माणुसकी अजूनही जिवंत आहे…

कधीकधी एखादी बातमी केवळ माहिती देत नाही, तर अंतःकरण हादरवून टाकते. मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रानपूर गावात घडलेली अंगणवाडी सेविका कंचनबाई मेघवाल यांच्या बलिदानाची घटना अशीच आहे, डोळे पाणावणारी, काळजाला चिरणारी आणि तरीही माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारी.

एका साध्या अंगणवाडी केंद्रात नेहेमीप्रमाणे चिमुकली मुले खेळत होती. अचानक मधमाशांचा भीषण हल्ला झाला आणि क्षणातच आनंदाचं वातावरण भीतीत बदललं. घाबरलेली मुले सैरावैरा पळू लागली. त्या क्षणी कोणताही विचार न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कंचनबाईंनी २० निष्पाप मुलांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. एकही मूल मागे राहू दिलं नाही. त्यांनी जे केलं ते केवळ कर्तव्य नव्हे, ते मातृत्व होतं, ते माणुसकीचं सर्वोच्च रूप होतं. मात्र या शौर्याची किंमत त्यांना स्वतःच्या प्राणांनी मोजावी लागली. मधमाशांच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मुलांचे प्राण वाचले, पण त्यांची रक्षक माता कायमची निघून गेली.

कंचनबाई मेघवाल या केवळ अंगणवाडी सेविका नव्हत्या. ग्रामीण भारतातील त्या हजारो स्त्रियांचं प्रतीक होत्या, ज्या अल्प मानधनावर, मर्यादित साधनसामग्रीत, आणि अनेकदा दुर्लक्षित अवस्थेत समाजाच्या पायाभूत रचनेला खंबीरपणे उभं ठेवतात. अंगणवाडी म्हणजे केवळ पोषण आहार किंवा पूर्वप्राथमिक शिक्षण नव्हे; ती ग्रामीण समाजाची पहिली शाळा, पहिला आधारस्तंभ आहे. आणि त्या शाळेच्या पहिल्या गुरू म्हणजे अशा सेविका.

या घटनेतून एक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो, आपण अशा कर्मचाऱ्यांना किती सुरक्षितता देतो? अंगणवाडी केंद्रांची भौतिक स्थिती, आजूबाजूचा परिसर, आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना याकडे प्रशासनाचं लक्ष किती आहे? मधमाशांचा हल्ला ही नैसर्गिक घटना असली, तरी अशा धोक्यांसाठी कोणतीही तयारी नसणं ही व्यवस्थेची गंभीर त्रुटी आहे.

कंचनबाईंचं बलिदान हे केवळ एका व्यक्तीचं दुर्दैव नाही, तर व्यवस्थेच्या अपयशासमोर धरलेला आरसा आहे. जर त्या केंद्रात संरक्षक व्यवस्था असती, जर आपत्कालीन प्रशिक्षण दिलं गेलं असतं, तर कदाचित आज त्या जिवंत असत्या. त्यांच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली देणं सोपं आहे; पण खरा आदर म्हणजे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावलं उचलणं.

साध्या जीवनात, कोणतीही प्रसिद्धी न मागता आपलं कर्तव्य बजावणाऱ्या कंचनबाई खऱ्या अर्थाने सुपरवुमन होत्या. त्यांच्या हातात शस्त्र नव्हतं, तर मायेचं कवच होतं; त्यांच्या अंगावर चिलखत नव्हतं, तर जबाबदारीची ढाल होती.

रानपूर गावावर आज शोककळा आहे. एका आईने २० लेकरांना नवं आयुष्य दिलं, पण त्या लेकरांच्या आयुष्यात कायमची एक पोकळी राहिली आहे, त्यांच्या ‘अंगणवाडी मावशी’ची. ही पोकळी भरून न निघणारी असली, तरी तिच्या आठवणी प्रेरणादायी ठरतील.

सरकारने कंचनबाईंच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मदत, त्यांच्या कार्याचा सन्मान आणि अंगणवाडी सेविकांसाठी व्यापक सुरक्षा धोरण जाहीर करणं ही काळाची गरज आहे. अन्यथा अशा बलिदानांची केवळ बातमी होते, बदल मात्र होत नाही.

कंचनबाई मेघवाल यांचं नाव इतिहासात कदाचित मोठ्या अक्षरात लिहिलं जाणार नाही. पण २० कुटुंबांच्या मनात, २० मुलांच्या आयुष्यात आणि माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात त्या अजरामर राहतील. त्यांच्या बलिदानाने आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडलं आहे, आपण अशा खऱ्या नायिकांसाठी समाज म्हणून, व्यवस्था म्हणून काय करतो आहोत? याचं उत्तर शोधणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment