महापालिकेची अनाधिकृत बार, पब, हुक्का पार्लरवर कारवाई

ठाणे : संपूर्ण महाराष्ट्र अंमलीपदार्थ मुक्त व्हावा असा महत्वाकांक्षी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

गुरवारी सकाळ पासून ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनाधिकृत बार, पब आणि हुक्का पार्लरवर हातोडा टाकण्याची कारवाई सुरु झाली आहे.

यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नऊ प्रभाग समिती अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.

ठाणे महापालिका हद्दीत सकाळी ११ पासून अनधिकृत हॉटेल आणि पब वरील कारवाईला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. यामध्ये घोडबंदर रोडवरील ओवळा नाका या ठिकाणी असलेल्या अनधिकृत मयुरी लेडीज बार महापालिकेच्या तोडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याच मार्गांवर असलेल्या खुशी या लेडीज बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत पब आणि लेडीज बार असून सर्वच अनाधिकृत बारवर कारवाई केली जाणार आहे. तर संपूर्ण ठाणे शहरातच एकाच वेळी ही कारवाई सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले. ठाण्याच्या वेशीपासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. यात उथळसर, वर्तकनगर, वागळे, घोडबंदर, नौपाडा आदी भागातील बार, पब, हुक्का पार्लर पालिकेच्या रडावर असल्याचे दिसून आले.

Leave a Comment

× How can I help you?