२६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले. युनेस्कोने २०१५ साली एका परिषदेत याबाबत निर्णय घेतला. खारफुटी किंवा कांदळवने वाढावी म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत.
`मानवी अतिक्रमणांची हक्काची जागा म्हणजे कांदळवने’ अशीच कित्येत वर्षे खारफुटीची ओळख होती. कुठलीं बांधकाम असो वा कचऱयासाठी डम्पिंग असो; खारफुटीच्या जंगलावर कुऱहाड ही ठरलेलीच! असं करता करता कित्येक हेक्टर्सची जंगलतोड करण्यात आली. पण २००४ च्या त्सुनामीने या खारफुटीचं महत्त्व केवळ मुंबई-भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पटवून दिलं. त्सुनामी वादळात समुद्रकिनाऱयाची काही गावं-शहरं वाचली ती या खारफुटीमुळेच. तेव्हापासून या तटरक्षक वनस्पतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं.
कांदळ, तिवरं, मॅनग्रुव्हज् अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱया खारफुटीच्या संवर्धनासाठी आज जगभर प्रयत्न सुरू झालेत. या परिसंस्थेबाबत नानाविध संशोधने सुरू झालीत. पूर्वापार चालत अलेले परंतु दुर्लक्षित झालेली एक सजीवसृष्टीच जगासमोर नव्याने येऊ लागली. याच पाण्याखालच्या सृष्टीत दडलेलं रोजगाराचं एक शाश्वत दालन खुलं झालं आहे. या वनस्पतीचं अस्तित्व जरी आज जाणवू लागलं असलं तरी शास्त्रज्ञांच्या मते ती सुमारे दहा कोटी वर्षांपासून .या पृथ्वीतलावर आहे. मुळ पोर्तुगीज शब्द `मॅन्ग्यू’ म्हणजे वृक्ष आणि इंग्रजी `ग्रोव्ह’ म्हणजे वृक्षांचा समुह या शब्दांपासून `मॅग्रुव्ह’ हा शब्द तयार झाला. वाढत्या विकासकामांमुळे आज अनेक ठिकाणी कांदळवनांचे म्हणजेच खारफुटींचे मोठ्या प्रमाणात नुसकान होताना पाहतो. परंतु जेव्हा या क्षेत्रातील रोजगारामुळे स्थानिकांना उत्पन्न मिळू लागेल तेव्हा ते स्वत:हून कांदळवन संवर्धन आणि संरक्षणाच्या कामात सहभाग घेतील हे नक्की.
भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्यापूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे. त्या किनारपट्टीवर भारतामधील खारफुटीचे दुस्रया क्रमांकाचे जंगल आहे. जगामध्ये खारफुटी वनस्पतीच्या एकूण 73 जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये 46 जाती आहेत. पश्चिम किनार पट्टीवर 27, तर पूर्व किनार पट्टीवर 40 जाती आहेत .अंदमान आणि निकोबार या बेटावर 38 जाती आहेत. या प्रजातींपैकीच चिपी, तिवर, कांदळ यांपासून चांगल्या प्रतीचे इमारतीचे लाकूड उपलब्ध होते. तर किरपा, पारस पिंपळ यांपासून रेल्वेचे स्लिपर्स, फर्निचर बनवण्याचे लाकूड मिळते. काजळा या प्रजातीपासून उत्तम प्रकारचा मध, मेण मिळतो.
खारफुटीच्या जंगलात अनेक प्रकारचे मासे, कोळंबी, खेकडे, झिंगे, शिंपल्या, तिसऱया, निवटी तर इत्यादी खाद्यान्य मोठ्या प्रमाणात मिळते. मेस्वाक टुथपेस्ट सगळ्यांच्याच परिचयाची आहे. ही वनस्पती खारफुटी जंगलात मिळते. यापासून दमा, खोकला, जठराचे विकार, पोटातील जंत यावरील औषध तयार होते. `टॅनिन’ या रसायनापासून कातडे कमावणे, मद्यार्क बनवणे शिवाय अनेक औषधी रसायने बनविली जातात. संधीवात, अनेक प्रकारचे त्वचारोग, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा विविध आजारांवर उपयुक्त अशी औषधे खारफुटी प्रजातींपासून मिळू शकतात.
पर्यावरणात अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही खारफुटीची जंगले आता पर्यटनातूनही स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ लागली आहेत. इथे येणारे अनेक प्रजातींचे स्थलांतरीत पक्षी हे पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरत आहे. याच दृष्टीकोनातून महाराष्ट्रात काळींजे, सोनगाव, वेंगुर्ला, आंजर्ले, तारामुंब्री, मिठमुंब्री अशा अनेक गावांमध्ये वनखात्याच्या ‘कांदळवन कक्षा’अंतर्गत निसर्ग पर्यटनासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. प्रत्येक गावाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या निसर्ग पर्यटनात कांदळवनांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आतुर आहेत. काही बोटी घेऊन सज्ज आहेत, काही ठिकाणी ‘कयाकिंग’ सारखे वॉटर स्पोर्ट्सदेखील योजिले आहेत. याव्यतिरिक्त स्थानिक तुम्हाला मासेमारीच्या पारंपरिक पद्धतीदेखील शिकवतील. कधी न पाहिलेले रंगीबेरंगी समुद्री जीवांची ओळख करूनदेतील. आज शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि स्थानिक सगळ्यांच्या एकत्रित कार्याने कांदळवनांचे नक्कीच संवर्धन होईल. `निसर्ग माणसाची भूक भागवू शकतो, पण हाव नाही’ हे महात्मा गांधी यांचे ब्रीद लक्षात ठेवत खारफुटीपासून मिळणारे फायदे ओरबाडून न घेता नैसर्गिकरित्या त्याचा लाभ घ्यावा, एवढेच!
: मनीष चंद्रशेखर वाघ