सत्तापतनाचे वारे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वीच स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा कोसळल्याची घटना ही केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी घटना आहे. कारण हा पुतळा भारत मातेच्या एका महान वीराचा पुतळा होता. ज्यांच्या राजकीय कौशल्याचे आणि युद्धनीतीचे पोवाडे संपूर्ण भारतात गायले जातात त्या महाराष्ट्रपुत्र शिवरायांचा तो पुतळा होता. तशी ४५ कि.मी. वेगाने वारे वाहिले म्हणून तो पुतळा कोसळला असं निर्लज्जपूर्ण ऊत्तर मुख्यमंत्र्यांकडून येईल, अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. पण त्यामुळे आता केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात आणि राज्यात महायुती सरकार विरोधातले वारे अधिक वेगाने वाहू लागतील, यात शंकाच नाही,

या पुतळ्याच्या बांधकामासाठी सुमारे 3.60 कोटी रुपये खर्च आला. त्याचे अनावरण 4 डिसेंबर रोजी नौदल दिनी करण्यात आले. या घटनेच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार आणि नौदलाने स्वतःचे पथक तयार केले असून या पुतळ्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंपनीच्या मालकावर आणि संबंधित अधिकाऱ्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. . पुतळ्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवरायांबद्दल संपूर्ण देशात नितांत आदर असला तरी ते महाराष्ट्र आणि मराठा संस्कृतीचे प्रतिकात्मक पुरुष आहेत. सामान्य मराठी त्याच्याशी भावनिक जोडला गेला आहे. अशा स्थितीत राजकोट किल्ल्यावरील या घटनेवरून राजकीय खळबळ माजली आहे. त्याहीपेक्षा राज्यात अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना आणि प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संपूर्ण राजकारण शिवरायांच्या शौर्याने आणि स्वाभिमानाने प्रेरित झाले आहे. साहजिकच त्यांनी आणि महाविकास आघाडी पुढील योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करायला सुरुवा केली असून हा शिवरायांचा अवमान आहे, अशी भूमिका मांडली जात आहे.

मोदी सरकारच्या काळात एखादे मोठे बांधकाम पडण्याची हि काही पहिलीच घटना नव्हे. मे 2023 मध्ये उज्जैनच्या महालोक कॉरिडॉरमध्ये स्थापित सप्तऋषींच्या मूर्तीही अशाच वादळात कोसळल्या होत्या. या पावसाळ्यात बिहारमधील जुने आणि नवे पूल कोसळण्याच्या घटना माध्यमांमध्ये चर्चेत होत्या. काही ठिकाणी नव्याने बांधलेले रस्ते पाण्याखाली गेलेत. तर काही ठिकाणी विमानतळाच्या बाल्कनी तुटून खाली पडत आहेत. त्यांची कारणे समजून घेण्यासाठी कोणत्याही तर्काची गरज नाही हे उघड आहे. बांधकाम साहित्याच्या दर्जाबाबत तडजोड आणि राजकीय दबावाख काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रवृत्ती यामुळे अशा अपघातांचा वेग वाढला आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने आपल्या कार्यसंस्कृतीकडे पाहण्याची गरज आहे.

निवडणुका होणार असल्याने मराठा अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. वर्तमान राजकारण नेहमी इतिहासात डोकावते आणि भावनांना आवाहन करून मते मिळवायची असतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. शिवाजी, आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची स्मारके राजकारणाचा भाग राहिली आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. स्मारकांसाठीची भावना संपूर्ण राजकारण बदलू शकत नसली, तरी मतं मिळवण्यात ती नक्कीच प्रभावी आहे. स्मारकांबाबत ध्रुवीकरणाचे राजकारण केले जाते आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही हाच कल कायम राहणार आहे. महायुती विरोधातले वारे आता अधिक वेगाने वाहायला हवेत…

: मनीष वाघ

Leave a Comment