`जय’ ते `अवनी’

`वाघां’ची गणती कमी होत असतानाच
त्यांची संख्या वाढल्याचा डिंडोरा
पिटला जातो
दर `व्याघ्र दिना’ ला…
आम्ही खूश होतो;

पण त्या नंतर
काही दिवसांतच
ऐकू येतात बातम्या
`प्रसिद्ध’ वाघ हरवल्याच्या
अथवा
मारल्या गेल्याच्या…

आम्ही विसरून जातो
त्यांच्या जाहीर केलेल्या
`वाढत्या संख्या’…

अवघ्या दोन-तीन वर्षांचाच काळ
`जय’ हरवतो… सापडतो
अन्
पुन्हा कानावर येते
त्याच्या निधनाची बातमी…

त्या पाठोपाठ
त्याचा मुलगा
`जयचंद’ही मारला जातो…
वाघांचं हे हत्यासत्र
सुरूच असतं
बोर धरणाचा
`बाजीराव’ ते `भालेराव’ पर्यंत
अन् अगदी निघृणपणे हत्या केलेल्या
`अवनी’पर्यंत…

या हत्यासत्रांवर उलट-सुलट चर्चाही
काही काळ ऐकू येतात
वाघांचं संवर्धन ते
त्यांचा `अधिवास’ वाढवण्यापर्यंतच्या..
अन्
या चर्चा करत करत मनुष्यप्राणी
कत्तली करत सुटतो जंगलांच्या
आणि बोंबा मारत सुटतो
“वाघ आमच्या हद्दीत घुसला”

मग सरसावतात `व्याघ्र प्रकल्प’वाले
वाघाला पकडण्यासाठी;
निसटलाच तर
कुणा शार्प शुटरला `सुपारी’ देऊन
त्याला मारण्यासाठी…
तोपर्यंत पुढच्या वर्षीचा `व्याघ्र दिन’ येतो
वाघांची संख्या वाढल्याचा
पुन्हा डिंडोरा पिटला जातो…

आम्हीही खूश असतो
पुढच्या `जय’ किंवा `अवनी’च्या
हत्येची बातमी ऐकू येईपर्यंत…
मग सुरू होतात पुन्हा चर्चा
`व्याघ्र प्रकल्पा’समोर प्रश्नचिन्ह उमटवत
अन् दुसरीकडे
आमचा `व्याघ्र दिन’ सुरूच असतो
वर्षभर….

: मनीष `वाघ’

Leave a Comment

× How can I help you?