ठाणे : त्रिपुरातून खास विमानाने मुंबईत उतरल्यानंतर राजू हा जोगेश्वरी रेल्वे स्टेशन बाहेरील एका गटाराच्या खालच्या भागात भूमीगतपणे वास्तव्य करीत होता. रात्रीच्या अंधारात बाहेर पडून ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये तो चोऱ्या करायचा. एकदम विमानाने तो त्रिपुरा गाठत असल्याने मुंबई किंवा ठाण्यातील पोलिसांना तो हाती लागत नव्हता.
ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एका घरात चोरी झाली होती. यात सोने चांदीचे काही दागिनेही चोरीस गेले होते. हा तपास श्रीनगर पोलिसांबरोबरच गुुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाकडून सुरु असतांना हाच अट्टल चोरटा राजू ठाण्यात चोरीतील सोने चांदीचे दागिने विक्रीसाठी वागळे इस्टेट कामगार नाका या भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घाेडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २५ जुलै २०२४ रोजी सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे, निरीक्षक घाेडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन आणि उपनिरीक्षक तुषार माने आदींच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून वागळे इस्टेट, श्रीनगर भागातून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड असा एक लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सखोल चौकशीमध्ये ठाण्याच्या श्रीनगर मधील चार आणि कापूरबावडीमधील तीन आणि इतर मुंबईतील अशा ११ चोरीच्या गुन्हयांची त्याने कबूली दिली.