
महात्मा गांधी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर अहिंसा, सत्याग्रह, चरखा, स्वातंत्र्यलढा आणि साधेपणाची प्रतिमा उभी राहते. गांधींचे हे रूप सर्वपरिचित आहे. मात्र, या परिचित प्रतिमेच्या आत दडलेला प्रश्नकर्ता, रूढींना आव्हान देणारा आणि अन्यायाविरुद्ध सतत विद्रोह करणारा गांधी आपल्याला किती परिचित आहे? नंदकिशोर आचार्य यांचे हिंदी भाषेतील ‘विद्रोही महात्मा’ हे पुस्तक याच अनोळखी गांधीचा शोध घेते.
गांधींच्या विचारांचा विचार करताना आपण अनेकदा त्यांच्या अहिंसेला केवळ एक राजकीय अस्त्र मानतो. परंतु आचार्य यांच्या मांडणीत अहिंसा ही त्यापेक्षा खूप व्यापक जीवनदृष्टी ठरते. हिंसेला विरोध करण्याबरोबरच माणसाच्या स्वातंत्र्यावर, प्रतिष्ठेवर आणि समानतेवर आघात करणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेला प्रश्न विचारणे, हा गांधींच्या अहिंसेचा गाभा आहे. त्यामुळे गांधी हे केवळ ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढणारे नेते नव्हते; ते समाजातील अन्यायकारक रूढी, विषमता, शोषण आणि सत्ताकेंद्री मानसिकतेविरुद्धही उभे राहिलेले विचारवंत होते.
याच अर्थाने ‘विद्रोही’ हा शब्द पुस्तकाच्या शीर्षकात अत्यंत अर्थपूर्ण ठरतो. गांधींचा विद्रोह हिंसक नव्हता; तो नैतिक होता. त्यांचा संघर्ष दुसऱ्याचा पराभव करण्यासाठी नव्हे, तर अन्यायाच्या रचनेला नैतिक प्रश्न विचारण्यासाठी होता. साधन आणि साध्य यांच्यातील नाते हा गांधींच्या विचारांचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आचार्य यांच्या गांधीवाचनात हीच भूमिका मध्यवर्ती आहे. अन्यायाविरुद्ध लढताना अन्यायाचीच साधने वापरली, तर मिळणारे स्वातंत्र्य खरे स्वातंत्र्य राहणार नाही, हा गांधीविचार आजच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवातही अस्वस्थ करणारा आहे.
पुस्तकाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गांधींच्या स्त्रीविषयक विचारांचे केलेले विवेचन. स्त्री ही पुरुषाच्या उपभोगाची वस्तू नसून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, असा गांधींचा आग्रह होता. स्त्रीच्या सार्वजनिक जीवनातील सहभागाबरोबरच तिच्या स्वायत्ततेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न गांधींच्या चिंतनात महत्त्वाचा होता. आचार्य यांच्या मांडणीत गांधींच्या या विचारांमधील आधुनिकता ठळकपणे समोर येते. राजकमल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या अंशातही गांधींच्या स्त्रीवादी विचारांचे हे स्वरूप स्पष्ट केले आहे.
गांधींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या विचारांनाही अंतिम सत्य न मानण्याची त्यांची तयारी. प्रयोगशीलता हा त्यांच्या विचारांचा आत्मा होता. सत्याचा शोध घेताना स्वतःच्या चुका मान्य करणे, अनुभवातून विचार बदलणे आणि जीवनाला प्रयोगशाळा बनवणे, ही वृत्ती गांधींना इतर अनेक राजकीय नेत्यांपासून वेगळे करते. म्हणूनच आचार्यांचा गांधी हा एखाद्या संगमरवरी पुतळ्यासारखा स्थिर नाही; तो सतत प्रश्न विचारणारा, स्वतःशी संघर्ष करणारा आणि समाजालाही प्रश्न विचारायला भाग पाडणारा माणूस आहे.
