
“रिश्ते बस रिश्ते होते हैं,
कुछ रिश्ते, रिश्तों से भी बढ़कर होते हैं।”
गुलजार यांच्या संवेदनशील लेखणीतून उमटणाऱ्या अशा ओळी नात्यांचा अर्थ अधिक व्यापक करून जातात. नाती केवळ रक्ताची नसतात; ती विचारांची असतात, संवेदनांची असतात, शब्दांची असतात. म्हणूनच साहित्यिक आणि राजकारणी यांच्यातील एखादी स्नेहपूर्ण देवाणघेवाण ही केवळ औपचारिक भेट न राहता दोन वेगळ्या विश्वांना जोडणारा सुंदर सेतू ठरते.
१८ ऑगस्ट… गुलझार यांचा वाढदिवस! या दिवशी अशीच एक मनाला सुखावणारी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार आणि संवेदनशील कवी गुलजार यांना वाढदिवसानिमित्त एक पुस्तक सस्नेह पाठवले. या पुस्तकाच्या भेटीला गुलजार यांनी दोनच दिवसांनी तितक्याच आत्मीयतेने प्रतिसाद दिला. त्यांनी स्वतः लिहिलेली दोन पुस्तके एकनाथ शिंदे यांना सस्नेह भेट दिली.
ही देवाणघेवाण वरवर पाहता साधी वाटू शकते; पण तिच्या मागे असलेली भावना अधिक महत्त्वाची आहे. एका राजकीय व्यक्तीने साहित्यिकाला पुस्तक पाठवणे आणि त्या साहित्यिकाने आपल्या लेखणीने जन्माला घातलेली दोन पुस्तके परत भेट देणे, हा प्रत्यक्षात विचारांचा संवाद आहे. शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झालेला हा स्नेह आहे.
आजच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे महत्त्व आणखी अधोरेखित होते. सार्वजनिक जीवनातील चर्चेची पातळी दिवसेंदिवस खालावताना दिसते आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक टीकेत, आरोप-प्रत्यारोपांत आणि चिखलफेकीत होताना दिसते. राजकीय विरोधकांविषयी बोलताना शब्दांची मर्यादा अनेकदा ओलांडली जाते. अशा वातावरणात पुस्तक हातात घेऊन एकमेकांशी संवाद साधणारी माणसे दिसणे ही निश्चितच सुखावणारी बाब आहे.
राजकारणाला साहित्याची गरज असते आणि साहित्यालाही समाजजीवनापासून तुटून राहता येत नाही. साहित्य माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेते; त्याच्या सुख-दुःखाला शब्द देते. राजकारण समाजाच्या वर्तमानाशी थेट जोडलेले असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांमध्ये संवाद राहिला, तर सार्वजनिक जीवन अधिक समृद्ध आणि संवेदनशील होऊ शकते.
गुलजार यांनी आपल्या लेखणीने अनेक पिढ्यांना प्रेम, विरह, माणुसकी आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. त्यांच्या पुस्तकांची भेट ही म्हणूनच केवळ दोन ग्रंथांची भेट नाही. ती त्यांच्या अनुभवांची, विचारांची आणि संवेदनशीलतेची भेट आहे. तर एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त पुस्तक पाठवून साहित्याविषयीचा आदर आणि आत्मीयता व्यक्त केली आहे.
राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात, विचारांचे मार्ग वेगळे असू शकतात; पण साहित्य आणि स्नेह माणसांना जवळ आणू शकतात. सार्वजनिक जीवनात संवादाची दारे खुली ठेवण्याचे काम अशाच छोट्या, पण अर्थपूर्ण कृती करतात.
आज जेव्हा शब्दांचा वापर अनेकदा माणसे तोडण्यासाठी केला जातो, तेव्हा पुस्तकांच्या माध्यमातून माणसे जोडली जात आहेत, हे विशेष आहे. चिखलफेकीच्या राजकारणात साहित्याची देवाणघेवाण ही जणू शब्दांवरचा विश्वास पुन्हा दृढ करणारी घटना आहे.
एकनाथ शिंदे यांनी गुलजार यांना पाठवलेले पुस्तक आणि गुलजार यांनी परत दिलेली आपली दोन पुस्तके या तीन पुस्तकांच्या देवाणघेवणीतून प्रत्यक्षात तीन गोष्टींची देवाणघेवाण झाली आहे, ‘ साहित्य, संवेदना आणि स्नेह’!
म्हणूनच ही भेट औपचारिकतेच्या पलीकडे जाते. ती सांगते की राजकारणाच्या गदारोळातही माणूसपणासाठी, साहित्याच्या सन्मानासाठी आणि स्नेहाच्या भाषेसाठी जागा उरलेली आहे.
शब्द भेटले शब्दांना,
मन जुळले मनाशी;
चिखलफेकीच्या काळातही
स्नेह राहिला माणसाशी.
: मनीष चंद्रशेखर वाघ