अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापारी तणावादरम्यान सोन्याच्या किमतींनी खूपच भाव खात नवा उच्चांक गाठला आहे. एप्रिलअखेर सोन्याच्या किमतींनी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रती १० ग्रॅम १ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. किमतवाढीचा फायदा गुंतवणूकदारांना झाला असला तरी ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे ज्वेलर्सच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
चांदीचा भावही प्रती किलो ग्रॅम ९९,८०० रुपये आहे. सध्या सुरू असलेला व्यापार तणाव आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली होती मात्र आता ही घसरण थांबली आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील वाढत्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किमती थोड्याशा घसरल्या होत्या. सोन्याचे भाव कडाडल्यामुळे सोन्याची झळाळी वाढली असतानाच सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदारांना अनेक प्रश्न पडत आहेत, त्यांच्या मनात अनेक शंका आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा भार स्वीकारल्यापासून निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. यात एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे इतर देशातून येणाऱ्या मालावर आयात शुल्क आकारणे. या निर्णयाचा जगभरात परिणाम झाला. भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे भाव वाढले. सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. सोन्याच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गुंतवणूकदार आणि उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. लंडन बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव किंवा किंमत निश्चित होते. बडे खाण उद्योजक आणि मोठे उद्योजक या व्यवस्थेचा भाग आहेत. या बाजारात सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
या मागे विविध कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली राजकीय परिस्थिती, आयात शुल्क आणि जगभरात विविध ठिकाणी असलेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते आहे. भारतीय शेअरबाजार गडगडल्यानंतर अनेक जण सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय मानला जात आहे. सोन्याच्या दरवाढीमागे अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध हे प्रमुख कारण आहे. यामुळे सर्व कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत आहे.
या पुढे सोन्याचे भाव वाढतच राहतील. सोन्याच्या भावात चढ-उतार होत राहतील. सोने १ लाखाच्या घरात गेले तरी लोकांची हौस फिटताना दिसत नाही. यात लग्नसराईची खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. केवळ आभुषणांपुरते सोन्याचे मूल्य मर्यादित नाही. प्रतिष्ठेचे ते एक लक्षण आहे शिवाय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. भारतीय मानसिकता गुंतवणुकीकडे अधिक असते. मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सारेच सोन्यात सुख शोधत असतात. वेळप्रसंगी हेच सोने अधिक मौल्यवान बनते. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय किंवा लग्न कार्यासाठी आपले दागिने गहाण ठेवणाऱ्या महिलांची कमी नाही. सोने खरेदीमुळे दागिना अंगावर मिरवतानाच भविष्यातील संकटासाठीचीही तरतूद केलेली असते.
गत काही वर्षात अनेक जण शेअर बाजाराऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. हक्काचा परतावा हे त्या मागचे कारण आहे. भारतातच हा ट्रेंड आहे. असे नाही. परदेशातही सोन्याचे आकर्षण कमी नाही. सुरक्षितता आणि परतावा या दोन्ही पातळीवर सोन्याचे महत्त्व इतर पर्यायांपेक्षा कित्येक पट अधिक आहे त्यामुळे सोन्याला ‘सोन्याचे’ दिवस आले आहेत. जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार २०२४ मध्ये भारतात ८०२ टन सोन्याची विक्री झाली. २०२३ मध्ये हीच विक्री ७६१ टन होती त्यामुळे भारताला सोन्याची अधिक आयात करावी लागत आहे. यंदा सोन्याला आणखी मागणी वाढली आहे. दर वाढत असले तरी त्याची मागणी कमी होणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. छोटे-मोठे गुंतवणूकदारही सोन्याकडे वळण्याची चिन्हे आहेत. रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील हिंसक संघर्ष याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला. या युद्धांमुळे सोन्याची मागणी घटेल, असा अंदाज होता; परंतु तसे झाले नाही. त वर्षभरात चीनने आंतरराष्ट्रीय बाजारातून २०० टन सोने खरेदी केल्याचे समोर आले.
अचानक चीनने ही खरेदी का केली, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. कारण जेव्हा जेव्हा चीन मोठी खरेदी करतो तेव्हा काही तरी घडते, असा आजवरचा अनुभव आहे. पीपीई कीटची विक्री थांबवून आंतरराष्ट्रीय बाजारातून हे कीट खरेदी करण्याचा सपाटा चीनने लावला तेव्हाच अनेकांना शंका आली होती. त्यानंतर कोरोनाच्या महामारीने जगभर हाहाकार माजवला होता. भारतानेही गतवर्षी चीनच्या हालचाली पाहून काही निर्णय घेतले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंग्लंडमधील आपले १०२ टन सोने मायदेशी आणून ठेवले तसेच सुमारे १५ टन सोने नव्याने खरेदी केले. असाच कित्ता अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आदी देशांनी गिरवला. परिणामी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली. जागतिक स्तरावर अस्थैर्य असूनही सोन्याच्या मागणीवर त्याचा परिणाम झाला नाही. जगभरातील घडामोडी आणि हालचाली सोन्याच्या मागणी आणि किमतीवर परिणाम करणाऱ्या आहेत.
घरगुती किंवा मोठ्या ग्राहकांना घरबसल्या सोन्यावर कर्ज देण्याची वित्तसंस्थांमध्ये चढाओढ आहे. या सेवेमुळेही सोन्याची मागणी वाढली आहे. स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याभोवती असे अर्थकारण आणि गुंतवणुकीचे शास्त्र गुंफले गेले आहे त्यामुळे सोन्याची झव्यळी दिवसागणिक वाढते आहे. सोन्याचे दर चढे असो की अस्थैर्य असो जगभरात सोन्याचे ग्राहक वाढत आहेत. सोन्याच्या मागणीत तोळाभरही फरक पडत नाही, असो. सोन्याची खरेदी जपूनच करायला हवी मग मुहूर्त कोणता का असेना! कारण सोने खरेदी केल्यावर ते घरी ठेवणे जोखमीचे ठरू शकते मग त्यासाठी बँकेत लॉकर उघडावे लागते म्हणजे अतिरिक्त खर्च आलाच, सोन्याचा विमाही काढावा लागतो म्हणजे खर्चच खर्च !