पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ओसरता करिष्मा, मित्रपक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यात मिळत असलेला भरघोस प्रतिसाद, शिंदेसेनेच्या संजय भोईर, मिनाक्षी पाटील या ‘भूमिपुत्रां’चा बंडखोरीचा पवित्रा, मराठा आंदोलनाचं निवडणुकीवर असलेलं सावट आणि अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभा केलेला ‘मराठा’ उमेदवार आणि उद्धवसेनेचे उमेदवार राजन विचारे या सगळ्या आव्हानांना सामोरे ठेवत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे.
आपल्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्यात एक अजातशत्रू आमदार म्हणून नाव कमावलेल्या संजय केळकर यांना ठाण्यातील स्वपक्षातील विरोध आणि शिंदेसेनेतून आव्हान मिळू लागल्याने केळकर हवादलिल झाले होते. मात्र केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवून भाजपने स्वपक्षातील आव्हानाला आणि शिंदेसेनेच्या दबावाला फारसे जुमानत नाही, हे दाखवून दिले. हा सगळा आव्हानांचा डोंगर पार करून संजय केळकर हे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
संजय केळकर हे राज्यातील सत्ताधारी महायुतीचे आमदार असले तरी ठाण्यातील महापालिकेत सत्ताधारी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. शहरातील बेकायदा बांधकामे असोत, समूह विकास योजनेतील वादग्रस्त तरतूदी असोत किंवा कंत्राटातील कथीत गैरव्यवहारांच्या मुद्यावर केळकर नेहमीच आक्रमक भूमिका घेताना दिसतात. केळकर यांची ही जाहीर भूमिका शिंदेसेनेतील अनेक नेत्यांच्या जिव्हारी लागते असा अनुभव आहे. लोकसभा निवडणुका होताच ठाणे विधानसभा क्षेत्रात केळकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार दिला जावा असा सूर शिंदेसेनेत दबक्या आवाजात उमटू लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही काही पदाधिकाऱयांनी केळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. बाळकूम भागातील प्रभावी राजकीय प्रस्थ देवराम भोईर, संजय भोईर यांच्या कुटुंबियांनी तर ‘त्यांना पाडू’ अशी भूमीका जाहीरपणे मांडली होती. मित्रपक्षातील हा वाढता विरोध पाहता उमेदवारी जाहीर होताच केळकर यांनी शिवसैनिकांसाठी दैवत मानल्या जाणाऱया आनंद दिघे यांच्या समाधीस्थळाकडे धाव घेतली. केळकर यांच्या या राजकीय आखणीने शिंदेसेनेत काहीशी खळबळ माजली आहे.
असे बरेचसे अडथळे पार करीत केळकर विडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु अजूनही बरेच अडथळे त्यांना पार करायचे आहेत. केळकर यांच्या ‘ऍन्टी इन्कम्बनसी’चा त्रास होईल हे कारण पुढे करुन शिंदेसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी या जागेवर दावा केला आहे. प्रसंगी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत आणि अर्थातच केळकरविरोधी एकनाथ शिंदे हे भोईर यांना छुपी रसद पुरवणार यात शंका नाही. केळकर यांच्यासमोर भोईर यांचे हे आव्हान असेल.
गेल्या निवडणुकीत सेनेची एकगठ्ठा मते मिळवणाऱ्या केळकर यांना या खेपेस सेनेतील फुटीचा त्रास होऊ शकतो. त्यात भर म्हणून की काय, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणूक लढवत आहे. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांना मनसेच्या पारंपरिक मतांबरोबरच मराठा आंदोलकांचीही मदत होऊ शकते. ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणूक लढवू शकतात. लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार.
ठाण्यात शिंदेसेना आणि ठाकरे सेना दोघांचेही बलाबल तुल्यबळ आहे. उद्धवसेनेच्या मागे दोन्ही काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उभी राहिली तर हे आव्हान पार करताना केळकर यांची दमछाक होईल. मनसेचे अविनाश जाधव यांच्या मागे ‘मराठा’ मते एकगठ्ठा गेली तर मनसे या वेळेला कोणाला अडसर ठरतील हेही बघावे लागेल. एकूणच अजातशत्रू संजय केळकर यांना हॅटट्रीक साधताना विरोधी पक्षापेक्षा स्वपक्ष आणि मित्रपक्षातील हितशत्रूंच्या आव्हानाचा पार करावा लागेल.
– मनीष चंद्रशेखर वाघ