केतकर-सहस्त्रबुद्धे थेट भिडणार; एशियाटिकमध्ये सामना रंगणार

विशेष प्रतिनिधी :

मुंबईतील २२१ वर्षांची प्राच्यविद्या संशोधनाची परंपरा जपणाऱ्या एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेची बहुचर्चित निवडणूक अखेर १४ मार्च रोजी होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. आतापर्यंत सांस्कृतिक-शैक्षणिक चौकटीत राहिलेली ही निवडणूक यावेळी स्पष्टपणे पक्षीय रंगात रंगली असून, त्यामुळे संस्थेच्या इतिहासातील ही सर्वाधिक चुरशीची लढत ठरण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीस मतदारांच्या पात्र-अपात्रतेच्या वादातून स्थगिती मिळाली होती. मुंबई उच्च न्यायालय यांनी धर्मादाय आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवत निवडणूक प्रक्रियेलाच ब्रेक लावला होता. त्यामुळे अर्धवट राहिलेली प्रक्रिया आता १४ मार्चला पुढे नेली जाणार आहे. नव्याने उमेदवारी दाखल करता येणार नसल्याने आधीच पात्र ठरलेले उमेदवारच रिंगणात असतील.

संस्थेच्या १९ रिक्त जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार मैदानात आहेत. अध्यक्षपदासाठी केतकर आणि सहस्त्रबुद्धे यांच्यात थेट सामना असला तरी इतर पदांसाठी तिरंगी चुरस आहे. एशियाटिकचे जुने सदस्य, नव्या राजकीय पार्श्वभूमीचे सदस्य आणि स्वतंत्र गट असे विविध प्रवाह या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी सुमारे सहा हजार सभासदांची अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. संस्थेच्या निवडणुकांत पारंपरिकरीत्या अत्यल्प मतदान होत आले आहे; मात्र यावेळी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सभासद करून घेतल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मतदारांच्या पात्रतेवरूनच संपूर्ण वाद पेटला. भाजपच्या सहस्त्रबुद्धे गटाचे म्हणणे होते की १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या सभासदांनाच मतदानाचा अधिकार द्यावा. तर केतकर गटाने १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत आलेल्या सर्व अर्जदारांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी भूमिका घेतली. धर्मादाय आयुक्तांनी ३ ऑक्टोबरपर्यंतच्या सभासदांनाच पात्र ठरवले. त्याविरोधात केतकर गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आयुक्तांचा निर्णय रद्द ठरवत संपूर्ण निवडणुकीलाच स्थगिती दिली.

या प्रक्रियेमुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे सखोल पुनरावलोकन करावे, अशी मागणी ‘एशियाटिक टुमारो’ गटाचे निमंत्रक व अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.

नोव्हेंबरमध्येच प्रचारास सुरुवात झाली होती. काँग्रेसने ‘एशियाटिकचे भगवीकरण रोखा’ असे आवाहन करत निवडणूक वैचारिक लढतीचे स्वरूप दिले. त्याउलट भाजप गटाने ‘संस्था मराठी माणसांच्या हाती असावी’ अशी भूमिका मांडली. त्यामुळे ही लढत केवळ व्यक्तीगत न राहता विचारसरणी आणि सांस्कृतिक दिशादर्शनाच्या प्रश्नावर केंद्रित झाली आहे.

एशियाटिक सोसायटी ही ग्रंथसंपदेचा खजिना, दुर्मीळ हस्तलिखिते आणि संशोधन परंपरेसाठी ओळखली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत गैरव्यवस्थापन, आर्थिक चणचण आणि अंतर्गत मतभेद यांमुळे संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विद्यमान अध्यक्षा विस्पी बालापोरिया यांच्या कार्यकाळातही निधी उभारणी आणि आधुनिकीकरणाचे प्रश्न प्रलंबित राहिले.

१४ मार्चची निवडणूक केवळ अध्यक्षपदाची नाही, तर संस्थेच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणारी ठरेल. केतकर यांची पत्रकारितेतील आणि संसदीय अनुभवाची पार्श्वभूमी तर सहस्त्रबुद्धे यांचा संघटनात्मक व वैचारिक वारसा, या दोन भिन्न शैलींची कसोटी लागणार आहे.

मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा शेवटचा टप्पा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पारंपरिकपणे कमी मतदान असलेल्या या संस्थेत यावेळी राजकीय संघटनांची सक्रियता निर्णायक ठरू शकते.

एशियाटिकसारख्या ऐतिहासिक संस्थेची निवडणूक पक्षीय संघर्षाचे रणांगण ठरते आहे, हीच बाब अनेक जुन्या सदस्यांना खटकत आहे. मात्र वास्तव असे की, २२१ वर्षांच्या परंपरेसमोर आता नव्या युगातील राजकीय आणि व्यवस्थापकीय आव्हान उभे आहे. १४ मार्चला मतपेटीतून केवळ अध्यक्ष निवडला जाणार नाही, तर एशियाटिकची पुढील ओळख आणि दिशा निश्चित होणार आहे.

Leave a Comment