जागतिक वसुंधरा दिन – पर्यावरण संवर्धनासाठी एक जागरूक पाऊल
(२२ एप्रिल विशेष लेख)
दरवर्षी २२ एप्रिलला संपूर्ण जगभरात जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणे आणि लोकांना निसर्गाशी सुसंगत जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व पटवून देणे. आजच्या धावपळीच्या युगात आपण वेगाने प्रगती करत असलो तरी या प्रगतीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज आज अधिक तीव्रतेने भासते.
पर्यावरण संवर्धनाची गरज
जगभरात वाढत असलेले औद्योगीकरण, जंगलतोड, वाहनांची संख्या, आणि प्लास्टिकचा वापर यामुळे प्रदूषणात झपाट्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम हवामान बदल, जीवजंतूंचा नाश, ओझोन थराचे क्षरण आणि शुद्ध पाण्याचा अभाव या स्वरूपात दिसून येतो. हे संकट टाळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
जागरूकता वाढविण्याचे मार्ग
पर्यावरण विषयक शिक्षण शाळांपासूनच सुरू व्हायला हवे. वृक्षारोपण मोहिमा, स्वच्छता अभियान, आणि पर्यावरण विषयक कार्यशाळा, पोस्टर्स, स्पर्धा यांच्याद्वारे जनजागृती वाढवता येते. सोशल मिडियाचाही योग्य वापर करून पर्यावरणाबाबतची माहिती आणि उपाय लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे.
निसर्ग रक्षणासाठी उपाययोजना
वृक्षारोपण व संवर्धन: प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.
प्लास्टिकचा टाळा: प्लास्टिकऐवजी पर्यायी पर्यावरणपूरक वस्तू वापरणे.
ऊर्जेची बचत: वीज, पाणी आणि इंधनाचा वापर कमी करणे.
कचऱ्याचे व्यवस्थापन: ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे व पुनर्वापरावर भर देणे.
वाहनाचा मर्यादित वापर: शक्य असल्यास सार्वजनिक वाहतूक किंवा सायकल वापरणे.
जगातील प्रत्येक व्यक्तीने “निसर्ग वाचवा, जीवन वाचवा” या विचारावर कृती करणे गरजेचे आहे. पृथ्वी आपली माता आहे, आणि तिचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चला, या वसुंधरा दिनी आपण पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल उचलूया.
-राजू शिंदे.