गेल्या काही वर्षात मालवणमध्ये स्वस्त दरातल्या ‘स्कुबा’ पर्यटनामुळे अनेक अप्रशिक्षित व अनभिज्ञ पर्यटक या छोट्या प्रवाळ बेटांवर गर्दी करीत आहेत. सेल्फी काढून समाजमाध्यमावर चमकण्याच्या नादात नाजूक प्रवाळांचे दगड पायदळी तुडवत आहेत.‘स्कुबा’ डायव्हिंग साठी खराब दर्जाचे गॅस सिलेंडर वापरले जात आहेत, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोच शिवाय त्यातून विषारी वायू पाण्यात मिसळत आहे. सतत बोटी नांगरल्यामुळे प्रवाळांच्या खडकांचे तुकडे पडत आहेत. या भौतिक हानीमुळे प्रवाळ आजारांना सहज बळी पडत आहेत आणि मृत होत आहेत. प्रवाळ श्वेतन, प्रवाळावरचे आजार आणि पर्यटकांचे पायदळी तुडवणे याचा एकत्रित परिणाम म्हणून मालवणच्या प्रवाळांचे पतन आणि सहनिवासी माशांची घट अभूतपूर्व दराने होत आहे. परिणामत: स्थानिक पातळीवर प्रवाळांच्या काही प्रजाती नामशेष होण्याचा धोका संभवतो. ह्याचा परिणाम अर्थातच प्रवाळावर आधारित मासेमारी आणि पर्यटनाच्या स्थानिक रोजगारावर होणार.
पर्यटनाची ही पद्धत स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारणारी आहे. ही पर्यटन पद्धत तत्काळ बदलायला हवी. यासाठी स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन प्रवाळांचे विज्ञान समजून घेऊन शाश्वत पर्यटनाची आखणी केली पाहिजे. ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना गाईड बनवून पर्यटकांचा ओघ नियंत्रित केला जातो तसे मॉडेल येथेही अंगीकारणे शक्य आहे आणि ती काळाची अनिवार्य गरजही आहे. अन्यथा सृष्टीची ही अद्भुत नाजूक परिसंस्था नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.
मनीष वाघ