सायकलशी ओळख प्रत्येकालाच लहानपणापासून झालेली. लोखंडाची, लाल रंगाच्या तिचाकीवरून घरभर, गच्चीत, व्हरंड्यात वा अंगणात मारलेल्या चकरा म्हणजे त्या काळातल्या `लाँग टूर्स’च जणू… पुढे वय वाढत गेलं. सायकलचं रूपही बदलत गेलं. दोन चाकांच्या सायकल्सचं आकर्षण वाटू लागलं. याच `वयात’ येताना सिनेमाचं आकर्षणही वाढत जातं अन् समोर दिसतो `डाकिया डाक डाला’ म्हणत `रोमँटिक’ पोस्टमन झालेला राजेश खन्ना. सायकलवर बसून स्टायलीश पत्र वाटणारा.. राजेश खन्नासारखा सुपरस्टार किती सहज आणि सफाईदार सायकल चालवतोय हे पाहून सायकलची `श्रीमंती’ वाढत जाते. स्वत:च्या दोन सायकली चोरीला जाणं ही घटना तर आपणही किती `श्रीमंत’ आहोत याचीच जाणीव करून देत होती, पुढची कित्येत वर्षं!
तर अशी ही सायकल रुपेरी पडद्यावर सतत दर्शन देत राहते. पोस्टमन, दुध-पेपरवाल्यांचा `काळा घोडा’ हद्दपार होत गेले तरी स्लीम टायर्सच्या `रेसर’, छोट्या पण जाड टायर्सच्या, तीन-तीन गियर्सच्या `माऊंटन बायसिकल्स’… रूप-आराखडा बदलला तरी सायकलची आवड गरिबापासून-श्रीमंतापर्यंत तशीच राहिली.
पूर्वी नाक्या-नाक्यावर, चौका-चोकात सायकल्सच्या कसरती करणारे तरुण दिसायचे. त्यांना पहायला गर्दी व्हायची. सर्कसमध्येही सायकलवर कसरती करणारे प्राणी-पक्षी दिसायचे. तेव्हा सायकलचं असलेलं आकर्षण वाढायचं. सिनेमा `कळायला’ लागला तेव्हा हेमा मालिनी, नितू सिंग, परवीन, बिंदिया गोस्वामी या `ड्रीमगर्ल्स’ सायकलवरून फिरत गाणी म्हणताना दिसायच्या. त्यामुळे सायकलचं आकर्षण तर खूपच वाढत गेलेलं. सायकल कित्ती लकी, असंच वाटायचं. कधीकधी मग ही सायकल 80-90 च्या दशकात दर शुक्रवारी `चित्रहार’ मधून दिसायची; त्यावेळचे `चॉकलेट हिरोज्’ आणि `ड्रीमगल्स’सह! आजही ओठांवर येतं `तेरे मेरे सपने’ मधलं देव आनंद-मुमताजचं `जैसे राधा ने माला जपी शाम की’… हे प्रेमाची गाठ घट्ट बांधणारं गाणं तर `ए मैने कसम ली’ म्हणत घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका! निस्सीम प्रेमाचं प्रतिक ठरणारी ही सायकल कधी कधी गंभीर रूपातही समोर आली. मुलाच्या औषधोपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी सलग आट दिवस सायकल चालणारा `शोर’ मधला केविलावाणा बाप मनोज कुमारने साकारला तेव्हा ती सायकल पडू नये, त्या बापाला चक्कर येऊ नये म्हणून केलेली देवाची प्रार्थना आठवते. मनोज कुमारची हीच `जीवदानी’ सायकल पुढे जीतेंद्रने `घर संसार’मध्ये चालवून त्याच्या नातलगांचे प्राण वाचवले होते. `जानू मेरी जान, मै तुझ पे कुर्बान्..’ म्हणत रफ् टफ् अमिताभ-विनोद खन्ना नायिकांचा पाठलाग करतात. तेव्हा चित्रपटाच्या बदलत्या स्वरूपाबरोबरच सायकलचं ही नवं रुप प्रेक्षकांसमोर आलं. एकमेकांना जोडलेल्या दोन सायकल्स सायकल विश्वाचीच `शान’ बनून राहिल्या.
काळ बदलत गेला. पडद्यावरचे चमकदार चेहरेही बदलले. पण नायक-नायिकांना साथ देणारी सायकल मात्र नव्या रंगारुपात पडद्यावर येत राहिली. नव्या युगाचे आमीर-सलमान-अक्षयनाही `सायकल नाही तर नायिका नाही’ याची जणू खात्रीच पटली. दरम्यान `सोने की सायकल, चांदी की सीट’ म्हणत गोविंदाने नायिकेला `डबलसीट’ येण्याचा आग्रह तेव्हाच्या कॉलेज युवकांना खूप भावला होता. अगदी अलीकडे `पिकू’मध्ये `बीग-बी’ ला या सायकलने साथ दिली. हिंदी चित्रपटांमध्ये सायकलचा `कळसाध्याय’ गाठला तो `जो जिता वही सिंकदर’ चित्रपटात. मोठ्या भावाचं सायकल चॅम्प व्हायचं स्वप्न लहान भाऊ पुर्ण करतो, त्यासाठी केलेले प्रयत्न, त्यात घडणारे क्लायमेक्स या सगळ्यात पूजा बेदी किंवा आयेशा पेक्षा आमिरची सायकलच भाव खाऊन जाते.
सायकलवरून जाणारे गिरणी कामगार, खाण कामगार, पोस्टमन्स ही पात्र चित्रपटातून नाहिशी होत गेली. पडद्यावरची सायकलही नवनव्या चेहऱ्यांबरोबर नवं रूप घेत, आधुनिक होत बदलत गेली. पण तिचं `चंदेरी’पण आजही तसंच टिकून आहे… टिकून राहील. सायकलची फिरणारी चाकं दाखवली की एक अख्खा कालखंड पुढे सरकायचा. तशीच सायकलची लोकप्रियताही कायम पुढे पुढे सरकत राहील, यात शंकाच नाही.
: मनीष वाघ
