जो चाहे किजीये कोई सजा तो है ही नही
जमाना सोच रहा है खुदा तो है ही नही
अलिकडे देशाच्या कारभाराविषयी वस्तुनिष्ठ मते व्यक्त केली तरी ती ‘राजकीय’ टिपणी म्हणत नाके मुरडली जातात. आपले सारे जगणे मुळात राजकीय संदर्भाने भरलेले आहे ,हे आपण स्वीकारत नाही. घर, समाज,देश,बाजार अगदी साहित्य क्षेत्रात देखील राजकारण सुरू आहे. वाॅटसपवरील छोट्या छोट्या समुहात देखील आपल्याला गट तट आढळून येतात. तरीही आपण राजकारण हा विषय अंगावर झुरळ पडावे तसा झटकून टाकायला पाहतो. सार्वजनिकरित्या उघड उघड भूमिका घ्यायला,वाईटपणा घ्यायला आपण कचरतो म्हणून तसे घडत असते.”आपण बरं आणि आपलं घर बरे ” “कशाला नस्त्या उठाठेवी” हा सर्वसामान्य दृष्टिकोन त्यामागे असतो.पाच वर्षातून एकदा बोटाला शाई लावून घेण्याइतकीच आपण राजकीय भूमिका बजावणार असू तर लोकशाही, संविधान व राज्य घटना यांची बूज कोण ठेवणार! वर नमूद शेर वाचनात आला नि मला वर्तमान डोळ्यासमोर दिसू लागले. वस्तुस्थितीचा विपर्यास,मतलब, एखाद्या गोष्टीचे भांडवल म्हणजे राजकारण म्हणता येईल पण वास्तवतेवरचे भाष्य म्हणजे व्यावहारिक जीवनाचा अन्वयार्थ लावणे होय.
सध्या देशातील व राज्यातील वातावरण पाहिले तर समाज, प्रशासन,शासन , राज्यकर्ते सर्वच “जो मर्जी आये” वागताना दिसत आहेत. रोजचे वर्तमान पत्र चाळले तरी हे लक्षात येते. बलात्कार,यौन शौषण, लहान लहान मुलाबाळांवर लैंगिक अत्याचार, रेल्वे अपघात, पूल रस्ते व पुतळे कोलमडून पडणे अशा घटना घडत आहेत. खुले आम भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि स्वतःच्या पार्टीत आले की सगळ्या कारवाया मागे घेत पावन करून घ्यायचे. आमदार खासदार यांना पैशाची आमिषे दाखवून नव्हे प्रत्यक्ष धनाचा ,पदांचा लाभ देऊन सरकारे स्थापित होत आहे .सन १९७५ मध्ये देशात लागू केलेल्या आणीबाणी विरोधात त्यावेळी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.त्यामध्ये पु.ल. देशपांडे हे देखील उतरले होते. ते आपल्या भाषणात सरकारवर टीका करताना म्हणत ,’आता देशात कायद्याचे राज्य नसून काय द्यायचे राज्य आहे’.पुढे ते असेही म्हणत वजन ठेवल्यावर जे सरकते ते सरकार. आजही त्यांच्या वक्तव्याची प्रचीती येते.
ज्यांच्या कडून अपेक्षा करावी ती आपली न्यायालये सरकारच्या कार्यवाहीवर ताशेरे मारतात पण निर्णय प्रलंबित ठेवतात आणि निर्णय दिलाच तर त्यांचे प्रतिबिंब आदेशात पडलेले नसते. मुजोर राज्यकर्ते व शासन यांना हे चांगले माहीत असल्यामुळे शासन यंत्रणेत सुधारणा होत नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती येते. “लाथोंके भूत बातोंसे” थोडेच मानणार? इडी, सीबीआय,आयकर विभाग या यंत्रणांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करण्यात येत आहे. न्यायालये पुराव्याअभावी व आरोपांत तथ्य नसल्यामुळे आरोपींना आरोपातून मुक्त करत आहेत.मग अशा वेळी ज्यांनी खोटे आरोपपत्र दाखल करून न्यायालयांचा वेळ घेतला, सार्वजनिक पैशाचा अपव्यय केला त्या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मात्र काहीच कारवाई होताना दिसत नाही. राजकारण म्हटले की डावपेच येणारच पण संसदीय रीतीरिवाज,कायदा व नैतिकता यांना तिलांजली देणे गैर आहे. प्रामाणिकपणा,निष्ठा व नैतिकतेचा अभाव इ.नी प्रतिपक्ष देखील पोखरला आहे. आजची स्थिती पाहिली तर शिक्षांचे प्रमाण कमी मात्र गुन्हेगारी जास्त वाढली आहे. सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात देखील गुन्हेगारी वाढली आहे. अब्जावधी रूपयांची लूट करून उद्योगपती राजरोसपणे देश सोडून जात आहेत, नेते रातोरात खोके, पेट्या घेऊन पक्ष बदलत आहेत, प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारात बुडाली आहे,समाजाचेही नैतिक अधःपतन होत चालले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या अभिलेखानुसार बलात्काराची ३ टक्के प्रकरणेच कोर्टापर्यंत पोचतात तर जेमतेम ०१ टक्का प्रकरणांत दोषींना शिक्षा होते.एका सर्व्हे मध्ये स्त्रियांना विचारण्यात आले की तुम्हाला सर्वात मोठे भय कशाचे आहे? त्यावर जास्तीत जास्त महिलांनी बलात्काराचे भय असल्याचे सांगितले. बल्कारामुळे स्त्री चे जीवन उध्वस्त होते.सर्वच प्रकरणांना वाचा फुटत नाही हे आकडेवारीनुसार सिद्ध होते.दिल्लीतल्या तरुणीला ‘निर्भया’ म्हटले गेले होते, तसे आता कलकत्त्याच्या तरुणीला ‘अभया ‘म्हटले जात आहे. अभया असो की निर्भया, घरीदारी, कामाच्या ठिकाणी काय कुठेच कुणी सुरक्षित नाही. अशा असुरक्षित जगात मुली तू जन्मालाच येऊ नकोस असेच म्हटले तर गैर काय?
आपल्या राज्यात महाराजांच्या पुतळ्यांबरोबरच खूप काही कोसळले व ढासळले आहे. कोणाला दिसत नसेल तर या राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.महाराष्ट्रातले सभ्य, सुसंस्कृत वातावरण, संत विचार, महात्म्यांनी मांडलेली अहिंसा व समतावाद, स्त्रियांचा सन्मान, समृद्ध परंपरा, आर्थिक समृद्धी, सर्वसमावेशक वृत्ती, छत्रपती महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेले रयतेचे राज्य, लहानग्यांचे भवितव्य आणि खूप काही! हे सारे सारे कुठे गेले? ‘पाप्यांना ईश्वर बघून घेईल’अशी धारणा बाळगून काहीच होणार नाही. स्वाभिमानी व समंजस लोकांनी ही अधोगती व सर्वच स्तरांवरील घसरण ‘निर्धार महाराष्ट्राचा’, म्हणत रोखली पाहिजे.
मोकळे आम्ही काहीही करण्या
ना गुन्ह्यांस शिक्षा आमच्या
जग निश्चिंत सुस्त झोपलेले
करून स्वाधीन सारे ईश्वराच्या
: मोरेश्वर बागडे