मुरबाडमध्ये सुभाष पवार यांना वाढता पाठिंबा

मुरबाडमध्ये सुभाष पवार यांना वाढता पाठिंबा
मढ सरपंच, कळंबाड (भों) येथील सरपंचाशी कार्यकर्त्यांनी हाती घेतली ‘तुतारी’

 

मुरबाड : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांना वाढता पाठिंबा मिळत असून, भाजपाच्या मढ येथील सरपंचांसह कार्यकर्ते आणि कळंबाड (भों) येथील भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची’तुतारी’ हाती घेतल्याने शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांचे पारडे काहीसे जड झाले आहे. माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सुरोशे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात स्वागत केले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

मुरबाड विधानसभेत आता भाजपाचे किसन कथोरे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार अशी थेट लढत होणार आहे. सुभाष पवार यांचे वडील माजी आमदार गोटीराम पवार यांचा किसन कथोरे यांनी 2009 आणि 2014 अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव केला होता. त्यानंतर गोटीराम पवार यांना राजकीय संन्यास घ्यावा लागला होता. त्यामुळे आता त्यांचे पुत्र सुभाष पवार हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कथोरे यांनी कपील पाटील यांचे काम केले नव्हते. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला असल्याचे येथील भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. असे असूनही कथोरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्ते नाराज आहेत, तर दुसरीकडे सुभाष पवार हे शिंदे सेनेतून राष्ट्रवादीमध्ये आल्याने, शिंदे सेनेतील अनेक कार्यकर्ते हे यावर यांच्या पाठीशी आहेत. ‘युतीधर्म’ न पाळता तेही ‘तुतारी’ निशाणीला मदत करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किसान कथोरे यांना या निवडणुकीत स्वपक्षातील नाराजांबरोबरच मित्रपक्षातील नाराजीचेही मोठे आव्हान असेल.

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. पवार यांनी नुकताच धसई विभागाचा दौरा केला. या दौऱ्यात ठिकठिकाणच्या गावांमध्ये पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुरबाड तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन सुभाष पवार यांनी केले. त्याला ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

भाजपाच्या मढ येथील सरपंच मिना वाघ, सुभाष लक्ष्मण बोंबे, पंढरीनाथ उंद्रु बोंबे, रमेश बोंबे, राजाराम सुरोशे, बाळाराम भोईर, प्रकाश बोंबे, युवराज बोंबे, देविदास बोंबे, अमोल बोंबे, केशव रण, प्रकाश सावंत, उत्तम वाघ, लक्ष्मण वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तर कळंबाड (भों) येथील राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष कांचन प्रभाकर भोंडीवले, रितेश भोंडीवले, राजेश भोंडीवले, स्वप्निल भोंडीवले,केतन भोंडीवले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. सुभाष पवार यांना गावाचा विकास करण्याची विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

Leave a Comment

× How can I help you?