संघाचा सल्ला : महाराष्ट्रात ‘मोदी गॅरेंटी’वर निवडणुका नकोत

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील सत्तेत राहणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतकं महत्त्वाचं मानलं आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी स्वतहून उचलली आहे. याविषयी मुंबई आणि नागपुरात झालेल्या संघ प्रचारकांच्या कोअर टीमच्या बैठकीत विधानसभेची रणनिती आखण्यात आली. यानुसार महाराषट्रातील विधासभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘गॅरंटी’ आणि त्यांचा चेहराही वापरू नये, असा एक ठराव करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याची अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 48 पैकी केवळ 9 जागा जिंकता आल्या. पण या जागांच्या आधारावर बोलायचे झाल्यास, भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने 130 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आणि 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 150 जागांवर महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राज्याच्या सत्तेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आता संघ कोणतीही कसर सोडणार नाहीत.

खरं तर नरेंद्र मोदी आणि संघ आणि महाराष्ट्राचं नातं खूप जुनं आहे. कारण एका मराठी माणसामुळेच नरेंद्र मोदी संघाशी जोडले गेले, त्यांचं नाव लक्ष्मणराव इनामदार म्हणजे ‘वकील साहेब’! 1972 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले. नंतर 1980 साली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता. त्यानंतर 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री आणि शेवटी 2014 साली देशाचे पंतप्रधान. असा नरेंद्र मोदींचा प्रवास आपण पाहिला आहे. या कार्यकाळात संघाची साथ त्यांना कायम लाभली. किंबहुना आपल्या प्रचारकाला पंतप्रधान बनवण्यात संघाचा किंगमेकरचा रोल राहिला. असं असलं तरी 2014 ते 2024 या दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही नक्की तेवढेच घट्ट आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यातच ह्या खेपेला संघाने निवडणुकीत भाजपाचे काम केले का हाही प्रश्न होता. संघाला मानणारा कोअर मतदार हा खरंच ह्या खेपेला मतदानाला बाहेर निघाला का? अनेकांनी ‘नोटा’ दाबले का? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यातच मोदीशिष्य नड्डा यांनी भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्यावेळी केलं होतं. त्यामुळेच आणि लोसभेते निकाल पाहून संघाने पुन्हा एकदा आपल्या हाती कमान घ्याचं ठरवलं. कारण संघात व्यक्तीपेक्षा संघटना जास्त महत्वाची मानली जाते.

2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म एकट्या भाजपला देशातील मतदारांनी 272 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. या 10 वर्षाच्या काळात फक्त मोदींचाच चेहरा सगळीकडे दिसत होता. सरकार म्हणायला एनडीएचं असलं तरी त्याची खरी ओळख ‘मोदी सरकार’ अशीच होती. एनडीएतील काही जुने मित्र पक्ष सोडून गेले होते. जे सोबत होते ते फक्त शरीरानेच सोबत आहेत अशी स्थिती होती. 2024 च्या लढाईच्या सुरुवातीला ज्या क्षणी मोदी विरोधकांनी एकत्र येत इंडीया आघाडीची घोषणा केली त्या क्षणापासून भाजप

मित्र पक्षांचे ‘अच्छे दिन’ पुन्हा सुरु झाले. मोदींनी तडकाफडकी एनडीएची बैठक बोलावत आम्ही सगळे सोबत आहोत हा संदेश दिला.
लोकसभेचा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला. ज्या मोदींनी देशभरात विकासकामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभा राहिलं.. ज्यांच्या कार्यकाळात काशी, मथुरेतील मंदिरं अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं. 2014 साली पावणे चार लाख, 2019 साली पावणे पाच लाखांनी जिंकणाऱया मोदींना यावेळी फक्त दीड लाख मतांनी विजय मिळाला. तर सघाचं हेड क्वार्टर असणाऱया नागपूरमध्ये नितीन गडकरींना सुद्धा फक्त 1 लाख 37 हजार मतांनी विजय मिळालाय.याचं शल्य संघाच्या वरिष्ठ प्रचारकांमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्या होमग्राऊंडमध्ये आपली सत्ता यायलाच हवी या दृष्टीने संघाच्या हालचाली सुरू झाल्या. सगळ्यात आधी त्यांना भाजपसाठी नवा चेहरा द्यायचा आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी मोदी नको असा सूर संघ प्रचारकांमध्ये ऐकायला मिळतो आहे. कारण एकाच चेहऱयावर अवलंबून राहण्याचा अतिरेक त्यांना आता टाळायचा आहे.

: मनीष वाघ

Leave a Comment