मुलीच्या नजरेतून आई

एचआर जॉब म्हणजे दिवसभर ऑफिसमध्ये इमेल्स, मेसेजेस बघणे, वाचणे, त्यांना उत्तर पाठवणे. कंटाळवाणे काम. गोदरेज प्रॉपर्टीजच्या एचआर प्रमुख मेघा गोयल यांचाही दिनक्रम असाच साचेबद्ध. पण एके दिवशी त्यांना एक इमेल आला. तो केवळ एक औपचारिक मेला नव्हता तर ते एका संवेदनशील, तरल मनाचे उमटलेले प्रतिबिंब होते. एका महिला कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलीने लिहिलेल्या या पत्रातून आकडे, पदे किंवा कामगिरी नव्हे, तर आईपणाचा शांत पण सशक्त प्रवास उलगडत जातो. या शब्दांतून आई ही केवळ एक कर्मचारी म्हणून नव्हे, तर घर आणि कामाच्या मधल्या अवकाशात स्वतःला सावरत, समतोल राखत उभी राहिलेली स्त्री म्हणून दिसते. मुलीच्या नजरेतून आई म्हणजे थकवा न मोजणारी मेहनत, न बोलता शिकवलेली मूल्ये आणि रोजच्या जगण्यातून उमटणारी प्रेरणा. हे पत्र व्यवस्थापनाला उद्देशून लिहिलेला संदेश नसून, आईच्या कर्तृत्वाला मिळालेली मुलीच्या हृदयातून उमटलेली साक्ष आहे, जिथे आईची ओळख तिच्या पदापेक्षा तिच्या माणूसपणाने मोठी ठरते.

मुलीच्या आयुष्यात आई ही केवळ जन्मदात्री नसते; ती तिची पहिली मैत्रीण, पहिली गुरू आणि आयुष्याची पहिली शाळा असते. मुलीच्या नजरेतून पाहिलेली आई म्हणजे त्यागाची मूर्ती, कर्तृत्वाची सावली आणि धैर्याची न बोलता दिलेली शिकवण असते. आईला पाहताना तिच्या कष्टांची जाणीव लहानपणी शब्दांत उमगत नाही, पण त्या कष्टांची उब मात्र कायमस्वरूपी मुलीच्या मनात साठत राहते.

मुलगी आईकडे पाहते तेव्हा तिला दिसते एक अशी स्त्री, जी स्वतःच्या स्वप्नांना घराच्या चौकटीत सामावून घेते आणि घराच्या जबाबदाऱ्यांना आपल्या स्वप्नांइतक्याच प्रेमाने जपते. सकाळी लवकर उठून घर सांभाळणारी, सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणारी आणि तरीही स्वतःच्या कामात तितक्याच प्रामाणिकपणे झोकून देणारी आई ही प्रतिमा मुलीच्या मनावर खोलवर कोरली जाते. आई थकते, कधी थांबतेही; पण हार मानते, असे दृश्य मुलीला क्वचितच दिसते.

आईच्या डोळ्यांतून झळकणारी चिंता, तिच्या हातात साठलेली मेहनत आणि तिच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान या सगळ्यांतून मुलगी आयुष्याचे खरे धडे शिकते. जबाबदारी म्हणजे ओझे नसते, तर ती समर्थपणे निभावण्याची ताकद असते, हे आई नकळत शिकवते. घर आणि काम, नाती आणि स्वप्ने यांचा समतोल साधताना आई कोणतेही मोठे भाषण देत नाही; तिचे रोजचे जगणेच मुलीसाठी प्रेरणादायी ठरते.

आजच्या बदलत्या काळात, करिअर, स्पर्धा आणि वेगवान आयुष्याच्या प्रवाहात मुलगी आईकडे आदर्श म्हणून पाहते. समाजाच्या अपेक्षा, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख या सगळ्यांचा मेळ घालताना आई ज्या शांततेने उभी राहते, ती मुलीला आत्मविश्वास देते. “आपणही हे करू शकतो,” ही भावना आईच्या कर्तृत्वातूनच मुलीच्या मनात रुजते.

मुलीसाठी आई म्हणजे सुरक्षिततेची भावना. जग कितीही कठीण वाटले, तरी आईच्या उपस्थितीने मनाला आधार मिळतो. आईचे कौतुक इतरांकडून झाले, तिच्या कामाला सन्मान मिळाला, की मुलीच्या मनात अभिमानाची लाट उसळते. तो अभिमान केवळ यशाचा नसतो, तर त्या स्त्रीने आयुष्यभर जपलेल्या मूल्यांचा असतो.

मुलीच्या नजरेतून आई ही त्यागातून आत्मसन्मानाकडे, कर्तव्यातून स्वप्नांकडे आणि प्रेमातून प्रेरणेकडे नेणारा एक अखंड प्रवास आहे . आईला पाहूनच मुलगी ‘स्त्री’ म्हणून उभी राहायला शिकते. म्हणूनच, मुलीच्या आयुष्यात आई म्हणजे एक न संपणारी कविता असते, प्रत्येक ओळीत कष्ट, प्रत्येक शब्दात प्रेम आणि प्रत्येक विरामात अपार ताकद सामावलेली.

आई म्हणजे
न संपणारी कविता…
कधी थकलेल्या ओळींतूनही आशा पेरणारी,
कधी शांत शब्दांतून धैर्य शिकवणारी.

तिच्या पाऊलखुणांतूनच
मुलगी स्वतःचा मार्ग शोधते,
तिच्या कष्टांच्या सावलीत
स्वप्नांना उंच उडायला बळ मिळते.

आई संपत नाही
ती पुढच्या पिढीत उतरते,
मुलीच्या आत्मविश्वासात,
तिच्या स्वप्नांत,
आणि उद्याच्या उजेडात…

: मनीष चंद्रशेखर वाघ

Leave a Comment