आजच्या काळात या पुस्तकाचे महत्त्व अधिक वाढते. गांधींचे नाव एका बाजूला राजकीय घोषणांमध्ये वापरले जाते, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विचारांतील अस्वस्थ करणारा भाग सोयीस्करपणे विसरला जातो. गांधींची प्रतिमा स्वीकारणे सोपे आहे; पण गांधींचे प्रश्न स्वीकारणे कठीण आहे. अस्पृश्यता, धार्मिक द्वेष, स्त्री-पुरुष विषमता, आर्थिक शोषण, सत्तेचे केंद्रीकरण आणि उपभोगवादी जीवनपद्धती यांच्याबाबत गांधींच्या विचारांचा पुनर्विचार केला, तर आजच्या समाजासमोर अनेक आरसे उभे राहतात.
नंदकिशोर आचार्य स्वतः गांधीवादी आणि अहिंसावादी चिंतनाच्या दीर्घ परंपरेशी जोडलेले लेखक आहेत. त्यांचे लेखन कविता, नाटक, साहित्यचिंतन, राजकीय-सामाजिक विचार, मानवाधिकार आणि गांधीदर्शन अशा अनेक क्षेत्रांत विस्तारलेले आहे. त्यांनी ‘अहिंसा विश्वकोश’सारखे महत्त्वाचे कार्यही केले आहे. त्यामुळे ‘विद्रोही महात्मा’ हे लेव्हल गांधीजींवर बाहेरून लिहिलेले चरित्रात्मक भाष्य नसून गांधीविचाराशी दीर्घकाळ संवाद साधलेल्या विचारवंताचे चिंतन म्हणून वाचावे लागते.
या पुस्तकाची भाषा विचारप्रधान असली तरी हिंदी असल्याने काहीशी संयत-अवघड वाटते. त्यामुळे हे पुस्तक झपाट्याने वाचून बाजूला ठेवण्यापेक्षा थांबत-थांबत वाचावे लागते. मात्र हीच त्याची ताकदही आहे. लेखक वाचकाला तयार निष्कर्ष देत नाही; तो गांधींच्या विचारांच्या खोल पाण्यात उतरायला भाग पाडतो.
आज गांधींना स्वीकारणारे आणि नाकारणारे असे दोन टोकांचे प्रवाह दिसतात. ‘विद्रोही महात्मा’ या दोन्ही प्रवाहांपासून काहीसे अंतर ठेवते. गांधींना देवत्व देण्याऐवजी त्यांना ‘विचारांचा जिवंत स्रोत’ म्हणून पाहते. गांधींचे मोठेपण त्यांच्या चुका नसण्यात नाही, तर सतत सत्याचा शोध घेण्याच्या त्यांच्या वृत्तीत आहे,असा अर्थ या पुस्तकातून उमटतो.
या अर्थाने ‘विद्रोही महात्मा’ हे केवळ गांधींवरील पुस्तक नाही; ते आजच्या भारताला गांधींच्या आरशात पाहण्याचे निमंत्रण आहे. गांधींचा विद्रोह समजून घेतला, तर गांधींची अहिंसाही नव्याने समजते. आणि गांधींची अहिंसा नव्याने समजली, तर आजच्या हिंसक, असहिष्णू आणि ध्रुवीकरणाच्या वातावरणाकडे पाहण्याची आपली दृष्टीही बदलू शकते.
गांधीजींच्या पुतळ्याला हार घालण्यापेक्षा त्यांच्या विचारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसमोर उभे राहणे अधिक कठीण आहे. ‘विद्रोही महात्मा’ हे पुस्तक याच कठीण वाटेवर वाचकाला घेऊन जाते. म्हणूनच हे पुस्तक आजच्या काळात वाचणे आवश्यक ठरते.
लेखक : नंदकिशोर आचार्य | राजकमल प्रकाशन
: मनीष चंद्रशेखर वाघ