गुरु विरुद्ध शिष्य : कोण बाजी मारणार?

राज्यातील राजकारणात शरद पवार – जीतेंद्र आव्हाड हे गुरु-शिष्याचं नातं प्रसिद्ध आहे. दुनिया इकडची तिकडे होईल, पण जीतेंद्र आव्हाड हे शरद पवारांना अंतर देणार नाहीत, हे वास्तव आहे. असेच एक नाते ठाण्यात होते, जीतेंद्र आव्हाड आणि नजिब मुल्ला यांचे. इकडेही अशीच परिस्थिती होती. इकडचे जग तिकडे होईल, पण आव्हाड-मुल्ला जोडी तुटायची नाही, हे ब्रह्मवाक्य होतं. परंतु शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही दोन शकले झाली. पक्षात आपल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होऊ न शकलेली नेते मंडळी अजितदादा पवारांच्या पाठोपाठ पक्षातून बाहेर पडली. यात ठाण्याचे माजी नगरसेवक नजिब मुल्लाही आहेत.

आज डॉ. जीतेंद्र आव्हाड शरद पवार गटाकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघात आपली चौथी टर्म लढवत आहेत तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठी आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. कधीकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक, आव्हाडांचे शिष्योत्तम असलेल्या नजीब मुल्ला यांना ला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे करण्याची रणनीती अजित पवार यांनी आखली आहे. त्यामुळे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात गुरु विरुद्ध शिष्य असा सामना पाहायला मिळणार आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड या मतदारसंघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत. कळव्यात भुमीपूत्र, मराठी आणि हिंदू समाजाची लोकवस्ती तर मुंब्रा हा मुस्लिम बहूल परिसर. अशा परिस्थितीतही आव्हाड यांनी हिंदू व मुस्लिम समाजाला सोबत घेऊन हा मतदारसंघ बांधला आहे. येथील रस्त्यांपासून ते अनेक प्रकल्प राबवत त्यांनी या मतदारसंघाचा विकास केला आहे. म्हणूनच राज्यात आघाडी असो व युती वारे कोणत्याही दिशेने वाहत असले तरी आव्हाड यांचे कळवा- मुंब्य्रातील स्थान भक्कम राहिले आहे. या जोरावरच ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. पण यावेळी त्यांची लढाई सोपी जाणार नाही. कारण यावेळी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून एकेकाळी त्यांचे शिष्य असलेले नजीब मुल्ला महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभे राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. पक्षाने त्यांना कामाला लागण्याची सुचना देताच मुल्ला यांनी कळवा- मुंब्य्रात आपला संपर्प वाढवला आहे. येथील कार्यकत्यांना गाठीभेटी देणे, मतदार बांधण्यासाठी मतदारसंघ ते पिंजून काढत आहेत.

जीतेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांना राजकारणात आणले. विद्यार्थी असताना काँग्रेसचा कार्यकर्ता असलेला नजीब यांनी जीतेंद्र आव्हाड यांच्याशी जवळीक वाढवली. पुढे राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर आव्हाड यांनी राजकीय प्रगती साधण्यास सुरुवात केली. अशावेळी त्यांनी सोबत असलेल्या नजीब मुल्ला यांना 20 वर्षांपूर्वी ठाणे पालिकेच्या राबोडी प्रभागातून नगरसेवक पदाचे तिकिट दिले. त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली आणि मुल्ला यांना निवडून आणले. त्यानंतर ठाणे पालिकेत विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य, गटनेता अशी अनेक पदे दिली. पण हळूहळू आव्हाड-मुल्ला यांच्यातील दरी वाढत गेली आणि याचाच फायदा शिंदे सेनेने घेतला.

नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला भर व्यासपीठावर खासदार नरेश म्हस्के यांनी मुल्ला यांना आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आता या शुभेच्छा सत्यात उतरवण्यासाठी नजीब मुल्ला पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या भागात राष्ट्रवादीचे कार्यालय उभारून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. त्यांना आर्थिक रसद देखील पुरवली जात आहे. मात्र असे असले तरी मुंब्रा जिंकणे मुल्ला यांना तितके सोपे नाही. आव्हाडांनी केलेल्या विकासकामांमुळे येथील मतदारांची साथ त्यांना आहे. इतकेच नव्हे तर बहूतेक पदाधिकारी व कार्यकर्तेही आव्हाड यांच्या बाजूने अजूनही आहेत. निवडणुकीदरम्यान या निष्ठावंतांना ‘बांधून’ ठेवण्याचे कसब आमदार आव्हाड यांना साधावे लागणार आहे. पण सध्यातरी नजीब मुल्ला यांचे मनसुबे उधळण्याची एकही संधी कार्यकर्ते सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

एकीकडे ठाणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे गटाला जितेंद्र आव्हाड आणि समर्थकांकडून वेळोवेळी विरोध केला जात आहे. हे सुरू असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी नजिब मुल्ला यांना त्यांच्याविरोधात उभं केलं का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंब्रा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी जीतेंद्र आव्हाडांना मानणारा मोठा वर्ग आहे. याच बालेकिल्ल्यामध्ये शिंदे गटाकडून त्यांचेच विश्वासू नजीक मुल्ला यांना प्रोत्साहन दिले जात असल्याची चर्चा असून जितेंद्र आव्हाड शिष्याचे आव्हान कसे स्वीकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment

× How can I help you?