
कालपर्यंत ज्या पक्षाला ‘गुंडांचा पक्ष’ म्हणून हिणवायचे, त्याच पक्षात आज छाती ठोकून प्रवेश करायचा ही केवळ राजकीय कोलांटउडी नाही; हा जनतेच्या विश्वासावर उघड उघड केलेला प्रहार आहे. राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश घेतल्याची बातमी ही केवळ एका व्यक्तीच्या निर्णयाची नोंद नाही, तर भारताच्या राजकारणात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या नैतिक दिवाळखोरीची जाहीर कबुली आहे.
राजकारणात विचार, तत्त्वे आणि भूमिका यांना काही किंमत उरली आहे का? हा प्रश्न आज अधिक तीव्रतेने डोकं वर काढतो आहे. कालपर्यंत भाजपवर गंभीर आरोप करणारे चड्ढा, अचानक त्याच पक्षात सामील होतात म्हणजे त्या आरोपांचे काय? ते खोटे होते का? की आजचा प्रवेशच तडजोडीचा पुरावा आहे? दोन्ही परिस्थितीत जनतेची फसवणूकच ठरते. कारण राजकारणी बदलतो तेव्हा तो केवळ पक्ष बदलत नाही; तो आपल्या वक्तव्यांची, आपल्या भूमिकांची आणि जनतेसमोर दिलेल्या शब्दांची किंमतही बदलतो.
‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो’ हा गुळगुळीत डायलॉग आपण अनेकदा ऐकतो. पण या वाक्याचा वापर करून तत्त्वांची उघड उघड हत्या केली जाते, हेही तितकेच खरे आहे. जर कालपर्यंतचा ‘गुंडांचा पक्ष’ आज अचानक ‘योग्य’ वाटू लागतो, तर हा बदल विचारांचा आहे की स्वार्थाचा? हा प्रश्न टाळता येत नाही.
अशा प्रकारच्या कोलांटउड्यांमुळे सर्वसामान्य मतदाराचा राजकारणावरचा विश्वास उडतो. लोकशाहीचा कणा असलेला मतदार जेव्हा पाहतो की नेते केवळ सत्तेसाठी, पदासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी काहीही करू शकतात, तेव्हा त्याच्या मनात उदासीनता निर्माण होते. ‘सगळे एका माळेचे मणी’ ही भावना वाढीस लागते आणि हीच लोकशाहीसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे.
भाजपनेही या प्रवेशाकडे आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पाहायला हवे. कालपर्यंत ज्यांनी पक्षावर टीका केली, त्यांनाच आज स्वागतार्ह का मानले जाते? पक्षाची विचारधारा एवढी लवचिक आहे का, की कुणीही कधीही येऊन सामील व्हावे? की सत्ता विस्तारासाठी तत्त्वांवर पाणी सोडण्याची तयारी दाखवली जाते?
राघव चड्ढा यांच्यासारख्या नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जनता सर्व काही पाहत असते. सोशल मीडियाच्या या युगात कालचे वक्तव्य आणि आजची कृती यातील विरोधाभास क्षणार्धात समोर येतो. त्यामुळे अशा पलट्यांना ‘राजकीय रणनीती’ म्हणण्यापेक्षा ‘नैतिक अपयश’ म्हणणेच अधिक योग्य ठरेल.
शेवटी, प्रश्न केवळ राघव चड्ढा यांचा नाही; प्रश्न आहे आपल्या संपूर्ण राजकीय संस्कृतीचा. जोपर्यंत तत्त्वांपेक्षा स्वार्थ मोठा राहील, तोपर्यंत ‘राघव, ये तुमने क्या किया?’ हा सवाल वारंवार विचारला जाईल आणि प्रत्येक वेळी उत्तर अधिकच अस्वस्थ करणारे असेल.
: मनीष चंद्रशेखर वाघ