आघाडी आणि युतीसमोर एकच ‘महा’प्रश्न मुख्यमंत्री कोण?

सध्या महाराष्ट्राला राज्यात सत्तेवर कोण येणार हा प्रश्न सतावत नसून ‘पुढील मुख्यमंत्री कोण?’ या प्रश्नाचीच डोकेदुखी झाली आहे. कोण कुठल्या पक्षात कधी जाईल, याची पक्षश्रेष्ठींना शेवटपर्यंत खात्री देता येत नाही. मुळात पक्षश्रेष्ठी तरी त्याच पक्षात राहील की नाही हेही सांगता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती ओढावली आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतरचा राजकीय गदारोळ आपण सगळेच जाणतो. या सगळ्या गदारोळात आगामी विधानसभा लागल्या. या निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी ऑक्टोबर महिन्यात होतील अशी खात्री आहे. अशातच महाविकास आघाडी अथवा महायुती यांच्यापैकी जे सत्तेत येतील ते मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करतील याची उत्सुकता जनतेत तर आहेच, पण दोन्ही गटांमध्येही या नावांबद्दल कमालीचे कुतूहल आहे.

जनतेत उत्सुकता आहे ती पुढचा मुख्यमंत्री राज्याचा कारभार कसा चालवेल, याचा ठोकताळा बांधण्यासाठी आणि राजकीय पक्षांमध्ये याबद्दलच्या हालचाली होत आहेत त्या भावी मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे की, घटक मित्रपक्षाचा? आपल्या पक्षाचा असेल, तर तो आपल्या गटाचा आहे की विरोधी गटाचा, हे माहीत करून घेण्यासाठी. जनतेत आणि राजकारण्यांमध्ये मुख्य फरक आहे तो हाच आता तर मुख्यमंत्री कोणत्या जातीचा असेल, असाही प्रश्न पुरोगामी महाराष्ट्राच्या कार्यकत्यांना पडत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच महायुती ही निवडणूक सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवणार असल्याचे स्पष्ट करत निवडून आल्यानंतर मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे आपण सांगू शकत नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार भाजपच्या संसदीय मंडळाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आहे, असे नमूद करत त्यांनी भविष्यात काहीही घडू शकते असे संकेत देत एकनाथ शिंदे यांनी भ्रमात राहू नये, असा संदेशच अप्रत्यक्षपणे दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भावी सरकारच्या आधी भावी मुख्यमंत्री कोण याचे आडाखे बांधायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर करण्यात येणाऱया कोणालाही आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन देऊ, असे उद्धव यांनी जाहीर केले होते. त्यावर महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱयाची घोषणा करणार नाही. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील त्या संख्याबलानुसार निर्णय घेण्यात येईल, असे शरद पवार यांना स्पष्ट करावे लागले होते. महाविकास आघाडीतील या मतांतराची चांगलीच खिल्ली उडवणाऱया भाजपला स्वतला मात्र त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करता येत नाही. म्हणजेच महाविकास असो की महायुती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची चिंता दोघांनाही भेडसावत आहे.
भाजपने पक्षफोडीची जी काही कारस्थाने केली त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणच पूर्णपणे गढूळ झाले आहे. कोणत्याही पक्षाचा प्रतिपक्षावर तसुभरही विश्वास राहिलेला नाही. आज अशी स्थिती आहे की, कोणत्याही पक्षाने मुख्यमंत्रीपदासाठीचे आपले नाव जाहीर केले, तरी मधमाश्यांच्या पोळयावर दगड भिरकावल्यासारखे होईल. विरोधी पक्षांची व्यूहरचना तर सुरू होईलच, शिवाय अन्य घटक मित्रपक्ष आणि अगदी स्वपक्षातून होणाया विरोधालाही तोंड द्यावे लागेल.

आता खरी अडचण होणार आहे ती मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर करण्याची प्रथा रूढ करणाऱया भाजपची शिवसेना फोडून झालेल्या राज्यातील मागच्या सत्तांतरावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विराजमान होतील, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण घडले उलटेच. पण इतरांसाठी जाळे पसरवून ठेवणारे कधीतरी त्याच जाळ्यात अडकतात, हेच खरे. इतका सारा आटापिटा करून फडणवीस यांना अखेर उपमुख्यमंत्रीच व्हावे लागले. एकंदरीतच मुख्यमंत्री म्हणून एकाच कुठल्या नेत्याला सुरुवातीपासून प्रोजेक्ट करणे हे फारसे लाभदायक नाही, असेच यावेळच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंना वाटते आहे, असे दिसते.

: मनीष वाघ

Leave a Comment

× How can I help you?