‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ नव्हे हे तर ‘मुख्यमंत्र्यांचे खड्ड्यांचे ठाणे’

ठाणे : शहर आणि जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असल्याने ठाण्यात काय घडते याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवत असताना चांगल्या रस्त्यांपासून अनेक शहरे, गावे वंचित राहत आहेत, यापेक्षा मोठे ठाणे जिल्ह्याचे दुर्दैव ते कोणते?

पावसाळा सुरु झाला कि दरवर्षी ठाणे शहरातील घोडबंदर रस्ता आणि ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात जातो. नशिक महामार्गाची पावसाला सुरुवात झाल्यापासूनच दुरवस्था होते. खारेगाव टोलनाक्यापासून थेट कसारापर्यंत या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडीला नेहमीच सामोरे जावे लागत असल्यामुळे याचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांना बसत असल्याचे दिसून येते. दररोज होणाऱ्या वाहतूकोंडीमुळे अखेर ठाणे महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यांची पाहणी करण्यासाठी रस्त्यावर अधिकाऱ्यांचा फौजफाटा घेऊन उतरावे लागले.

ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेला घोडबंदर रस्ता ठाणेकरांसाठी दररोजचे दुखणे ठरत आहे. या रस्त्यांवर असलेले खड्डे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. छोटे-मोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून या रोडवरील वाहतुकीचा सर्वाधिक फटका हा शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसत आहे. त्याचप्रमाणे कापूरबावडी आणि माजिवडा या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे सर्वाधिक अपघात होत आहेत. घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्त्यांची देखील चाळण झाली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन खड्ड्यातून रस्ता शोधत आपला प्रवास करावा लागत आहे.

ठाणे शहराप्रमाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या ठिकाणी देखील तीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. या खड्ड्यांमुळे अनेक जणांना गंभीर दुखापती, वाहनांची हानी इतकेच काय तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. खड्डे जीवघेणा ठरतो, मोठा अपघात होतो तेव्हा प्रशासन खडबडून जागे होते. मात्र सदर घटनेस रस्ता बांधणारा ठेकेदार, महापालिका-नगरपालिका येथील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हेच मुख्यत्वेकरून कारणीभूत असतात याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो.

Leave a Comment

× How can I help you?