हिंदुत्वाला दिली धार••! म्हणून मराठी माणूस खातो मार?

एकीचे बळ गोष्ट विसरलो का ?
मराठी माणसांच्या आणि भाषेच्या न्याय्य हक्कासाठी ५८ वर्षांपूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेना’ या लढावू संघटनेला जन्म दिला म्हणजेच ६० वर्षांपूर्वी स्वतंत्र भारतात आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात मराठी भूमीपुत्रांवर आणि मराठी भाषेवर अन्याय होत होता. त्यांना त्यांचा न्याय्य, हक्काचा वाटा दिला जात नव्हता, त्यांना डावलले जात होते, त्यांची मुस्कटदाबी केली जात होती. शिवसेनेच्या जन्मामुळे मराठी माणसांना आणि भाषेला मोठा आधार मिळाला, आवाज मिळाला, लढण्यास बळ मिळाले. “स्थानिय लोकाधिकार समिती” या शिवसेना पुरस्कृत संघटनेमुळे सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापनांमध्ये मराठी टक्का वाढला. जवळपास दोन तपाहून जास्त काळ सगळे सुरळीत सुरू होते पण काळाची गरज म्हणा वा अन्य कारणांनी सेनेने हिंदुत्वाची धूरा आपल्या खांद्यावर घेतली आणि मराठीचा मुद्दा थोडा बाजूला पडला. हळूहळू बाळासाहेबांचेही वय वाढत गेले आणि परप्रांतीय मराठी द्वेष्ट्यांनी त्याचाच गैरफायदा घ्यायला सुरुवात केली पण हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे सेनेच्या विरोधाची धार कमी झाली त्यामुळे मराठी द्वेष्ट्यांची धिटाई आणि प्रकार (जसे – अमुक तमुक संकुलात मराठी माणसांना म्हणजेच मांसाहारींना जागा नाही, आस्थापनांमध्ये मराठी उमेदवार नको, फलकांवर – व्यवहारात मराठी भाषा नको वगैरे प्रकार) वाढत गेले. त्यांना जेव्हा जेव्हा विरोध झाला तेव्हा तेव्हा मराठी द्वेष्ट्यांनी फक्त माफी मागून सुटका करून घेतली. आता तर बाळासाहेबच नाहीत म्हटल्यावर मराठी द्वेष्टे अगदीच निर्भय झालेत.

मुंबई महाराष्ट्रात परप्रांतीयांकडून आतापर्यंत मराठी माणसे आणि भाषा यांवर जितके अन्याय झाले असतील तसे अन्य प्रांतात कोठेच होऊ शकत नाहीत. मग आपल्याकडेच परप्रांतीय इतके का माजलेत तर याचे कारण मराठी माणसांची आणि सरकारची मराठी माणूस, मराठी भाषा याबाबत असलेली कमालीची उदासिनता होय. मुंबई गिरगाव येथील “फ्रि लान्सर एच.आर. रिक्रुटर ॲण्ड कन्सल्टंट” जानवी सारना या महिलेने सुरतच्या कंपनीसाठी मुंबईत “ग्राफिक डिझायनर” च्या पदासाठी भरतीबाबत एक जाहिरात प्रसिद्ध केली. त्यात उमेदवारांसाठी दिलेल्या अटी / शर्थीमध्ये मराठी उमेदवारांना प्रवेश नसल्याचे जाहिरपणे लिहिलेले आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर थोडीफार खळबळ झाली आणि त्या महिलेने जाहिर क्षमा मागितली. आता निवडणुका असल्याने काही पक्षांना या प्रश्नावर आवाज उठवणे धोक्याचे – नुकसानाचे तर काही पक्षांना हिताचे वाटणार हे निश्चित पण निवडणूका नसत्या तरी तीने माफी मागितल्यानंतर फार काही झाले नसते. अशा प्रवृत्तींना पुन्हा तसे करण्याची हिंमत होणार नाही अशी भीती उत्पन्न करण्यात आपण कमी पडतो हेच खरे. गतवर्षी मुलुंड येथे एका गृह संकुलात एका मराठी दाम्पत्याला भाड्याने वा विकत घर घेण्यास एका गुज्जूने मज्जाव करून अपमानीत केले होते. याआधीही तसे अनेकदा घडलेले आहे. प्रत्येकवेळी त्यांनी चूक करायची, मराठी माणसांचा/ भाषेचा मुंबई – महाराष्ट्रात अपमान करायचा आणि विरोध होताच माफी मागून नवीन प्रकरण करायचे हे आणखी किती वर्षे चालणार ? सरकार यावर ठोस भूमिका घेणार की नाही ? महाराष्ट्रात येऊन सारे गुजराती, उत्तर प्रदेशी, बिहारी, बंगाली, दाक्षिणात्य आपसातील जाती/ विभाग विसरून एक होतात मग मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी/ संवर्धनासाठी आपण मराठी म्हणून कधी एक होणार ? की नेहमी कोकणी, घाटी, विदर्भीय, हे नि ते करत अन्याय सहन करणार ? आता ऐक्य नाही झाले तर आपल्याच शहरात, आपल्याच घरात आपणच उपरे ठरणार. बालपणी शिकलेली “एकीचे बळ” खऱ्या आयुष्यात कधी अंगिकारणार ?
– मनमोहन रो.रोगे

Leave a Comment

× How can I help you?