ठाणे – गेल्या पंचवीस वर्षात ४००० च्या आसपास विटावा खाडीत बुडणाऱ्यांचे जीव वाचवणारे जीवरक्षक राजेश खारकर यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं असा परिवार आहे.
राजेश विटावा खाडीच्या पैलतीरावर विटावा कोळीवाड्यात खाडीच्या किनाऱ्यावर राहायचे. विटावा खाडीच्या परिसरात एक वातावरणाचा विचित्र असा भूगर्भीय दाब आहे. यात गेल्या अनेक वर्षात हजारो लोक खाडीत बुडून मृत्युमुखी पडले आहेत. रेल्वेमधून खाडीत पडलेल्याचा आवाज एखाद्या दैवी देणगीसारखा राजेश यांना अचूक यायचा. धो धो पावसातही हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाचीही तमा न बाळगता रात्री बेरात्री पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत उडी मारून बुडणारा जीव वाचवायचे. ही संख्या त्याची 4000 वर गेली.
अनेक जीव वाचवलेल्या राजेशना वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आले. त्यांना आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
