काही व्यक्तींचं जाणं केवळ वैयक्तिक दुःख देत नाही, तर सार्वजनिक आयुष्यात एक खोल पोकळी निर्माण करतं. अजितदादा पवार यांचं निधन हे असंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशके सक्रिय असलेला, निर्णयक्षमतेसाठी ओळखला जाणारा आणि आपल्या खास, थेट शैलीमुळे कायम चर्चेत असलेला नेता आज अचानक निघून गेल, ही कल्पनाच मन सुन्न करून टाकणारी आहे.
अजितदादा हे भावनिक भाषणांपेक्षा कठोर वास्तवावर विश्वास ठेवणारे नेते होते. ते लोकांना आश्वासनं देणाऱ्यांपैकी नव्हते; कामाच्या आकड्यांत, फाईल्समध्ये आणि निर्णयांमध्ये त्यांचा आत्मविश्वास दिसत असे. त्यामुळेच कदाचित ते कधी लोकप्रियतेच्या शिखरावर गेले, तर कधी तीव्र टीकेचे धनीही ठरले. पण एक गोष्ट निर्विवाद होती, महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्रात त्यांचं वजन नेहमी जाणवत राहिलं.
बारामती ही केवळ त्यांची मतदारसंघाची ओळख नव्हती; ती त्यांची राजकीय प्रयोगशाळा होती. सहकार, सिंचन, पायाभूत सुविधा आणि प्रशासन या क्षेत्रांतून त्यांनी आपली पकड मजबूत केली. अनेक कार्यकर्त्यांसाठी ते मार्गदर्शक होते, तर अनेक अधिकाऱ्यांसाठी कठोर पण स्पष्ट नेतृत्वाचं प्रतीक. त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना माहीत होतं, “दादा” एकदा निर्णय घेतला, की मागे फिरत नाहीत.
त्यांच्या राजकीय प्रवासात वाद नव्हते असं नाही. आरोप, संघर्ष, पक्षांतर्गत ताणतणाव, सत्तासमीकरणं; हे सगळं त्यांनी अनुभवलं. पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन ते टिकून राहिले, कारण त्यांना व्यवस्थेची नाडी समजत होती. सत्ता ही त्यांच्यासाठी केवळ पद नव्हतं, तर प्रभाव टाकण्याचं साधन होतं आणि तो प्रभाव त्यांनी आपल्या परीने वापरला.
आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनुभवी आवाज शांत झाला आहे. निर्णय घेताना कचरणार नाही, दबावाला बळी पडणार नाही, आणि प्रसंगी अप्रिय ठरेल असा निर्णय घेण्याची हिंमत दाखवेल असा नेता दुर्मीळ असतो. अजितदादा हे त्या दुर्मीळ प्रकारात मोडत होते.
समर्थकांसाठी ते ‘आपले दादा’ होते. थोडे रागीट, थोडे अबोल, पण गरज पडल्यावर पाठीशी उभे राहणारे. विरोधकांसाठी ते कठीण आव्हान होते. कारण त्यांच्याशी सामना करताना भावनेपेक्षा गणित अधिक महत्त्वाचं ठरे. आणि सामान्य जनतेसाठी ते एक असे नाव होते, जे महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्राशी कायम जोडलेलं होतं.
मृत्यू मतभेद पाहत नाही. तो येतो आणि सगळ्या रेषा एका क्षणात पुसून टाकतो. उरते ती फक्त आठवण, एका प्रभावी, कणखर आणि आपल्या पद्धतीने राज्यकारभारावर ठसा उमटवणाऱ्या नेत्याची.
अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने केवळ एक राजकारणी नाही, तर एक अनुभवी रणनीतीकार, प्रशासकीय जाण असलेला नेता आणि अनेकांसाठी आधार हरपला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजित पवार हे कायमच ‘दादा’ राहतील.


