रास प्रसिद्ध केले जातात. आपल्याला हे केवळ आनंदाचे प्रदर्शन वाटत असले तरी गुन्हेगारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. एखादी व्यक्ती घराबाहेर गेल्याचे किंवा काही दिवस पर्यटनासाठी गेल्याचे सोशल मीडियावर जाहीर केल्यास त्या व्यक्तीचे घर रिकामे असल्याची माहिती अनोळखी व्यक्तींना सहज मिळू शकते. त्यामुळे चोरी, फसवणूक किंवा इतर गैरप्रकारांना अप्रत्यक्षपणे संधी मिळू शकते.
विशेषतः लहान मुले, कुटुंबातील सदस्य, घराचा पत्ता, शाळेचे नाव, रोजची दिनचर्या, कार्यालयाची माहिती, प्रवासाचे वेळापत्रक किंवा आपण सध्या कुठे आहोत, याची माहिती सार्वजनिकपणे देणे टाळले पाहिजे. कौटुंबिक वाद, आर्थिक व्यवहार, वैयक्तिक कागदपत्रे, मोबाईल क्रमांक, ओळखपत्रे, बँकविषयक माहिती यांसारख्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करणेही धोकादायक ठरू शकते.
सोशल मीडिया वापरताना काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सोशल मीडिया खात्यांची privacy settings तपासावीत. अनोळखी व्यक्तींच्या friend request किंवा follow request स्वीकारू नयेत. मजबूत पासवर्ड आणि दोन-स्तरीय सुरक्षा (Two-Factor Authentication) वापरावी. संशयास्पद लिंक, संदेश किंवा ऑफरवर क्लिक करू नये. आपले फोटो आणि माहिती कोण पाहू शकते, यावर नियंत्रण ठेवावे. विशेषतः प्रवासाची माहिती प्रवासाला निघण्यापूर्वी किंवा आपण घराबाहेर असतानाच सार्वजनिक करण्याऐवजी परतल्यानंतर शेअर करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
सोशल मीडिया हा माहिती, संवाद आणि मनोरंजनाचा प्रभावी माध्यम आहे; मात्र त्याचा वापर विवेकाने झाला पाहिजे. ‘दाखवण्यापेक्षा सुरक्षित राहणे महत्त्वाचे’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आपल्या घराची, संपत्तीची आणि कुटुंबाची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे ही प्रत्येक वापरकर्त्याची जबाबदारी आहे. डिजिटल जगात सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

Leave a Comment