पर्यावरण दिवस आणि आपण

पर्यावरणाची नव्याने ओळख करून घ्यायची खरंतर आपल्याला काहीच गरज नाही. हे पर्यावरण आपण लहानपणापासूनच ‘अभ्यास’त आलो आहोत. ‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो’ हा पर्यावरणाचा पहिला पाठ आम्ही पहिलीतच गिरवलेला असतो. पण तेच सुंदर आकाश आज ‘विकासा’च्या प्रदुषणाने काळवंडले आहे… सुंदर प्रकाश देणारा सूर्य आज ‘ओझोन’ भेदून आग ओकतो आहे. कारण हा गिरवलेला धडा विसरून आम्ही पुढच्या वर्गात पोहचतो.

पुढे आम्ही तुकोबांची ‘वृक्षवल्ली’ आणि ज्ञानोबांचा दहिभात खाणारा ‘काऊ’ पाठ करतो. पण ते त्या-त्या इयत्तेपुरतंच मर्यादीत असतं. कारण या धड्यांचा ‘वापर’ आम्ही मार्क्स मिळवून पुढच्या वर्गात जाण्यासाठी करतो. पण ‘विकासा’च्या नावाखाली ‘हाय-फाय’ गृहसंकुलांसाठी… उड्डाणपुलांसाठी… ‘स्मार्ट सिटी’साठी ही वृक्षवल्लीच आम्ही कापून टाकतो आणि त्यांच्यावर नांदणारे आमचे चिऊ-काऊ हरवून बसतो.

सर्वच क्षेत्रात ‘विकास’ गतीमान होत असताना पर्यावरणाचा मात्र ऱहास होत चाललाय. मग नानाविध ‘पर्यावरण दिन’ साजरे होतात. आमच्यासाठी त्याचं महत्त्व हे एकदिवसीय ‘सेलिब्रेशन’ पुरतंच असतं. या ‘दिनां’वर होणाऱया चर्चा ऐकून आम्हाला थोडं सजग व्हावंसं वाटतं. आमचं ‘पर्यावरण’ आमच्या बाल्कनीतून… खिडक्यांमधून डोकावू लागतं; दोन-चार रोपटी लावून, त्यांना रोज पाणी घालून आम्ही पर्यावरण ‘जपतो’. दुसरीकडे आम्ही देवघरातलं निर्माल्य रोज साठवून सुट्टीच्या दिवशी गोळा करतो; तेही प्लास्टीकच्या पिशव्यांमधून आणि कालौघात आमच्या शहरात-गावात अतिक्रमण केलेल्या एखाद्या खाडीपात्रात किंवा नदीत सोडून देतो.

होय, आम्ही हे त्यांचं अतिक्रमणच समजतो. कारण गावाबाहेर-शहराबाहेर असणारी नदी-खाडी आमच्या हद्दीत कशी, हा विचार करायलाही आम्हाला वेळ नसतो. पूर्वी पुणे शहरात प्रवेश करताना मुळा-मुठा नद्यांचे छान वाहते प्रवाह लकडी पुलावरून दिसायचे. आज मात्र त्याला अक्षरश: नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. याला माझ्यासारखा सामान्य माणूस कारणीभूत नाही का?

दरवर्षी पावसात आमचे नाले-गटारं तुंबतात. त्यातून ओसंडून बाहेर येणाऱया प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढीग आमच्या डोळ्यांना खूपत नाहीत. कारण आम्हीच त्यात निर्माल्य अथवा कचरा भरून त्या फेकून दिलेल्या असतात. या पिशव्यांमुळे गटारं-नाले तुंबले की आम्ही मात्र याला ‘सिस्टीम’च जबाबदार आहे म्हणत हात झटकतो. ही ‘सिस्टीम’ काहीच करत नसते का? तर तिच्या परीने ती उपाययोजना करतेच.

आज अनेक शहरांच्या पालिका-महापालिकांमधून ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले जाते. कितीजण या आवाहनाचा आदर करत आहेत? गणपती-नवरात्रीच्या दिवसांत घराघरांतून निर्माण होणारे निर्माल्य टाकण्यासाठी जागोजागी ‘निर्माल्य कलश’ ठेवले आहेत. पण आम्ही आमच्या वाहनांमधूनच त्या कलशात प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भरलेले निर्माल्य भिरकावतो. या पिशव्यांचं पुढे काय होतं? याचा विचार करायलाही आम्हाला वेळ नसतो.

पर्यावरणाचे रक्षण हे व्यक्ती, सरकार, सामाजिक संस्था अशा सर्वांचेच कर्तव्य असून याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. तर योग्य संतुलनासाठी पर्यावरण अनुकूल पध्दतीचे समर्थन करणे, नैसर्गिक साधने जन करणे, पाणी-वीज वाचविणे, शक्य त्या वस्तुंचा पुनर्वापर करणे, आदी प्रामुख्याने केले पाहिजे. पर्यावरणाचा ऱहास थांबविला पाहिजे. पर्यावरण तज्ञ आणि सिस्टीम नावाची प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यापरीने जनजागृती करत असतेच. प्रश्न एवढाच, की याबाबतीत आम्ही सजग कधी होणार?

मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?