शौचालय नूतनीकरणाच्या कामात थुकपट्टी
कंत्राटदार व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मनविसेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांचे आयुक्तांना पत्र
ठाणे – शौचालय नूतनीकरणाच्या २ कोटींच्या कामात शासनाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन केली आहे.
माजिवाडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत मागासवर्गीय निधी तसेच अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शौचालय नूतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच या संदर्भात पत्र दि. 21 मार्च 2024 रोजी माजिवाडा – मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनाही दिले आहे. पत्र देऊन तीन महिने होत आले तरी अद्याप कंत्राटदारावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिका परिमंडळ 3 च्या उपायुक्तांना तीन वेळा भेटूनही सदर विषय सांगितला असता त्यांनी आमच्यासमोर तीन वेळा फोन करुन कार्यकारी अभियंता संजय कदम यांना सदर विषयात लक्ष घालण्याचे सांगितले परंतू संजय कदम यांनी उपायुक्त यांना देखील जुमानले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांना वारंवार भेटून, फोन करुन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत माहिती दिली होती परंतु त्यांनी देखिल दुर्लक्ष केले. अशा प्रकरणांमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची चर्चा सतत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांसोबत मैत्रीचे संबंध जपण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे हेमंत मोरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
कंत्राटदारांने फक्त बाहेरुन रंगरंगोटी करून शौचालय नूतनीकरण झाल्याचे भासवले आहे. निविदेत दिलेली बरीचशी कामे कंत्राटदाराकडून करण्यात आलेली नाहीत. जुन्या दरवाजांना अर्धवट रंग देऊन नविन दरवाजे असल्याचे दाखवण्यात आले आहे. एवढी थूकपट्टी करुन अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, त्यामागचे कारण काय? तरी आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून सदर शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम देण्यात आलेल्या कंत्राटदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती या पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उप शहर अध्यक्ष हेमंत मोरे यांनी केली आहे.
